पालेभाज्या लागवडीसाठी पुरेशा पाण्याची आवश्यकता आहे. पालेभाज्यांची लागवड थोडी थोडी, पण सातत्याने करावी. त्यामुळे बाजारपेठेच्या मागणीनुसार पालेभाज्यांचा पुरवठा करता येतो.
पालक, कोथिंबीर, मेथी, शेपू या भाज्यांची लागवड नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत टप्प्याटप्प्याने करावी.
1) पालेभाज्या लागवडीसाठी मध्यम, कसदार आणि मध्यम खोलीची जमीन निवडावी. सेंद्रिय खतांचे भरपूर प्रमाण आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी.
2) जमिनीची मशागत करून चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. जमिनीच्या उतारानुसार 3x2 मीटर आकाराचे सपाट वाफे बांधून घ्यावेत.
3) सपाट वाफ्यामध्ये 20 ते 30 सें.मी. अंतरावर ओळी पाडून त्यामध्ये बी पेरावे. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 3 ग्रॅम कॅप्टनची बीजप्रक्रिया करावी. पेरणीनंतर लगेच हलके पाणी द्यावे. बियाणे ओळीत पेरल्यास खुरपणी करणे सोपे होते. तसेच काढणी करणे सोपे जाते.
4) भाजीचा सतत पुरवठा होण्यासाठी 10 ते 15 दिवसांच्या अंतराने हप्त्याहप्त्याने पेरणी करावी.
5) पेरणी अगोदर धने रगडून त्याचे दोन भाग करावेत. पेरणीपूर्वी बी रात्रभर पाण्यात भिजवून नंतर चांगले सुकवून पेरणी केल्यास उगवण लवकर (90 दिवसांत) होते.
6) मेथी पेरणीनंतर चार दिवसांत उगवते. तर कसूरी मेथीची उगवण होण्यास 6 ते 7 दिवस लागतात.
7) राजगिऱ्याचे बी वाळलेली माती किंवा बारीक वाळू मिसळून पेरणी करावी. उगवणीनंतर आवश्यकतेप्रमाणे खुरपणी करून, तण काढून पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
8) पालकाची पूर्ण वाढलेली हिरवी कोवळी पाने 15 ते 30 सें.मी. उंचीची झाल्यावर पानांच्या देठाचा जमिनीपासून 5 ते 7.5 सें.मी. भाग ठेवून वरील भाग खुडून अथवा कापून घ्यावा
9) मेथी, कोथिंबीर या पालेभाज्यांची काढणी पाने कोवळी लुसलुशीत असतानाच करावी.
- विनोद धोंगडे नैनपुर
Published on: 09 October 2021, 09:06 IST