पिकांची पेरणी किंवा लागवड करीत असताना बियाणे किंवा रोपे निरोगी आणि सक्षम असणे खूप गरजेचे आहे. कारण आपल्याला माहित आहेच की, दर्जेदार बियाणे आणि निरोगी रोपे म्हणजे भविष्यकालीन आपल्या हातात येणाऱ्या उत्पादनाची एक गुरुकिल्ली असते. आता आपण कांद्याच्या बाबतीत विचार केला तर कांद्याचे रोपवाटिका आधी तयार करून नंतर त्यांची पुनर्लागवड केली जाते हे सगळ्यांना माहिती आहे.
परंतु कांद्याचे रोपवाटिका करताना तिचे व्यवस्थापन हे उत्तमरीत्या होणे खूप गरजेचे आहे. म्हणजे तयार रोपे जर सुदृढ आणि निरोगी असतील तर निश्चितच कांद्याचे उत्पादन देखील भरघोस येईल यात शंकाच नाही.या दृष्टिकोनातूनच आपण या लेखामध्ये कांद्याचे रोपवाटिका व्यवस्थापन कशा पद्धतीने करावे,त्याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत.
कांद्याचे रोपवाटिका व्यवस्थापन
1- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही आदल्या वर्षी ज्या जागेवर रोपवाटिका टाकली असेल त्या जागेची फेरपालट करणे खूप गरजेचे आहे.
2- जमिनीची निवड करताना ती पाण्याचा उत्तम निचरा होणारी,वालुकामय चिकन माती त व सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध असलेली जमीन निवडावी.
3- जमिनीची चांगली नांगरट करून व वखरणी करून जमीन चांगली भुसभुशीत करून घ्यावी पिकांचे अवशेष असतील तर ते उचलून जमीन स्वच्छ करावी.
4- आता तुम्हाला रोपवाटिकेसाठी वाफे बनवायचे असतील तर ते खरीप हंगामासाठी गादीवाफ्यावर रोपवाटिका ही खूप फायद्याचे ठरते. वाफे तयार करताना तीन मीटरपर्यंत लांबी एक ते दीड मीटरपर्यंत रुंदी आणि जमिनीपासून पंधरा ते वीस सेंटीमीटर उंची असणे गरजेचे आहे.
5- पाणी व्यवस्थापन करायचे असेल तर स्प्रिंकलर किंवा ठिबकची व्यवस्था असेल तर खूप फायद्याचे ठरेल.
6- व्यवस्थापन करताना प्रत्येक वाफ्याला आठ ते दहा किलो चांगले कुजलेले शेणखत, 150 ग्रॅम 19:19:19 आणि त्यासोबत 50 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड वाफे तयार करतानाच मातीमध्ये चांगल्या पद्धतीने मिसळून घ्यावे.
7- रोपवाटिकेसाठी कांद्याचे बियाणे टाकल्यानंतर तीन ते चार दिवसांनी ट्रायकोडर्मा एक किलो प्रती एकर पाट पाण्याद्वारे ड्रेचिंग करून घ्यावे किंवा ट्रायकोडर्मा व्हर्जीयानम 30 ग्रॅम प्रति वाफ्याला सेंद्रिय खतात मिसळून द्यावे.
8- पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास दोन ते तीन ग्रॅम कॅप्टन किंवा कार्बेन्डाझिम याची बीजप्रक्रिया करणे खूप गरजेचे आहे. बीजप्रक्रिया घरगुती बियाण्यासाठी करावी. जर पॅकेट बंद बियाणे असेल तर त्यावर आधीच बीजप्रक्रिया केलेली असते त्यामुळे पुन्हा बीज प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही.
9- कांद्याचे रोप उतरल्यानंतर त्यामध्ये तणांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी दोन ते तीन खूरपण्या करणे गरजेचे असते. परंतु तुम्हाला तणनाशक वापरायचे असेल तर पेरणीनंतर परंतु उगवण होण्यापूर्वी प्रत्येक वाफ्यावर पेंडीमेथिलिन2 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करून घ्यावी.
10- कांद्याचे रोपावर फुल किडीचा प्रादुर्भाव जाणवत असेल तर फिप्रोनील(5 ईसी) 1 मिली किंवा प्रोफेनोफोस 1 मिलीप्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करणे गरजेचे आहे.
11- ढगाळ वातावरण किंवा दव पडत असेल तर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. करपा देखील येण्याची दाट शक्यता असते, यासाठी करपा रोगाच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब अडीच ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
तसेच कांद्याच्या रोपाची मुळे सडत असतील तर त्यांच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड तीन ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे रोपांच्या ओळीत आळवणी करावी.
12- खत व्यवस्थापन करताना कांद्याचे बियाणे टाकल्यानंतर साधारणतः 20 दिवसांनंतर 19:19:19 दोन ग्रॅम प्रति लिटर आणि जस्त,लोह, तांबे आणि बोरॉन यासारख्या सुक्ष्म अन्नद्रव्यांचे मिश्रणाची एक ते दोन ग्रॅम प्रति लिटर फवारणी करावी.
Published on: 20 August 2022, 01:10 IST