फिश अमीनो एसिड हे मासोळीपासून बनविले जाणारे द्रावण आहे. विविध प्रकारच्या अमीनो असीडच्या अस्तित्वामुळे हे द्रावण वनस्पती तसेच सूक्ष्म जीवाणूंच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. काळ्या अथवा निळसर माशांपासून बनलेल्या द्रावणात उत्तम प्रकारचे अमीनो एसिड तयार होतात. या द्रावणातील पोषक तत्वे आणि अॅमीनो अॅसीड वनस्पतींद्वारे शोषली जातात व सूक्ष्म जीवाणूंच्या वाढीमधे हे द्रावण उत्प्रेरकाचे काम करते.
साहित्य
१ किलो मासोळी. मासोळीचे खाण्यासाठी वापरात न येणारे भाग उदा. मुंडके, हाडे व आतडे यांचा वापर केल्यास कमी किमतीत उपलब्ध होऊ शकतात.
१ किलो गुळ. नेहमी जितक्या वजनाची मासळी, तितक्याच वजनाचा गुळ घ्यावा.
मातीचे किंवा प्लास्टिकचे अथवा काचेचे पात्र. द्रावण बनविण्यासाठी.
मच्छरदाणीच्या जाळी समान छोटी जाळी. पात्राच्या तोंडावर बांधण्यासाठी.
रबर बॅंड अथवा दोरी. जाळी पात्राच्या तोंडाला बांधण्यासाठी.
कृती
मासळीचे छोटे तुकडे करून पात्रात टाका. त्यात गुळ कुस्करून मिसळा. पात्राचे आकारमान इतके असावे की सर्व साहित्य त्यात टाकल्यानंतर पात्राच्या एकूण आकारमानाच्या १/३ जागा शिल्लक रहावी. त्यामुळे आपण किती द्रावण तयार करणार आहात त्यानुसार पात्राचा आकार निवडावा. पात्राच्या तोंडावर जाळी बांधून रबर बॅंड अथवा दोरीने बांधावे. हे पात्र सावलीच्या ठिकाणी जेथे तापमानाचे चढ उतार जास्त प्रमाणात होत नाही अशा ठिकाणी ठेवावे.
गुळात मासळीचे किण्वन होणास २ ते ३ महिने लागतात. हा कालावधी प्रदेशीय हवामाना नुसार कमी जास्त होऊ शकतो. या कालावधी नंतर द्रावण गाळून घ्यावे.
तयार झालेले द्रावण सावलीत थंड ठिकाणी ठेवावे.
कसे वापरावे
१) पिकांवर फवारणीसाठी व बीजप्रक्रियेसाठी १ लिटर पाण्यात १ मि.लि.
२) पिकांना जमीनीतून किंवा ड्रीपमधून पाण्याद्वारे देण्यासाठी १ लिटर पाण्यात ५ मि.लि.
जमीनीतून व फवारणीसाठी या द्रावणाचा वापर केला जाऊ शकतो.
३) नत्राने (Nitrogen) भरपूर असल्याने पिकाच्या शाखीय वाढीच्या दरम्यान इतर नैसर्गिक निविष्टांसोबत याचा वापर करावा.
४) पालेभाजी वर्गीय पिकांसाठी सतत वापरल्यास त्यांच्या चव व सुगंध यामधे सुधारणा होते.
५) बांगडा (Mackerel) जातीच्या मासळी पासून बनवलेले द्रावण पिकावरील सूक्ष्म परजीवी व पांढरी माशी यापासून पिकास संरक्षण देते.
६) हे मासळी ऑईल पिकवर फवारल्यामुळे आपल्या कडील कोनत्याच पिकाला वन्य प्राण्यापासुन नुकसान होणार नाहीत.
७) कपाशीवरिल बोंडअळीसाठी वापर करता येतो.
*महत्वाचे*
पिकांच्या फळधारणेच्या काळात या द्रावणाची फवारणी करू नये. अशा अवस्थेत पिकांची अनियंत्रीत शाखीय वाढ होऊन फळधारणेच्या क्रियेत व्यत्यय होऊ शकतो.
– शरद केशवराव बोंडे
९४०४०७५६२८
Published on: 23 May 2021, 06:21 IST