सूर्यफुलाचा जगातील तेलबिया पिकांमध्ये तिसरा क्रमांक लागतो एकूण तेलबिया क्षेत्रापैकी २८ टक्के क्षेत्र सूर्यफुलाने व्यापले आहे. एकूण खाद्यतेल यापैकी १० टक्के उत्पादन सूर्यफुलापासुन मिळते. महाराष्ट्रात प्रामुख्याने संपूर्ण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर सोलापूर, विदर्भातील बुलढाणा अमरावती या जिल्ह्यात प्रामुख्याने घेतले जाते. एकूण क्षेत्राचा विचार करता ७० टक्के क्षेत्र मराठवाड्यात आहे. महाराष्ट्रात सूर्यफुलाची सरासरी उत्पादकता ७२७ किलो प्रति हेक्टर आहे. सूर्यफूल सूर्यप्रकाशात संवेदनशील नसल्यामुळे खरीप, रब्बी व उन्हाळी या तीनही हंगामात घेता येणारे महत्वपूर्ण तेलबिया पीक आहे. पाण्याअभावी जर खरिपाची पेरणी लांबली तर खरिपातील मुख्य पिकाला पर्याय म्हणून सूर्यफुलाची पेरणी केली जाऊ शकते. अल्प पाण्यात येणारे तसेच कमी उत्पादन खर्च यासारख्या वैशिष्ट्यामुळे सामान्य शेतकऱ्यांना परवडणारे पीक आहे.
सूर्यफूल हे पीक कोणत्याही हवामानात घेतले जाऊ शकते. महाराष्ट्रात खरीप, रब्बी व उन्हाळी या तिन्ही हंगामात सूर्यफूल घेतले जाते, पण उत्पादनाचा विचार करता रब्बी हंगामातील सूर्यफूल जास्त उत्पादन देते. या पिकाची लागवड करायचा विचार आपण करत असाल तर सर्वात प्रथम आपण आपली जमिनीची कुवत जाणून घ्यावी.
जमीन
मध्यम ते भारी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ असल्यास रोपांची चांगली वाढ होते.
पूर्वमशागत
जमिनीची खोल नांगरट करावी त्यानंतर काडीकचरा वेचून शेत स्वच्छ करावे, नांगरणी झाल्यावर २-३ वखराच्या पाळ्या द्याव्यात व जमीन भुसभुशीत करावी. शेवटची वखरणी करण्याच्याआधी ४ ते ५ गाड्या कुजलेले शेणखत टाकावे.
कोणकोणत्या वाणाची होते लागवड
- सूर्या मॉर्डन
- पिकेव्ही एस .एफ -९
- टि. ए. एस. ८२
- फुले भास्कर
- भानू
- एस एस ५६
- फुले रविराज
- के बी एस एच १
बीज प्रक्रिया
हानिकारक बुरशी कीटकांपासून पिकाला वाचविण्यासाठी बीज प्रक्रिया महत्त्वाची असते. पेरणीपूर्वी बियाण्यास प्रति किलो ३ ग्रॅम थायरम किंवा प्रति किलो ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा या बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी तसेच या बरोबरच अझोटोबॅक्टर / अॕझोस्पिरीलम व पी. एस. बी. यांसारखी जिवाणू खते २० ग्रॅम प्रति किलो बियाण्यास वापरावे. अझोटोबॅक्टर / अॕझोस्पिरीलम यामुळे नत्र स्थिर होण्यास मदत होते, तर पी. एस. बी. मुळे अविद्राव्य स्फुरद पिकास उपलब्ध होते.
पेरणी
सूर्यफुलाची पेरणी तीनही हंगामात करता येते. खरीप हंगामात सूर्यफुलाची पेरणी जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात करावी, रब्बीमध्ये ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात तर उन्हाळी सूर्यफुलाची पेरणी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात ते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी. पेरणी करताना दोन ओळीतील अंतर ४५ सेंटिमीटर तर दोन झाडातील अंतर ३० सेंटिमीटर ठेवावे व बी ३ ते ५ सेंटिमीटर खोलवर पेरावे.
विरळणी
सूर्यफूल उगवणीनंतर १५ ते २० दिवसांनी विरळणी करावी. त्यामुळे प्रति हेक्टरी रोपांची संख्या योग्य प्रमाणात राहते व उत्पादनात वाढ होते.
खत व्यवस्थापन
महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शिफारस केल्यानुसार सूर्यफुलाचा ५० किलो नत्र, २५ किलो स्फुरद, २५ किलो पालाश पेरणीच्या वेळी द्यावे व बागायती पिकास ६० किलो नत्र ६० किलो स्फुरद व ४० किलो पालाश या प्रमाणात द्यावे. या मात्रेपैकी ३० किलो नत्र व संपूर्ण स्फुरद पालाश पेरणीच्या वेळी द्यावे व उरलेले नत्राची मात्रा पेरणीनंतर ३० दिवसाच्या आत द्यावी.
आंतरमशागत
सुर्यफुलाचे ४५ दिवस होईपर्यंत तणविरहित ठेवणे फार आवश्यक असते. यासाठी २ ते ३ वेळा फवारणी करावी, जर आवश्यकता असेल तर खुरपणी करावी. तणनियंत्रणासाठी फ्लुक्लोरलीन हे तणनाशक पेरणीपूर्वी २ लिटर प्रति हेक्टरी ७०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
जलव्यवस्थापन
खरीप हंगामात पावसाचा खंड पडल्यास १ ते २ पाणी संरक्षित पिकास द्यावे. रब्बी व उन्हाळी हंगामात सूर्यफूलास महत्त्वाच्या अवस्था जसे की उगवण, कळी, फुलोरा, दाणे भरणे, व परिपक्व होण्याच्या वेळी पाणी द्यावे.
हस्त परागीकरण
सूर्यफूल हे स्वयंपरागीत पीक नसल्यामुळे कृत्रिम पद्धतीने परागीकरण केल्यास उत्पादनात वाढ होते. पीक फुलोऱ्यात असताना सकाळी ८ ते ११ यावेळी परागीकरण करावे. हस्त परागीकरण शक्य नसल्यास फुल उमलण्याच्या वेळी २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात पुलावर फवारावे. परागीकरण जास्त प्रमाणात करण्यासाठी ४ ते ५ मधमाशी पेट्या शेतात ठेवाव्या.
कापणी व मळणी
सूर्यफुलाची पाने, फुलाची मागील बाजू पिवळी दिसू लागल्यास समजावे पीक परिपक्व होऊन काढणीस आले. या अवस्तेमध्ये फुले कापून घ्यावे व ३ ते ४ दिवस वाळू द्यावीत नंतर मळणी करून साठवून ठेवावे.
हेक्टरी उत्पादन -सुधारित वाणापासून १० ते १२ क्विंटल तर संकरित वाणापासून १५ ते १८ क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळू शकते. कोरडवाहू पिकापासून प्रति हेक्टरी ८ ते १० क्विंटल उत्पादन मिळते.
लेखक -
महेश गडाख
Msc(Agri)
maheshgadakh96@gmail.com
पुजा लगड
Msc(Agri)
परशराम हिवरे
Msc(Agri)
Published on: 03 July 2020, 06:57 IST