हवामान
वाटाणा हे पिक थंड हवामानात वाढणारे असल्यामुळे सरासरी तापमान 12-20 सेल्सियस असल्यास पिकाची वाढ उत्तम होते.
जमिन
वाटाणा पिक सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येते. हलक्या जमिनीत पिक लवकर तयार होते. तर मध्यम भारी परंतु भुसभुशीत जमिनीत पिक तयार होण्यास जास्त कालावधी लागतो. मात्र उत्पादन चांगले मिळते. जमिन निवडताना पाण्याचा निचरा होणारी, भुसभुशीत, कसदार आणि 6-7.5 सामू असलेली जमिन निवडावी.
लागवडीचा हंगाम
वाटाणा हे पिक थंड हवामानात येणारे असल्यामुळे लागवड आॅक्टोंबर मथ
हिण्याच्या सुरवातीस करावी.
तर उन्हाळीसाठी फेब्रूवारी-मार्च मध्ये करावी.
वाण
1) लवकर येणार्या जाती-
अर्ली बॅगर, अर्केल, असौजी, मिटिओर
2) मध्यम कालावधीत येणार्या जाती-
बोनव्हिल, परफेक्शन, न्यु लाईन
3) उशीरा येणार्या जाती -
एन.पी-29 , थाॅमस लॅक्सटन, टेलिफोन.
बिज प्रक्रिया
एक किलो बियांना 4 ग्राम ट्रायकोर्डमा (Trichoderma) ही पावडर चांगल्या प्रकारे चोळावी.
पेरणीपूर्वी 'थायरम' हे बुरशीनाशक प्रती किलोस 3 ग्राम या प्रमाणात चोळावे. यामुळे मर रोगाचा प्रर्दुभाव कमी होतो.
पुर्वमशागत
वाटाणा हे पिक चांगले उत्पादनशील असल्यामुळे जमिनीची योग्य रीतीने पुर्वमशागत करून जमिन भुसभुशीत करावी. त्यासाठी उभी आडवी नांगरट करून 2-3 कुळवाच्या पाळ्या घालाव्यात. सर्व ढेकळ फुटतील याची दक्षता घ्यावी. जमिन भुसभुशीत असल्यास मुळ्या चांगल्या वाढतात आणि आधिक प्रमाणात अन्नद्रव्ये शोषून झाडाची चांगली वाढ होण्यास मदत होते.
लागवड
लागवड एकतर सपाट वाफ्यात करतात किंवा सरी वरंब्यावर करता येते. त्यासाठी 60 सेमी अंतरावर सरी- वरंबे करून सर्यांच्या दोन्ही अंगास बिया टोकून लागवड करावी. दोन रोपातील अंतर 5-8 सेमी ठेवण्याची शिफारस आहे.
लागवडीचे अंतर वाणानुसार बदलते. एका ठिकाणी किमान दोन बिया टोकाव्यात.
खत व्यवस्थापन
माती परिक्षण करून शिफारसी नुसार खतांचा वापर करावा. जमिनीची मशागत करीत असताना हेक्टरी 12-15 टन शेणखत टाकून जमिनीत चांगले पसरून ते मिसळून घ्यावे.
त्याच प्रमाणे पेरणीच्यावेळी 20-30 किलो नत्र (N) , 50-60 किलो स्फुरद (P) आणि 50-60 किलो पालाश (K) देणे गरजेचे आहे.
बियांची उगवन सुरू झाल्यालंतर ह्युमिक अॅसिड द्यावे ज्यामुळे मुळांची वाढ चांगली होते.
ज्यावेळी पिक फुलावर येईल त्यावेळी 20-30 किलो नत्र व सुक्ष्म अन्नद्रव्ये द्यावे.
पाणी व्यवस्थापन
खतांबरोबर पाण्याचेही व्यवस्थापन असने फार महत्त्वाचे आहे. बी पेरल्याबरोबर लगेच पाणी द्यावे. नंतर जमिनीचा प्रकार व हवामान लक्षात घेउन 8-10 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे.
कीड व रोग
वाटाणा पिकावर मावा, शेंगा पोखरणारी अळी या कीडींचा तर भुरी, मर या रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो.
कीड-
1) मावा-
ही कीड हिरव्या रंगाची अत्यंत लहान असते. ते पानांतून रस शोषून घेतात. त्यामुळे झाडे निस्तेज होतात.
2) शेंगा पोखरणारी अळी-
हिरव्या रंगाची अळी आधी शेंगाची साल खाते व आत शिरते आणि दाणे पोखरून खाते.
रोग
1) भुरी -
या रोगात प्रथम पानांच्या दोन्ही बाजूंवर पांढरी पावडरी सारखी बुरशी आढळून येते. नंतर ती रोपाच्या सर्व हिरव्या भागांवर पसरते. या रोगामुळे पिकाचे जास्त नुकसान होते.
2) मर -
यारोगाचा प्रसार जमिनीतील बुरशीमुळे होतो. रोगग्रस्त झाड पिवळे पडून वाळते.
उपाय म्हणून पेरणीपुर्वी बियास 'थायरम' हे बुरशीनाशक प्रति किलोस 3 ग्रॅम या प्रमाणात चोळावे.
काढणी.
जातीनुसार वाटाण्याच्या शेंगाची काढणी 60-80 दिवसात सुरू होते. काढणीयोग्य शेंगाचा रंग गडद हिरवा बदलतो व फिकट हिरवा दिसतो व शेंगा टपोर्या दिसू लागतात. तोडणी करताना झाडाला ईजा होणार नाही याची काळजी घ्यावी. तोडणी लांबल्यास शेंगाची प्रत खराब होते व भाव कमी मिळून नुकसान होते. तोडणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी करावी. शेंगाची काढणी 3-4 तोड्यात पुर्ण होते. तोडणीचा हंगाम 2-4 आठवड्या पर्यंत चालतो.
उत्पादन
लवकर येणार्या जातीचे हिरव्या शेंगाचे हेक्टरी उत्पादन 25-35 क्विंटल तर मध्यम कालावधीत तयार होणार्या जातीचे उत्पादन 65-75 क्विंटल /हेक्टर आणि उशीरा येणार्या जातीचे उत्पादन 85-115 क्विंटल/हेक्टर मिळते
-विनोद धोंगडे नैनपुर
Published on: 17 October 2021, 07:38 IST