महाराष्ट्रात १९७.६७ लाख हेक्टर क्षेत्रापैकी फळपिकांखाली १८.३२ लाख हेक्टर क्षेत्र असुन त्यातून वर्षाकाठी १०३.९६ लाख टन उत्पादन मिळते. महाराष्ट्र केळी उत्पादनात देशात पहिला आहे. एकूण लागवड ०.८२ लाख हेक्टर असून, त्यापासून दर वर्षी ४.३६ लाख उत्पादन मिळते. प्रति हेक्टर ६८ टन उत्पादन आहे. केळीवर मुख्यत्वे बुरशीजन्य मर, काळा करपा (९५ टक्क्यांपेक्षा जास्त), पिवळा करपा (६५ टक्क्यांपेक्षा जास्त), अणुजीवजन्य मर (१२-२० टक्के ) उदा. मोको, कंदाची मऊकूज, विषाणूजन्य रोगांपैकी पर्णगुच्छ, मोझॅक, ब्रॅक्ट मोझॅक, पोंगासड, मुळावरील सूत्रकृमींपैकी गाठी निर्माण करणारा मेलॉयडोगायनी आणि रूट लिजन सूत्रकृमी यांचा प्रादुर्भाव प्रामुख्याने होतो. त्यामुळे मुळे कमकुवत होऊन झाडे कोलमडून पडतात किंवा खुरटी राहून अपरिपक्व अवस्थेत पिकतात.
काढणीनंतर फळकूज, टोककूज, खोडकूज, फळावरील ठिपके इत्यादींचा प्रादुर्भाव होऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान होते, म्हणून शेतकऱ्यांनी रोग किडीस प्रतिकारक्षम जातींची लागवड करणे तसेच प्रभावी सेंद्रिय रोग कीटकनाशकांचा योग्य वापर करून एकत्रित व्यवस्थापन, एकत्मिक पाणी अन्नद्रव्य व्यवस्थापन, आवश्यक सेंद्रिय खतांचा वापर करून जमिनीचे आरोग्य व सुधार शाश्वत करणे, त्याचबरोबर पिकांची फेरपालट, मुख्य पिकांमध्ये मिश्रपिके, आंतरपिके, पट्टात्मक पिके, सापळा पिके या सर्व तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देणे आवश्यक आहे. तसेच वनस्पतिजन्य उदा दशपर्णी अर्कासारख्या रोग कीडनाशकांचा वापर करणे, जैविक रोग व कीड नियंत्रकांचा उदा. ट्रायकोडर्मा, स्फुरद विरघळवणारे जिवाणू (पीएसबी), पोटॅश विरघळवणारे जिवाणू (केएसबी), जिवाणू खते उदा. ॲझोस्पिरीलम, ॲझोटोबॅक्टर, व्हॅम, ॲझोला, निळे हिरवे शेवाळ, कंपोस्ट तथा गांडूळ खत यांचा वापर करून केळीचे उत्पादन वाढविता येते. जमिनीतील कर्ब वाढविण्यासाठी मूळालगत अखाद्य पेंढींचा वापर उदा. निम, करंज, एरंड, उंडी, कपाशी करणे आवश्यक आहे. तसेच तुषार व ठिंबक सिंचनाचा वापर केल्यास कमी पाण्यात उत्तम दर्जाची केळी उत्पादित होऊ शकते.
सर्वसाधारणत: केळीबागेत रोगग्रस्त पाने, फळे, फुले, तणे काढून स्वच्छता राखावी, मुख्य खोडाभोवती येणारे नवीन कोंब धारदार विळ्याने जमिनीलगत कापावे, तुकडे करून त्याचे उत्तम कंपोस्ट करता येते घड निसवल्यावर केळी झाडास परत पाने येत नाहीत म्हणून घडाच्या सर्वसाधारण वाढीसाठी निसवलेल्या झाडावर किमान ८-१० कार्यक्षम पाने राहतील याची काळजी घ्यावी, वाऱ्यामुळे पाने फाटल्यास ही उपलब्ध पाने जास्त दिवस, अधिक कार्यक्षम झाडावर ठेवणे आवश्यक असते, तसेच बुरशी व इजा झालेल्या पानांना, खोडाला किंवा घडाला ०.३ टक्के फजीस्टार, ०.२ टक्के प्रोफाईट न्यूट्रीफाईट किंवा डेल्टा १० या बुरशीनाशकाची पूर्ण झाडावर विशेषत घडावर काळजीपूर्वक फवारणी करावी आठवड्याने ०.२ टक्के सिलीक्झॉलची फवारणी करावी, म्हणजे हवामानातील तुरंत होणाऱ्या बदलाचा विपरीत परिणाम केळीवर कमीत कमी होईल. त्यानंतर १० लिटर पाण्यात १० ग्रॅम १९:१९ २० हे सेंद्रिय खत फवारावे त्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्यांकरिता ०.१ टक्के इँकोप्लेक्स काँबी या सेंद्रिय चिलेटेड मल्टिमायक्रो न्यूट्रिएंटची फवारणी करावी निसवलेले घड पांढऱ्या प्लॅस्टिक पिशवीने किंवा पॉलिप्रोपिलीनच्या पिशवीने किंवा केळीच्या वाळलेल्या निरोगी पानांनी झाकून ठेवावे, घड निसवलेल्या केळी झाडांना बांबू किंवा प्लॅस्टिक पॅकिंग पट्टीने आधार देवून खोडालगत मातीचा आधार द्यावा, बागेभोवती सजीव कुंपण नसल्यास मका, ज्वारी, बाजरी यांच्या कडब्याची ताटे तयार करून उत्तर व पश्चिम दिशेकडे लावून वारारोधक कुंपण तयार करावे. भोवताली शेडनेट लावूनही मदत होते.
गांडूळखत, २५ ग्रॅम ॲझोस्पिरीलम, २५ ग्रॅम स्फुरद विरघळवणारे जिवाणू खत घालावे. त्यानंतर प्रति झाडास अर्धा किलो बिव्हेरिया, मेटॅरिझीयम, व्हर्टिसिलियम, ट्रायकोडर्मा, पॅसिलोमायसिस जमिनीतून द्यावे, ज्यामुळे, मुळावाटे होणाऱ्या रोग किडींच्या प्रादुर्भावास आळा बसेल. यानंतर ०:५२:३४ हे सेंद्रियखत जमिनीतून द्यावे, सागरी तणापासून तयार केलेल्या उन्नती गोल्डची १० लिटर पाण्यात २० मि.लि. मिसळून फवारणी करावी. शेतात अतिरिक्त पाणी साठू देऊ नये, तसेच शेणखत, गांडूळ खत, द्रव किंवा घन जीवामृत, अमृतपाणी, गोमूत्र, गांडूळपाणी, दशपर्णी अर्काचा वापर केल्यास रोगकिडी कमी होतात, सुकलेल्या केळी पानाचे मधल्या जागेत आच्छदन केल्यास पाणी टंचाईच्या काळात २-३ आठवड्यांनी पाणी दिले तरी चालेल
प्रविण सरवदे, कराड
Published on: 26 January 2022, 04:27 IST