आपण विविध प्रकारचा भाजीपाला पिकांची लागवड करतो. प्रामुख्याने जर आपण पाहिले तर भाजीपाला लागवड दोन एकर क्षेत्रामध्ये तीन प्रकारचा भाजीपाला घेतला तर खूप चांगले आर्थिक उत्पन्न मिळू शकते.भाजीपाल्यासाठी बाजारपेठेचा एक चांगला अंदाज आला आणि त्यानुसार जर लागवड केली तर खूप चांगला नफा कमी खर्चात शेतकऱ्यांना मिळणे शक्य आहे. भाजीपाल्यामध्ये शेतकरी मिरची, वांगे, भेंडी, काकडी इत्यादी भाजीपाला पिकांची लागवड करतात व पालेभाजीमध्ये कोथिंबीर मोठ्या प्रमाणात लावली जाते.
परंतु यामध्ये 55 ते 60 दिवसात चांगले उत्पादन देणाऱ्या ढेमसे या पिकाची लागवड जर शेतकऱ्यांनी केली तर नक्कीच शेतकऱ्यांना या माध्यमातून चांगले उत्पादन मिळू शकते. या लेखात आपण थोडक्यात ढेमसे लागवड बद्दल जाणून घेऊ.
ढेमसे लागवड
1- जमीन व लागणारे हवामान- प्रमुख्याने या पिकासाठी हलकी तसेच मध्यम काळी जमीन असणे आवश्यक असून हलकी जमीन जर असली तर हे पीक चांगले येते.
या पिकाचा विशिष्ट हंगाम नसून तुम्ही बारा महिन्यात केव्हाही याची लागवड करू शकता. जर आपण यासाठी लागणाऱ्या हवामानाचा विचार केला तर कोरडे हवामान यासाठी खूप उत्तम आहे.
2- या पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी महिको एमटीएनएच 1, अण्णामलाई इत्यादी वाण चांगले आहेत. जर तुम्हाला एक एकर लागवड करायची असेल तर यासाठी तुम्हाला दोन किलो बियाण्याची आवश्यकता भासेल.
परंतु यामध्ये एक विशिष्ट काळजी घेणे गरजेचे आहे ते म्हणजे या पिकाचे जे काही बियाणे आहे कठीण कवचाचे असल्याने त्याची उगवण शक्ती फार कमी होते. त्यामुळे लागवडीआधी एक लिटर पाणी कोमट करून त्यामध्ये 500 मिली गोमूत्र टाकून एक किलो बी रात्रभर भिजत ठेवल्यानंतर त्याला सावलीत वाळवावे व नंतर लागवड करावी.
3- ही आहे लागवडीची उत्तम पद्धत- तुम्हाला हलक्या जमिनीत लागवड करायची असेल तर तीन बाय दोन फूट अंतर उत्तम आहे
व जमीन चांगली असेल तर पाच बाय दोन फूट अंतर ठेवावे. जर शक्य असेल तर बियाणे लावताना सुरुवातीला ह्यूमिक 98 टक्के सेंद्रिय खत एक चमचा टाकून त्यात बियाण्याची लागवड करावी. असे केल्याने जमीन भुसभुशीत होते व जारवा व वेल वाढण्यास मदत होते.
4- रासायनिक खतांच्या बाबतीत महत्त्वाचे- या पिकाचे वैशिष्ट्य म्हणजे या पिकास रासायनिक खत कुठले देऊ नये. कारण जर तुम्ही रासायनिक खताचा वापर केला तर या पिकावर बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेणखताचा वापर हा उत्तम ठरतो.
उन्हाळ्यात पाण्याचे व्यवस्थापन करताना सात दिवसांच्या अंतराने सकाळी नऊच्या आत पाणी द्यावे व हिवाळ्यात पाण्याचे अंतर आठ ते दहा दिवस ठेवावे व सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत द्यावे. पाणी व्यवस्थापन करताना ते हलकेसे पाणी द्यावे भिजपाणी देऊ नये.
5- ढेमशाची काढणी तंत्रज्ञान- लागवडीनंतर साधारण पस्तीस ते 45 दिवसात या पिकास फुलकळी येते त्यानंतर 55 ते 60 दिवसात तोडणी सुरू होते. फळे साधारणतः सफरचंदाच्या आकाराचे झाल्यावर तोडावे. या कालावधीत पिकाला हिरवट पोपटी रंग येतो.
फळे आकाराने जास्त मोठी होऊ न देता वेळेवर त्याची तोडणी करणे आर्थिकदृष्ट्या फायद्याचे ठरते. साधारण तोडणी सुरू झाल्यानंतर दोन महिन्यांपर्यंत त्याचे उत्पादन सुरू राहते व एकरी पाच ते दहा टनांपर्यंत उत्पादन निघणे अपेक्षित असते.
Published on: 13 August 2022, 05:03 IST