Agripedia

वनस्पती व प्राणी यांच्या अवशेषापासून जे खत तयार होते त्याला सेंद्रिय खत म्हणतात.

Updated on 31 January, 2022 1:25 PM IST

वनस्पती व प्राणी यांच्या अवशेषापासून जे खत तयार होते त्याला सेंद्रिय खत म्हणतात.

 सेंद्रिय खतांमध्ये महत्त्वाची खते म्हणजे, शेणखत, कंपोस्ट खत, हिरवळीची खते, गांडूळ खते, माश्यांचे खत, खाटिकखान्याचे खत, इत्यादी.

 

 शेणखत: 

गाईम्हशींचे शेण, मूत्र, गोठ्यातील पालापाचोळा इत्यादी घटकांपासून तयार होणाऱ्या खताला शेणखत म्हणतात. 

त्यामध्ये नत्र, स्फुरद व पालाश असते. 

शेणाचा महत्त्वाचा उपयोग बायोगॅसमध्ये ऊर्जा निर्मितीसाठी होतो आणि शिल्लक राहिलेले पातळ शेण पिकांच्या वाढीसाठी पोषक अन्नद्रव्य म्हणून वापरता येते.

कंपोस्ट खत : 

शेतातील गवत, पिकांचे कापणीनंतर उरलेले अवशेष, भुसा, उसाचे पाचट, कापसाची धसकटे इ. सेंद्रिय पदार्थांचे सूक्ष्मजीवजंतूंमुळे विघटन होऊन त्यातील कार्बन नत्राचे प्रमाण कमी होते व चांगला कुजलेला पदार्थ तयार होतो त्याला कंपोस्ट म्हणतात. 

यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश असते.

 हिरवळीची खते : 

लवकर वाढणाऱ्या पिकांची निवड करून, त्यांची दाट पेरणी करून पीक फुलोऱ्यावर येण्याच्या आधी ते नांगराच्या सहाय्याने जमिनीत गाडतात.

त्यापासून जमिनीला नत्र मिळते, जमिनीचा पोत सुधारतो व ती सुपीक बनते. अशा खतांना हिरवळीचे खत म्हणतात.

गाडलेल्या पिकांना कुजण्य़ासाठी दीड ते दोन महिन्यांचा कालवधी लागतो. 

ताग, धैच्या, मूग, चवळी, गवार, शेवरी, बरसीम, ग्लीिरिसिडीया तागापासून नत्राचा पुरवठा ५ ते ६ आठवड्यात होतो. 

मुगाचा पालापाचोळा जमिनीत गाडल्यामुळे गव्हाच्या उत्पादनात चांगली वाढ होते.

 

 गांडूळ खत - 

ह्या खतात गांडुळाची विष्ठा, नैसर्गिकरीत्या कुजलेले पदार्थ, गांडुळाची अंडीपुंज, बाल्यावस्था आणि अनेक उपयुक्त जीवाणूंचा समावेश असलेल्या खताला गांडूळ खत म्हणतात.

माशाचे खत - 

समुद्रकिनारी वाया गेलेल्या माशांपासून तसेच माशाचे तेल काढल्यानंतर उरलेल्या अवशेषापासून जे खत तयार होते ते. ह्यात नत्र, स्फुरद आणि पालाश यांचे प्रमाण भरपूर असते.

 खाटीकखान्याचे खत : 

जनावरांचे रक्त व अवशेषापासून जे खत बनवितात त्याला खाटीकखान्याचे खत म्हणतात. यात नत्र आणि स्फुरद चांगल्या प्रमाणत असते.

English Summary: This is Organic fertilizer type
Published on: 31 January 2022, 01:25 IST