कंदवर्गीय पिकांपासून अधिक उत्पादन घेण्याच्या दृष्टीने पिकांच्या विविध अवस्थेमध्ये योग्य नियोजन व व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. सध्याच्या स्थितीत खरीप हंगामातील सर्व कंद पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. या काळात तणनियंत्रण, वेलींना दिशा देणे, खते देणे आवश्यक आहे.
करांगा, कणगर, घोरकंद -
1) करांदा, कणगर, घोरकंद या पिकांच्या वेलींना योग्य आधाराची गरज असते, त्यामुळे वेलींच्या चांगल्या वाढीसाठी वेली सारख्या करणे, वेलींना दिशा देणे महत्त्वाचे आहे. सध्या वाढीच्या काळात पुरेसा आधार नसलेल्या ठिकाणी वेलींना आधार द्यावा
2) पिकांमधील वाढलेले गवत काढून पीक तणमुक्त ठेवावे. त्यानंतर पिकांना जोरखतांची मात्रा देऊन वरंब्यावर भर द्यावा.
3) करांदा पिकाच्या वेलीवर बल्बील्स तयार होण्यास सुरवात झाली असेल. या वेळी पाने खाणारी किंवा फळे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. यावर लक्ष ठेवावे.
भाजीचा अळू, सुरण आणि वडीचा अलू
1) पिकात बेणणी करून घ्यावी.
2) या पिकांना शिफारशीत रासायनिक खत मात्रेतील नत्र आणि पालाशची 1/3 मात्रा आळे करून द्यावी. त्यानंतर मातीची भर द्यावी.
3) सद्यःस्थितीत पिकांच्या वाढीची अवस्था असल्याने पानांची मोठ्या प्रमाणात निर्मिती व वाढ होताना दिसते.
5) विषाणूजन्य रोगाची लागण झालेली झाडे काढून नष्ट करावीत.
6) वडीच्या अळू पाने तयार झाल्यास काढणी करावी.
रताळी
1) रताळीच्या वेलीची वाढ जोमदारपणे होते. वेली जमिनीवर पसरलेल्या असतात. जमिनीवर टेकलेल्या वेलींवरील प्रत्येक डोळ्याजवळ मुळे तयार होत असतात. मात्र अशी मुळे तयार झाल्याने मुख्य कंद पोसला जात नसतो, त्यामुळे वेळी या दर पंधरवाड्यानंतर उचलून पुन्हा जमिनीवर पसरवून ठेवाव्यात किंवा गुंडाळी करून ठेवाव्यात, त्यामुळे मुळे फुटत नाहीत. वेलींमधील अन्नांश मुख्य कंदाला मिळते.
2) पिकास नत्राचा उर्वरित हप्ता देऊन भर द्यावी.
3) रताळ्यामध्ये सोंड्या भुंगा येण्याची दाट शक्यता असते. त्यासाठी लागवडी वेळी पिकामध्ये झेंडू पिकाची लागवड करावी अशी शिफारस केलेली आहे, त्यामुळे सोंड्या भुंग्याचा प्रादुर्भाव कमी होतो.
4) एका महिन्याची लागवड झाली असल्यास बिव्हेरीया बॅसियाना(1.5 टक्के डब्ल्यू पी.) 6.75 किलो प्रति हेक्टर या प्रमाणात सरीमधून द्यावे.
शेवरकंद
1) शेवरकंद पिकामध्ये बेणणी करून घ्यावी.
2) रासायनिक खताची शिफारसीत मात्रेपैकी 1/3 मात्रा (नत्र व पालाश) रोपाभोवती रिंग करून द्यावीत व मातीची भर द्यावी.
3) प्रत्येक रोपावर दोन जोमदार फांद्या ठेवाव्यात. कमजोर फांद्या काढून टाकाव्यात.
4) विषाणूजन्य रोगाची लक्षणे दिसताक्षणी रोपे काढून नष्ट करावीत.
- विनोद धोंडग
VDN AGRO TECH
Published on: 17 October 2021, 07:08 IST