जर आपण शेतकऱ्यांचा विचार केला तर टोमॅटो लागवड फार मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात केली जाते. जर आपण टोमॅटो लागवडीचे प्रामुख्याने विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये टोमॅटोची लागवड फारच केली जाते. टोमॅटो लागवड करताना शेतकरी बंधू आता अनेक विविध प्रकारचे तंत्रज्ञानाचा वापर करून भरपूर उत्पादन काढतात हे देखील तेवढेच सत्य आहे. परंतु अशा बऱ्याच छोट्या छोट्या परंतु महत्त्वाच्या बाबी असतात, त्यामुळे अजून देखील टोमॅटोचे अपेक्षित उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडत नाही.
सध्या जर आपण विचार केला तर खुल्या क्षेत्रात आणि बऱ्याचदा पॉलिहाऊसमध्ये संरक्षित पद्धतीने देखील टोमॅटोची लागवड केली जाते. जे शेतकरी कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन काढण्यासाठी प्रयत्नशील असतात
ते नक्कीच पॉलिहाऊसमध्ये विविध प्रकारच्या पिकांची लागवड करून कमी खर्चामध्ये दुप्पट उत्पादन घेतात. त्यामुळे ग्रीन हाऊसमध्ये टोमॅटोची लागवड एक चांगला पर्याय शेतकरी बंधूंसाठी ठरू शकतो. या लेखात याबद्दल आपण माहिती घेऊ.
टोमॅटो शेतीसाठी ग्रीनहाऊसच का?
जर आपण टोमॅटो लागवडीचा विचार केला तर उन्हाळ्यामध्ये जास्त तापमान आणि हिवाळ्यामध्ये धुके इत्यादी वातावरणातील बदलांमुळे टोमॅटोच्या उत्पादनात घट येते. तसेच तुम्हाला टोमॅटो लागवडीतून दर्जेदार उत्पादन हवे असेल तर तापमान देखील 16 ते 22 अंश सेल्सिअस पर्यंत असणे गरजेचे असते.
या ज्या काही दोन प्रमुख टोमॅटोच्या बाबतीतल्या समस्या आहेत, त्या समस्यांवर मात करण्यासाठी ग्रीन हाऊस ही कल्पना शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरते.
सर्वप्रथम वाणाची निवड ठरेल महत्त्वपूर्ण
तुम्हाला ग्रीन हाऊसमध्ये टोमॅटो लागवड करायची असेल तर त्यासाठी पुसा दिव्या,अभिमान, पंत बहार, अर्का रक्षक, पुसा चेरी टोमॅटो एक, लक्ष्मी, एन डी टी 120,एनडीटी 5,एचटी 6 या व इतर महत्त्वाच्या जाती उपयुक्त ठरतील.
अशा पद्धतीने करावी लागवड
ग्रीन हाउस किंवा पॉलिहाऊसमध्ये संरक्षित रचनेत टोमॅटो लागवडीसाठी अगोदर रोपवाटिकेमध्ये सुधारित बियाण्यांचा वापर करून रोपे तयार केली जातात व त्यांची पुनर्लागवड केली जाते. रोपवाटिकेसाठी 80 ते 100 ग्रॅम टोमॅटोचे बियाणे प्रति एकर बेडमध्ये लावले जाते.
त्यानंतर लागवड झाली आणि पाच ते सहा आठवड्यांनी रोपे तयार होता तो पुनर्लागवड केली जाते. जेव्हा रोपांची पुनर्लागवड करण्यात येते तेव्हा उंच वाफे किंवा बेड तयार केले जातात. यासाठी महत्त्वाचे म्हणजे 1000 चौरस मीटरच्या ग्रीन हाऊसमध्ये टोमॅटो लागवड करायची असेल तर सुमारे 2 हजार 400 ते 2600 रोपे लावली जातात.
ग्रीनहाऊसमधील व्यवस्थापन
हरितगृहामध्ये तुम्ही जर टोमॅटो लागवड केली तर वातावरणाच्या संबंधित याची काही चिंता असते ती दूर होण्यास मदत होते. परंतु तुम्हाला वेळोवेळी निरीक्षण करणे गरजेचे असून टोमॅटोचे उत्पादन ग्रीन हाउस मध्ये घेण्यासाठीठिबक सिंचनाचा वापर करावा.
त्यामुळे विद्राव्य खतांचा वापर देखील करता येतो व पाणी व्यवस्थित मिळाल्याने झाडांची वाढ जोमदार होते व उत्पादन देखील वाढते. टोमॅटोच्या झाडाला नायलॉन दोरी किंवा बांबूचा आधार द्यावा.
तणनियंत्रण करण्यासाठी निरीक्षण करून वेळोवेळी खुरपणी करणे गरजेचे असून कंपोस्ट खताचा आणि युरियाचा वापर देखील नियोजनाने करावा. शिफारसी विद्राव्य खतांचा वापर तज्ज्ञांच्या सहाय्याने करावा.
तसेच कीटकांचा किंवा काही रोग किंवा बुरशींचा प्रादुर्भाव दिसल्यास कडुलिंब आधारित कीटकनाशके किंवा ट्रायकोडर्मा देखील वापरता येते.
ग्रीन हाऊसमधील टोमॅटो शेतीचा खर्च आणि उत्पन्न
1000 स्क्वेअर मीटर परिसरात ग्रीनहाऊस बसवण्यासाठी तुम्हाला दहा लाख रुपये खर्च येतो. यामध्ये विशेष बाब म्हणजे सरकारकडून यावर सबसिडीही मिळते. या माध्यमातून कमीत कमी पाचशे चौरस मीटर मध्ये हरितगृह लावून तुम्ही टोमॅटोचा व इतर भाजीपाला पिके घेऊ शकतात.
ग्रीन हाऊसमध्ये टोमॅटो लागवडीच्या माध्यमातून तुम्ही चेरी टोमॅटोच्या दोन ते तीन टनांपर्यंत उत्पादन घेऊ शकतात व इतर जातींची लागवड केली तर वर्षाला 10 ते 15 टन 1000 चौरसमीटर क्षेत्रात उत्पादन मिळू शकते.
Published on: 05 October 2022, 10:57 IST