Agripedia

आपल्या संस्कृती मध्ये सुर्याला अनन्यसाधारण महत्व आहे.आपल्या पूर्वजांना सौर ऊर्जेचे महत्व ज्ञात होते. कदाचित त्याच कारणासाठी सूर्याला आपण आपल्या पवित्र ग्रंथांमध्ये स्थान दिले आहे.आपल्या देशात सुर्यादेवांना कृतन्यता व्यक्त करण्यासाठी ठिकठिकाणी सूर्य मंदिरांची निर्मिती केली आहे

Updated on 05 October, 2021 4:27 PM IST

सूर्यदेव नसते तर ही पृथ्वी ही नसती आणि इतर ग्रह ही नसते.आपली दिनचर्या सुर्यादेवांचा आगमनाने होते व त्यांचा अस्ताने आपण आपला दिवस संपवतो. जीवसृष्टीला सुर्यादेवांकडून सौर ऊर्जा कित्येक हजारो वर्षांपासून अखंडीत मिळत आहे.अशा ह्या सुर्यादेवांना कृतन्यता व्यक्त करण्यासाठी आपण त्यांना अर्घ्यदान करून दिवसाची सुरुवात करतो. आज त्यांना वंदन करून त्यांचा प्रसादरूपी मिळत असलेल्या सूर्यप्रकाशाचा आपण ऊस शेतीमध्ये कार्यक्षम वापर कसा करू शकतो हे मी ह्या लेखामधून तुम्हाला सांगणार आहे.

             सूर्य हे पृथ्वी वरील ऊर्जेचे प्रमुख स्रोत आहे. सूर्याचा गाभ्यामध्ये दोन हायड्रोजनचे अणु उच्च तापमानामध्ये एकत्र येऊन हेलियम अणूची निर्मिती करतात. हा संयोग होत असताना ऊर्जेचीही निर्मिती होते. ह्या रासायनिक अभिक्रियेला विभक्त संलयन(Nuclear fusion) म्हणतात. ह्या ऊर्जेचे रूपांतर विद्युतचुंबकीय तरंगांमध्ये होते. आणि हे तरंग भ्रमांडात विखुरले जातात. ह्या तरंगांचा एक औंश पृथ्वीचा दिशेनेही येत असतो. पृथ्वीवर ह्या तरंगांचे ज्यावेळी आगमन होते त्यावेळी झाडांची पाने त्याचे शोषण करतात.पानामध्ये हरितद्रव्य असतात. ते ह्या तरंगांमध्ये असलेल्या ऊर्जेचा वापर करून हवेत असलेल्या कारबन डायॉक्साईड(CO2) आणि पाण्यामध्ये(H2O) संयोग घडवुन आणतात. ह्या संयोगाचे रूपांतर ग्लुकोस ह्या साखरेमध्ये होते.ह्या संयोगातून ऑक्सिजन नावाचा दुय्यम उत्पादन हवेत सोडला जातो.ह्या ग्लुकोस चा वापर झाड आपली वाढ करण्यासाठी करते. ह्या संपूर्ण प्रक्रियेला फोटोसिंथेसिस म्हणतात

                 ज्यावेळी फोटोसिंथेसिस क्रियेची कार्यक्षमता वाढते त्यावेळी ऊस किंवा इतर कोणत्याही पिकाची उत्पादन वाढते. उसामध्ये जेवढ्या कार्यक्षम पद्धतीने फोटोसिंथेसिसची क्रिया घडेल तेवढी जास्त साखर खोडा मध्ये साठणार आणि तेवढे जास्त उत्पादन हाती येणार. ही कार्यक्षमता वाढवायचे वेगवेगळे उपाय आहेत. उसाचा पानांची रुंदी वाढवणे हा एक उपाय होऊ शकतो.उसाचा पानांची रुंदी ही ऊस लागणी पासून नऊ महिन्या पर्यंत वाढत असते. नऊ महिन्यानंतर उसाचा पानांचा रुंदी मध्ये वाढ होत नाही. त्याचे प्रमुख कारण असे की उसाचा पानामध्ये असलेले नत्राचे प्रमाण हे कमी होत जाते. त्यामुळे आपण पानांची रुंदी वाढवण्याचे कार्य हे लागणी पासून करणे गरजेचे आहे. काही वाण जसे की ८०२१ ह्याची पानांची रुंदी ही आनुवंशिकरित्या तुलनेने जास्त असते. ज्यावेळी ८०२१ जातीचा ऊस हा ३-४ फूट उंचीचा असतो त्यावेळी त्याची पाने ३-४ बोट रुंद असतात जे आपल्याला ८६०३२ किंवा इतर वाणांमध्ये पहावयास मिळत नाही.महाराष्ट्रात बहुतांश शेतकरी ८६०३२ ह्या वाणाची लागवड करतात. उसाचा पानांची रुंदी वाढवण्या संबंधित शोध निबंध खुप कमी आहेत.बऱ्याच तज्ज्ञांना ह्या बद्दल विचारणा केल्यास काही ठोस उत्तर प्राप्त झाले नाही. त्यासाठी आम्ही काही प्रयोग केले त्याचे आम्हाला चांगले परिणाम मिळाले. उसाचा पानांची रुंदी वाढवणे म्हणजे थोडक्यात पानांमध्ये असलेल्या पेशींची संख्या वाढवणे. पेशींची संख्या वाढवणे म्हणजे पेशींचे विभाजन करणे. पेशी विभाजन करण्यासाठी संप्रेकांचा वापर करणे हा एक उपाय होऊ शकतो.

पेशी विभाजन करण्यासाठी सायटोकायनीन हा संप्रेरक काम करतो. हा संप्रेरक देशी गाईंचा गौमुत्रामध्ये आढळतो. वीस लिटर क्षमतेचा फवारणी यंत्रामध्ये ३५०मिली गौमुत्र मिसळून फवारणी केल्यास आपल्याला चांगला परिणाम दिसून येतो.उसाची उंचीही वाढते आणि पानांची रुंदीही वाढते. दुसरा पर्याय पानांची रुंदी वाढवण्यासाठी जिवाणू खतांचा वापर करणे हा ही होऊ शकतो. बऱ्याच शेतकऱ्यांना असा अनुभव आला आहे की जिवाणू खतांचा वापर केल्यास उसाची वाढ जोमदार होते व नवीन येणाऱ्या पानांचा रुंदीमध्ये वाढ झालेली दिसून येते. हा बदल दिसण्यामागे बरीच कारणे आहेत. जिवाणूंचा वापर केल्यास जमीन भुसभुशीत होते. वाफसा स्थिती ही लवकर येते व अधिक काळ टिकून राहते. त्यामुळे पांढरी मुळीची वाढ नियमित सुरू राहते व अन्नद्रव्यांची उचल ही चांगली होते. पानांची रुंदीमध्ये होणारी वाढ,ही सायटोकायनीन ह्या संप्रेकांमुळे होते हा प्रयोग आपण आताच बघितला. हा सायटोकायनीन रूट एपिकल मेरिस्टेम म्हणजे शेतकरी भाषेत पांढऱ्या मुळीचा शेंड्यामध्ये तयार होतो. काही जिवाणू अशी आहेत जी मुळींमध्ये सायटोकायनीनची निर्मिती करण्यास मदद करतात.ह्यामुळे नवीन येणारी पाने ही रुंद तयार होतात व फुटव्यांची संख्या ही वाढते.

                 सौर ऊर्जेचा कार्यक्षम वापर होण्यासाठी आणखीन एक घटक काम करत असतो ती आहे उसाचा पानांची काळोखी.उसाचा पानांची काळोखी बऱ्याच घटकांवर अवलंबून असते. जेवढी काळोखी जास्त तेवढी कारबन डायॉक्साईडचे साखरेमध्ये रूपांतर जास्त होते. काळोखी कमी असेल तर पानावर पडणाऱ्या सूर्यप्रकाशचे कार्यक्षम वापर होत नाही. काळोखी साठी नत्र हा अन्नद्रव्य कारणीभूत आहे असा आपला समज असतो. पण काही दिवसांपासून आम्ही करत असलेले प्रयोगअंती आम्हाला अस लक्षात आले आहे की उसाचा पानांची काळोखी हे सर्व अन्नद्रव्यांचे संतुलित वापर झाल्यास होतो. त्यासाठी आम्ही जिवाणू खत आणि जीवामृत ह्या जौविक निविष्ठांचा वापर मोठ्या प्रमाणात करतो. तुम्ही ज्यावेळी नत्र ह्या अन्नद्रव्याचा विचार करता त्यावेळी त्याचा वापर केल्यास पिकाला काळोखी येईल पण त्याबरोबर पेशी विभाजन होते व नवीन पेशींमध्ये पक्वता नसते. त्यामुळे पीक हे बुरशिजन्य रोगास बळी पडते. पालाशमुळे नवीन तयार झालेल्या पेशींमध्ये पकवता येते व पीक रोगास तुलनेने अधिक प्रतिकार करू शकतो.त्यामुळे नत्रा सोबत पालाश ह्या अन्नद्रव्याचाही विचार करणे गरजेचे आहे.आम्ही नत्र आणि पालाश उपलब्ध करणाऱ्या जिवाणूंचा वापर हा संतुलित प्रमाणात करतो. शिवाय जीवामृताचा वापर केल्यास उर्वरित सर्व अन्नद्रव्यांची पूर्तता होते.

                   काही दिवसांपूर्वी एक शोध निबंध हाती लागला. त्यामध्ये असे निष्कर्ष काढले होते की उसामध्ये एकूण १५-१६ सक्रिय पानं असतात. त्यातील नवीन दहा पान हे ७०% प्रकाशसंश्लेषण क्रिया घडवून आणतात व उर्वरित पाच ते सहा पानं ही ३०% प्रकाशसंश्लेषण घडवून आणतात. सहसा शेतकरी पाला काढणीचा नावाने खालची गर्द हिरवी पानेही काढून घेतो. त्यामुळे आपण उसाचे वजन वाढवण्यासाठी जी पाने कारणीभूत आहेत ती उसाला टणकपना येण्याचा नावे आपण काढून घेतो.आपल्याकडून ही एक मोठी चुक होत आहे. आपण पाला काढणीसाठी एकरी तीन हजार रुपये ही खर्च करतो आणि उसाचे वजन ही कमी करून घेतो.त्यामुळे जो संपूर्ण वाळलेला पाला आहे तोच काढावा उर्वरित पाला तसाच ठेवावा.

                  ऊस शेती मध्ये आपले शोषण ना ना प्रकारे होत असते. शोषणाचे काही पद्धती आपल्याला ज्ञात आहेत. शोषणाशी लढा आपल्याला द्यावा लागणारच आहे. पण काही गोष्टी आपल्या हातात आहेत. जसे की उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर करणे. आपण कितीही आंतरमशागत चांगली केली, चांगली खतं घातली तरीही आपण जर ह्या सौर ऊर्जे कडे आपण जागरूक नसलो तर आपले उत्पादन वाढणार नाहीच. 

लेखक - विवेक पाटील,सांगली

९३२५८९३३१९

 

 

English Summary: The most neglected source of energy in sugarcane farming: Sunlight
Published on: 05 October 2021, 04:27 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)