कांदा म्हटले म्हणजे दराच्या बाबतीत कायम अनिश्चित असलेले पीक आहे. कधीकधी शेतकऱ्यांच्या अपेक्षेपेक्षा खूप जास्तीचा दर मिळतो तर कधीकधी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुद्धा निघणे मुश्कील होते, अशा प्रकारचे हे पीक आहे. आपल्याला माहित आहेच कि बाजारपेठेत जर कांद्याला दर चांगले नसले तर बरेच शेतकरी चाळीमध्ये कांदा साठवतात.
परंतु कांदा साठवत असताना काही महत्वाच्या गोष्टींकडे जर लक्ष दिले नाही तर चाळीत देखील कांदा सडायला लागतो व फार मोठ्या प्रमाणात शेतकरी राजांना नुकसानीला सामोरे जावे लागते. या लेखामध्ये आपण चाळीत कांदा साठवायचा असेल तर काढणी करताना छोट्या छोट्या गोष्टींची काळजी कशी घ्यावी याबद्दल माहिती घेऊ.
कांदाचाळीत साठवणे अगोदर घ्यायची काळजी
1- काढणी केल्यानंतर पातीसोबत कांदा सुकवा- यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण कांदा काढणी सुरू करतो त्यावेळेस त्याला लागलीच न खांडता अगोदर तीन ते चार दिवस पातीसोबत वाळवणे खूप महत्त्वाचे असते.
याचा फायदा असा होतो की, कांदा साठवणूक केल्यानंतर कांद्याला सूप्तपणा देणारे जे जीवनसत्व असतात ते जीवनसत्व हळूहळू पाती च्या माध्यमातून कांद्यामध्ये उतरत असतात. त्यामुळे जमिनीतुन काढल्यानंतर पात सुकेल तोपर्यंत शेतात वाढवणे गरजेचे असते. परंतु हे करीत असताना कांद्याचा ढीग न करता जमिनीवर एकसारखे पसरवून त्यांना सुकवावे.
नक्की वाचा:फायदेशीर लागवड: कोरडवाहू शेतीत चिंच लागवड ठरेल एक राजमार्ग, शेतकऱ्यांना होईल फायदा
2- कांद्याची मान न कापता फक्त कांदा पात कापणे- ही गोष्ट प्रत्येक शेतकरी करीत असतो. कांदा शेतामध्ये तीन ते चार दिवस वाळविल्यानंतर त्याची पात चांगली सुकली की कांद्याच्या मानेला पीळ देऊन एक ते दीड इंच मान ठेवून कांदाचे पात कापावी.
त्यामुळे साठवणूक करताना कांद्याचे तोंड पूर्णपणे बंद राहते व त्यामुळे कांद्यामध्ये सूक्ष्म जिवाणूंचा शिरकाव होत नाही व कांदा सडत नाही. तसेच कांद्याचे बाष्पीभवन होऊन कांद्याच्या तोंडातून मोड येणे किंवा वजनात घट होण्यासारखे प्रकार आहेत ते टाळता येतात.
3- कांदा चाळीत भरण्याअगोदर तीन आठवडे झाडाच्या सावलीत वाळवणे- कांदा तीन आठवडे सावलीत चांगला वाळल्यानंतर कांद्यामध्ये साठलेली उष्णता हळूहळू बाहेर पडते व कांद्याच्या बाहेरील साली मध्ये असलेले पाणी पूर्णपणे सुकते व त्याचे पापुद्रात रूपांतर होते. हे कांद्याचे पापुद्रे साठवणुकी मध्ये कांद्याचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात.
कांद्यामध्ये असलेले जास्तीचे पाणी व उष्णता निघून गेल्यामुळे कांदा सडत नाही व कांद्याच्या बाहेर पापुद्रा तयार झाल्यामुळे वातावरणातील आद्रता व रोग तसेच किडीपासुन कांद्याचा बचाव होतो.
तसेच बाष्पीभवन रोखले गेल्यामुळे साठवणुकीत कांद्याच्या वजनात घट येत नाही. त्यामुळे हे तीन तंत्र बरेच शेतकरी वापरतात परंतु अजूनही काही शेतकरी वापरत नाहीत. त्यामुळे या तीन तंत्रांचा वापर करावा व चार ते सहा महिन्यांपर्यंत कांदा चांगला टिकवावा.
नक्की वाचा:Manure Use! शेणखत वापरतात परंतु कसे?असेल न कुजलेले तर पिकांवर होईल दुष्परिणाम,वाचा माहिती
Published on: 28 July 2022, 05:39 IST