मागच्या खरीप हंगामामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची तक्रार होती की सोयाबीनची पाने पिवळी पडत आहेत. तसे पाहायला गेले तर दरवर्षी सोयाबीनचेच नव्हे तर बऱ्याच पिकाची पाने पिवळी पडतात. ती पाने पिवळी पडण्यामागे बरीच वेगवेगळ्या प्रकारची कारणे असतात.
नेमकी ही कारणे हेरून त्यावर उपाययोजना करणे खूप गरजेचे असते. या लेखामध्ये आपण काही सोयाबीनची पाने पिवळी पडण्यामागची प्रमुख कारणे पाहू. जेणेकरून शेतकऱ्यांना उपाययोजना करताना त्याचा फायदा होईल.
सोयाबीनची पाने पिवळी पडण्याची प्रमुख कारणे
1- पीक लागवडीनंतर जेव्हा पीक वाढीच्या अवस्थेत असते त्यामुळे पाण्याचा ताण किंवा अपुरा पाऊस या कारणांमुळे जमिनीतील ओलावा कमी होतो किंवा पूर्णतः नष्ट होतो.
त्यामुळे पिकाला वाढीसाठी लागणारे आवश्यक पाणी व अन्नद्रव्यांचे कमतरता उद्भवते व त्याचे परिणाम हे सोयाबीनचे पाने पिवळी पडण्यावर दिसू लागतो.
2- बऱ्याचदा नेमके याच्या उलट होते. म्हणजे होते असे की, जास्त पाऊस पडल्यामुळे जमिनीमध्ये अधिक काळ जास्त ओलावा राहतो व त्यामुळे जमीन संपृक्त होते.
अशा परिस्थितीमध्ये मातीत हवा खेळती राहत नसल्यामुळे मुळाना शारीरिक क्रिया जसे की श्वासोच्छ्वास घेण्यास अडथळा येतो. त्यामुळे त्यांना जमिनीतील आवश्यक पोषणद्रव्ये शोषून घेता न आल्याने शेंड्याकडील पाने पिवळी पडतात.
3- जेव्हा सतत पाऊस पडत राहतो, त्यामुळे शेतीच्या आंतरमशागतीसाठी वेळ मिळत नाही त्यामुळे जमिनीत डवरणी करता न आल्याने ओलावा कायम टिकून राहतो. त्यामुळे अति ओलाव्याने देखील पाने पिवळी पडतात.
4- बऱ्याचदा जमिनीचा सामू अधिक आम्लधर्मी असल्यामुळे देखील अशा जमिनीतील ओलावा असल्यामुळे पाने पिवळी पडतात.
5- सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे जमिनीतील अन्नद्रव्यांची कमतरता ही होय. जर जमिनीमध्ये मुख्य अन्नद्रव्य जसे की नत्र, पालाश आणि दुय्यम अन्नद्रव्य लोह यांची कमतरता भासल्याने देखील पाने पिवळी पडतात.
नक्की वाचा:निलगिरी लागवड शेतकऱ्यांना बनवणार मालामाल; मात्र या गोष्टींची काळजी घ्या
6- बरेचदा पावसाची रिपरिप बरेच दिवस सुरू राहिल्यामुळे आकाशात कायम ढगाळ वातावरण राहिल्यामुळे देखील पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नसल्याने वनस्पतींची प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते व त्यामुळे देखील पाने पिवळी पडतात.
7- जेव्हा जमिनीमध्ये जास्त प्रमाणात ओलावा टिकून राहतो तेव्हा नत्राच्या गाठी तयार होत नसल्याने नत्राची कमतरता पिकांना भासते व पिकाची पाने पिवळी पडतात.
8- तसेच वेगवेगळे प्रकारचे सोयाबीन वरील रोग व किडींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास देखील पाने पिवळी पडण्यास सुरुवात होते. उदाहरणच द्यायचे झाले तर पिवळा मोजॅक या रोगामुळे सुद्धा पाने पिवळी पडतात.
तसेच मुळकुज व मर या रोगांचा प्रादुर्भाव जास्त झाला तर पाणी पिवळी पडतात. या रोगांच्या प्रादुर्भावात सोयाबीनची पाने झाडाच्या खालच्या दिशेने झुकतात. खोडमाशीचा प्रादुर्भाव झाला तर सुरुवातीला सोयाबीनच्या शेंड्याकडील तीन पाने पिवळी होऊन झाड सुकायला सुरुवात होते.
Published on: 15 June 2022, 01:06 IST