अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव भारतात प्रथम कर्नाटक राज्यात मे महिन्यात नोंद करण्यात आला. त्या महाराष्ट्रात मका पिकावर सोलापूर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात लष्करी अळीची प्रथम नोंद करण्यात आली. मका पिकावर या किडीचा प्रादुर्भाव जवळपास 13 जिल्ह्यामध्ये झालेला दिसून येत आहे. ऊस हे देखील या किडीची यजमान वनस्पती असल्यामुळे ऊस पिकावर देखील या किडीचा प्रादुर्भाव पलूस तालुक्यात सर्वप्रथम नोंद करण्यात आला. या दोन्ही किडीच्या नोंदीत मला माझा सक्रिय सहभाग देता आला हे मी माझे भाग्य समजतो.सध्याच्या घडीला सांगली,सातारा, कोल्हापूर या तीन जिल्ह्यात ऊसावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.सांगली जिल्ह्यामध्ये पलूस,वाळवा, खानापूर, कवठेमंकाळ, मिरज या तालुक्यात अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव ऊस पिकावर दिसून येत आहे तर कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केल्यास करवीर,कागल तालुक्यात या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील चिकोडी तालुक्यात या किडीची नोंद ऊस पिकावर झाली आहे.
ऊस पिकात या किडीचा प्रादुर्भाव फुटव्याच्या अवस्थेत दिसून येत आहे त्यामुळे सध्याच्या घडीला तिच्यापासून कोणतेही आर्थिक नुकसान नाही. परंतु पुढे चालून या किडीने रौद्र रूप धारण केले तर या किडीमुळे ऊस पिकाचे आर्थिक नुकसान होऊ शकते. सध्याच्या घडीला या किडीचा प्रसार रोखणे सर्वात महत्त्वाचे आहे शेतकरी बंधूनी ऊस पिकाचे वेळोवेळी निरीक्षण करून जर ही कीड दिसत असल्यास योग्य नियंत्रणाचे उपाय योजावेत.फॉल आर्मी वर्म म्हणजे काय?फॉल आर्मी वर्म ही एक अळी असून ती मका या पिकावर प्रामुख्याने आढळून येते. सध्या तिचा प्रादुर्भाव ऊस पिकावर देखील दिसून येत आहे. या किडीचे शास्त्रीय नाव स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा हे आहे. या किडीमध्ये पीक नष्ट करण्याची ताकद असल्यामुळं तिला फ्रुगीपर्डा हे नाव देण्यात आले आहे. लॅटिन भाषेत फ्रुगीपर्डा म्हणजे फळ गमावणे असा होतो.
ओळखण्याची खुण१.अळीच्या डोक्याच्या पुढच्या बाजूस उलट ‘Y’ आकाराची खूण असते.२. अळीच्या आठव्या बॉडी सेगमेंट वर चौकोनी आकारात चार ठिपके दिसुन येतात. त्या चार ठिपक्यात केस देखील आढळून येतात. अळीच्या शरीरावर इतरत्र कुठेही अशी ठेवण दिसत नाही. ३. अळीच्या शरीरावर फोडी आल्यासारखे काळे ठिपके दिसून येतात, त्या ठीपक्यामध्ये लहान केस देखील दिसतात. नुकसानीचा प्रकार - ही कीड ऊस पिकाचे पाने खाऊन नुकसान करते. प्रथम अवस्थेतील अळी कोवळ्या पानावर उपजिवीका करते. पानावर खरवडून खाल्ल्यामुळे पानांवर पांढरे ठिपके दिसून येतात. दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेतील अळ्या पोंगयामध्ये शिरून पाने खायला सुरुवात करतात.ऊसाच्या पोंग्यामध्ये या किडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पान उघडल्यानंतर पानावर एका रांगेत गोल छिद्रे दिसून येतात. ऊसाच्या पोंग्यात पाहिले तर आपणास या अळीची विष्ठा दिसून येते.ही कीड स्वजातीय भक्षक असल्यामुळे एका ऊसाच्या एक फुटाव्यावर आपणास एकाच अळी आढळून येते.
ही कीड इतकी धोकादायक का आहे.या किडीचे पतंग हे ताकदवान असून एका रात्रीत सुमारे १०० किलोमीटर पर्यंतचा प्रवास करू शकतात. त्यासोबत या किडीची प्रजनन क्षमता देखील खूप जास्त आहे. मादी तिच्या जीवनक्रमात सुमारे एक ते दोन हजार अंडी घालते. नियंत्रणाचे उपायसद्यस्थितीला ऊस पिकावर या किडीच्या नियंत्रणासाठी कोणत्याही प्रकारचे रासायनिक कीटकनाशक शिफारसीत नाही.परंतु शेतकरी बंधू मक्यावर जी कीटकनाशक शिफारशीत आहेत त्याचीच फवारणी घेताना दिसत आहेत. यामध्ये इमामेक्टीन बेंझोएट 5 एस जी आणि क्लोरानट्रानिलीप्रोल १८.५ एस सी यांचा समावेश आहे.जैविक कीडनियंत्रणामध्ये नोमुरिया रिलेयी (४ ग्रॅम प्रती लिटर पाणी) या जैविक कीटकनाशकाची फवारणी देखील उपयुक्त ठरली आहे.या किडीच्या सर्वेक्षणासाठी मार्केटमध्ये लवकरच कामगंध सापळे उपलब्ध होत आहेत त्याचा देखील शेतकरी बंधू उपयोग करू शकतातटीप- या किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी किटकनाशकांची फवारणी शक्यतो संध्याकाळच्या वेळेला घ्यावी.कीटकनाशक ऊसाच्या पोंग्यात जाईल याची काळजी घ्यावी.
Published on: 28 June 2022, 08:44 IST