Agripedia

बऱ्याच वेळा रासायनिक बुरशीनाशके वापरून देखील अपेक्षित परिणाम मिळत नाही.

Updated on 20 July, 2022 5:57 PM IST

बऱ्याच वेळा रासायनिक बुरशीनाशके वापरून देखील अपेक्षित परिणाम मिळत नाही. तेव्हा पीक लागवडीपासूनच ट्रायकोडर्माचा वापर करणे फायदेशीर ठरते. ट्रायकोडर्मा बुरशीचा वापर आळवणी, शेणखत, तसेच ठिबक सिंचनाद्वारे करता येतो पिकावरील रोगनियंत्रणासाठी रासायनिक बुरशीनाशकांचा वापर शेतकरी मोठ्या प्रमाणात करतात. जमिनीद्वारे, बियांमार्फत पसरणाऱ्या रोगांच्या नियंत्रणासाठी जमिनीत बियाण्याच्या, रोपांच्या मुळांच्या सान्निध्यात रासायनिक बुरशीनाशकांचा वापर करावा लागतो. परंतु जमिनीत रासायनिक बुरशीनाशकांची कार्यक्षमता जास्त काळ टिकून राहत नाही, तसेच त्यामुळे जमिनीतील सूक्ष्मजिवांच्या कार्यक्षमतेवर देखील विपरीत परिणाम होतो. सेंद्रिय पीकपद्धतीमध्ये ट्रायकोडर्मा ही बुरशी मोठ्या प्रमाणात वापरली जाते. निसर्गतः ट्रायकोडर्मा जमिनीत उपलब्ध असते. 

नैसर्गिकरीत्या रोग- किडींचे नियंत्रण होत असते. परंतु बदलत्या हवामानामुळे, पीकपद्धतीमुळे, वाढत्या सिंचनामुळे जमिनीतील रोगकारक बुरशींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बऱ्याच वेळा रासायनिक बुरशीनाशके वापरून देखील अपेक्षित परिणाम मिळत नाही. तेव्हा पहिल्यापासून ट्रायकोडर्माचा वापर करणे आवश्‍यक आहे. ट्रायकोडर्मा बुरशीचा वापर आळवणी (ड्रेंचिंग), शेणखतात आणि ठिबक सिंचनाद्वारे करता येतो.ट्रायकोडर्माची ओळख - ट्रायकोडर्मा ही एक उपयुक्त बुरशी असून, सेंद्रिय पदार्थांच्या सान्निध्यात चांगल्या प्रकारे वाढते. ही बुरशी मातीमध्ये वाढणारी, परोपजीवी तसेच इतर रोगकारक बुरशींवर जगणारी अशी आहे. या बुरशीच्या 70च्या आसपास प्रजाती आढळतात. त्यापैकी ट्रायकोडर्मा व्हीरीडी, ट्रायकोडर्मा हरजानियम या मोठ्या प्रमाणात जैविक नियंत्रणात वापरल्या जातात. प्रयोगशाळेत या बुरशींची कृत्रिम माध्यमावर वाढ करून व्यावसायिक उत्पादन घेतले जाते.

उपयोग -1) जमिनीत असणाऱ्या हानिकारक, रोगकारक बुरशी - जसे फायटोप्थोरा, फ्युजॅरिअम, पिथिअम, मॅक्रोफोमिना, स्क्‍लेरोशिअम, रायझोक्‍टोनिया इत्यादींचा बंदोबस्त करण्यासाठी ट्रायकोडर्माचा वापर करणे फायद्याचे ठरते. या रोगकारक बुरशींमुळे टोमॅटो, मिरची, वांगी, कांदा यामध्ये मूळकूज, कॉलर रॉट, डाळिंबामध्ये मर रोग इत्यादी रोग होतात, त्यामुळे पिकाचे नुकसान होते.2) ट्रायकोडर्मा जमिनीत मंद गतीने वाढत असल्या कारणाने दुसऱ्या अपायकारक बुरशींवर उपजीविका करून त्यांची वाढ नियंत्रणात ठेवते. 3) ट्रायकोडर्मा दुसऱ्या बुरशींवर उपजीविका करताना ट्रायकोडर्मिन,While Trichoderma subsists on other fungi, Trichodermin, ग्लियोटॉक्‍सिन, व्हिरीडीन यासारखी प्रतिजैविके म्हणजे हानिकारक बुरशींसाठी विषकारक घटक निर्माण करते. तसेच, या बुरशीमुळे सेंद्रिय पदार्थ देखील कुजवून सेंद्रिय खत निर्मितीत ट्रायकोडर्मा मदत करते.4) या बुरशीचा वापर शेडनेट, पॉलिहाऊसमधील भाजीपाला लावताना, फुलपिके लावताना, बेड भरताना, शेणखतात, मातीमध्ये मिसळून, नर्सरीत रोपे टाकण्यापूर्वी आळवणीकरिता करता येऊ शकतो. त्यामुळे मूळकूज, कंदकूज, मर रोग, खोड

सडणे, कॉलर रॉट, बियाणेकूज इत्यादी रोगांचा बंदोबस्त होतो. ट्रायकोडर्माचा वापर सुडोमोनॉस फ्लुरोसन्स, पॅसिलोमायसिस यांच्याबरोबर प्रभावीपणे सूत्रकृमी नियंत्रणासाठी केला जाऊ शकतो. 5) डाळिंब बागेत मर रोग व सूत्रकृमी नियंत्रणासाठी ट्रायकोडर्माचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. ट्रायकोडर्मा वनस्पतीच्या मुळांच्या कार्यक्षेत्रात वाढताना थोड्याफार प्रमाणात अन्नद्रव्ये देखील उपलब्ध करून देते, तसेच रोपांच्या वाढीसाठी उपयुक्त स्राव देखील सोडते, त्यामुळे रोपांची वाढ जोमदार होते.असा करा ट्रायकोडर्माचा वापर - 1) प्रयोगशाळेत ट्रायकोडर्मा द्रवरूपात व भुकटी स्वरूपात तयार केली जाते. जास्तकरून पावडर स्वरूपातील उत्पादने मातीमध्ये शेणखतातून, सेंद्रिय खतातून मोठ्या प्रमाणात वापरली जातात; तसेच पाण्याद्वारे देखील ठिबक सिंचनातून जमिनीत देता येते. रोपांची पुनर्लागवड करतेवेळी मुळे ट्रायकोडर्माच्या द्रावणात बुडवून मगच लावावीत. 

2) बीजप्रक्रिया करताना ट्रायकोडर्माची भुकटी एक किलो बियाण्यास एक ग्रॅम या प्रमाणात चोळावी. डाळिंबामध्ये ठिबकखाली 50 ते 100 ग्रॅम पावडर शेणखतामध्ये मिसळून टाकावी. शेडनेटमध्ये बेड भरताना ट्रायकोडर्मा एक - दोन ग्रॅम प्रति चौ. मीटर या प्रमाणात टाकावे. याचा वापर शेणखत, सेंद्रिय खत, निंबोळी पेंड यांच्यासोबत केल्यास चांगल्या प्रकारे फायदा होतो. ओलावा उपलब्ध असताना सेंद्रिय पदार्थात, शेणखतात ट्रायकोडर्मा वाढते. 3) साधारणपणे 100 किलो चांगल्यापैकी कुजलेल्या शेणखतात एक किलो ट्रायकोडर्मा भुकटी मिसळून घ्यावी. असे मिश्रण शेतात पेरणीपूर्वी वापरता येते. कांदा पिकात होणारी पांढरी सड, तळकुजव्या रोग, मर रोग इत्यादी रोगांच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा भुकटी रोपे टाकण्यापूर्वी व रोपे लागवडीपूर्वी मुख्य शेतात मिसळून घ्यावी.4) सेंद्रिय पदार्थांचा जमिनीतील वापर वाढवल्यास ट्रायकोडर्मा वाढीसाठी अनुकूल वातावरण तयार होते. गांडूळ खत वापरताना त्यामध्ये ट्रायकोडर्मा भुकटी मिसळून घ्यावी. जमिनीचा सामू (पी.एच.) हा 6.5 ते 7.5 च्या दरम्यान असल्यास ट्रायकोडर्माचा परिणाम चांगल्या प्रकारे मिळतो.5) रोपवाटिकेत ट्रायकोडर्मा भुकटीचा वापर जास्त प्रमाणात केल्यास रोपांची रोपावस्थेत, पुनर्लागवडीनंतर होणारी मर थांबवता येते.

भाजीपाला पिकांच्या रोपांची पुनर्लागवड झाल्यानंतर रोपांच्या मुळांच्या कार्यक्षेत्रात ट्रायकोडर्माची आळवणी करून घ्यावी. त्यामुळे मर (डॅम्पिंग ऑफ) रोगाचा प्रादुर्भाव थांबवता येईल.6) ट्रायकोडर्माचा वापर करण्यापूर्वी व केल्यानंतर 15 दिवसांपर्यंत रासायनिक बुरशीनाशकांचा वापर थांबवावा, त्यामुळे ट्रायकोडर्माचा परिणाम चांगला मिळतो. पानांवरील रोगकारक बुरशींच्या नियंत्रणासाठी देखील ट्रायकोडर्माची फवारणी फायदेशीर ठरते आहे; परंतु त्यासाठी बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण शेतात उपलब्ध असणे आवश्‍यक असते.ट्रायकोडर्मा खरेदी करताना घ्यावयाची काळजी -खात्रीलायक ट्रायकोडर्मा विकत घ्यावे. त्यातील सी.एफ.यू. हा कमीत कमी 2 x 10 6 प्रति ग्रॅम किंवा मि.लि. असावा. साठवणूक चांगल्या प्रकारे केलेली असावी, तसेच त्यावर उत्पादनाची तारीख व वापरण्यायोग्य कालावधी छापलेला असावा. त्यामुळे मुदतबाह्य उत्पादन घेऊन फसवणूक होण्याची शक्‍यता कमी असते. खरेदी करण्यात येणारे उत्पादन हे केंद्रीय कीडनाशक मंडळाकडे नोंदणीकृत असावे, त्यावर उत्पादन परवाना क्रमांक लिहिलेला असावा. खरेदीच्या वेळी पक्‍क्‍या बिलाचा आग्रह धरावा. अशा प्रकारे जैविक कीड- रोग नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा वापरणे फायद्याचे ठरते.

English Summary: This is how Trichoderma controls many diseases
Published on: 20 July 2022, 05:57 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)