Agripedia

उद्यानविद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी,

Updated on 17 June, 2022 8:20 PM IST

उद्यानविद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, अहमदनगर येथील तज्ज्ञ दत्तात्रेय जगताप यांनी दिलेली माहिती बहर धरणे म्हणजे झाडांना पाण्याचा ताण देऊन विश्रांती देणे. लिंबू पिकाला बारमाही ओलित लागत असल्याने वर्षातून तीन वेळा म्हणजेच जून - जुलै, सप्टेंबर - ऑक्‍टोबर आणि जानेवारी - फेब्रुवारीत अनियंत्रितपणे फुलोरा येतो. या फुलांचे प्रमाण अनुक्रमे 36, 15 व 49 टक्के एवढे असते. लिंबूत विशिष्ट बहर धरणे शक्‍य असले तरी आर्थिकदृष्ट्या ते फायदेशीर ठरत नाही. कारण, एखाद्या विशिष्ट बहरासाठी ताण दिला, तर त्या वेळी अगोदरच्या बहराची फळे अपक्व स्थितीतच गळून पडतात.

उदा. मृग बहर घेतल्यास झाडावर आंबे बहराची फळे दोन ते 2.5 महिन्यांची असतात. आंबे बहर घेतल्यास झाडावर हस्त बहराची फळे वाटाण्याएवढी असतात, ती पाण्याच्या ताणामुळे गळून जाण्याचा धोका असतो. त्यामुळे ताण देण्याच्या पद्धतीचा वापर करून एखादा विशिष्ट बहर धरणे लिंबूस शक्‍य होत नाही. त्यामुळे जुलै - ऑगस्ट दरम्यान 60-65 टक्के फळे मिळतात.कागदी लिंबू फळांना उन्हाळ्यात चांगला भाव मिळतो. लिंबू लागवडीचे अर्थशास्त्र हे प्रत्येक बहरापासून मिळणारे उत्पादन व बाजारभाव यावर अवलंबून असते. मार्च, एप्रिल व मे महिन्यात लिंबू फळांना मागणी जास्त असते, त्यामुळे त्या काळात बाजारभावही चांगला असतो. 

म्हणून एप्रिल व मे महिन्यात लिंबू फळांचे उत्पादन घेण्यासाठी हस्त बहराचे नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.हस्त बहर व्यवस्थापन हस्त बहर धरण्यासाठी कागदी लिंबू झाडांना ऑगस्ट - सप्टेंबरमध्ये पाण्याचा ताण द्यावा लागतो; परंतु या वेळी जर पाऊस असेल तर बागेला ताण बसत नाही, तसेच हवामान प्रतिकूल असल्यास फुलोऱ्याचे प्रमाण कमी मिळते. सप्टेंबर - ऑक्‍टोबरमध्ये फुलोऱ्याचे प्रमाण फक्त 10 ते 15 टक्के असते.फुलोऱ्याचे प्रमाण वाढविण्यासाठी ऑगस्ट महिन्यामध्ये सायकोसिल या संजीवकाच्या 1000 पी.पी.एम. तीव्रतेच्या दोन फवारण्या एका महिन्याच्या अंतराने करून ऑक्‍टोबरमध्ये एन.ए.ए. या संजीवकाची 10 ते 15 पी.पी.एम. तीव्रतेची फवारणी करावी.

राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळे संशोधन केंद्र, नागपूर येथे घेण्यात आलेल्या प्रयोगामध्येही सायकोसिल या संजीवकाच्या 1500-2000 पी.पी.एम.च्या ऑगस्ट महिन्यात दोन फवारण्यांची शिफारस केलेली आहे.महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी; डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला आणि अखिल भारतीय समन्वित लिंबूवर्गीय फळे संशोधन प्रकल्प, तिरुपती येथे घेण्यात आलेल्या प्रयोगांमध्ये हस्त बहरामध्ये फुलोऱ्याचे प्रमाण वाढविण्यासाठी जून महिन्यात 50 पी.पी.एम. जिब्रेलिक ऍसिड, सप्टेंबर महिन्यात 1000 पी.पी.एम. सायकोसिल व ऑक्‍टोबर महिन्यात एक टक्का पोटॅशियम नायट्रेटची फवारणी केल्यास फुलोऱ्याचे प्रमाण वाढून उत्पादनात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

English Summary: This is information about Lemon Deaf
Published on: 17 June 2022, 08:17 IST