महाराष्ट्रातील रब्बी हंगामातील प्रमुख पिके म्हणजे गहू आणि हरभरा हेआहेत. जर आपण हरभरा पिकाचा विचार केला तर राज्यात 13 दशलक्ष च्या पुढे हेक्टर क्षेत्र हरभरा लागवडीखाली आहे. हरभरा हे पीक थंड हवामानात म्हणजेच रब्बी हंगामात घेतले जाते.
.हरभरा पिकावरील किडींचा विचार केला तर घाटेअळी ही सर्वात जास्त नुकसान दायक आहे. या आळी मुळे जवळजवळ 30 ते 40 टक्के नुकसान होते. म्हणून या टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी जागरूकपणे एकात्मिक कीड व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. या लेखात आपण हरभऱ्यावरील घाटे अळीच्या एकात्मिक व्यवस्थापन पद्धती विषयी माहिती घेऊ.
हरभरा पिकावरील घाटे अळीच्या एकात्मिक नियंत्रणाच्या तीन पद्धती…
मशागत पद्धत-
- यासाठी उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करावी त्यामुळे जमिनीतील किडींच्या अवस्था नष्ट होईल.
- पिकाची पेरणी अगदी वेळेवर करावी.
- शिफारस केलेल्या वाणांची योग्य अंतरावर पेरणी करावी.
- हरभरा पिकामध्ये आंतरपीक आता मिश्र पीक म्हणून जवस, कोथिंबीर किंवा मोहरी या पिकांची लागवड करावी म्हणजेच पक्षी कीटकांचे संवर्धन होण्यास मदत होते.
- हरभरा पेराल तेव्हा त्यासोबत शंभर ग्रॅम प्रति हेक्टर ज्वारीचे बियाणे मिसळून पेरणी करावी. ज्यामुळे पक्षी आकर्षित होऊन घाटेअळीचा अळ्या वेचून खातात.
- पिकांची फेरपालट करावी त्यासाठी बाजरी,ज्वारी, मका तसेच भुईमूग यांचा वापर करावा.
- हरभरा पिकाच्या सभोवती झेंडू या सापळा पिकाची एक ओळ लावावी.
- हरभरा एक महिन्याचा झाल्यानंतर नींदनी करून शेत तणविरहित ठेवावे.
पद्धत
- पिकावरील मोठ्या अळ्या वेचून त्यांचा नाश करावा.
- हरभरा पीक एक महिन्याचे झाल्यानंतर एक ते दीड फूट उंचीचे इंग्रजी टी आकाराचे 50 पक्षी थांबे प्रतिहेक्टरी लावावेत.
- घाटे आळी चे सर्वेक्षण करणे सोपे जावे यासाठी प्रति हेक्टरी पाच कामगंध सापळे जमिनीपासून एक मीटर उंचीवर लावावेत.
- एक ते दोन अळ्या प्रति मीटर ओळकिंवा पाच टक्के कीडग्रस्त घाट्या किंवा आठ ते दहा पतंग प्रति कामगंध सापळे मध्ये सतत दोन ते तीन दिवस आढळल्यास आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असे समजावे.
जैविक पद्धती
- वनस्पतिजन्य कीटकनाशकांचा उपयोग- हरभरा पिकाला फुले येत असताना सुरुवातीच्या काळात पाच टक्के निंबोळी अर्काची प्रतिबंधक फवारणी करावी. यासाठी पाच किलो वाळलेल्या निंबोळीचा भरडा पातळ कपड्यात बांधून दहा लिटर पाणी असलेल्या बादलीत रात्रभर भिजत ठेवावा आणि सकाळी सदरील दहा लिटर द्रावण गाळून घ्यावे आणि त्यामध्ये 90 लिटर पाणी मिसळून फवारणी करावी. त्यामध्ये 200 ग्रॅम धुण्याची पावडर किंवा साबणाचा चुरा मिसळावा.
- विषाणूजन्य जैविक कीटकनाशकांचा वापर- जेव्हा घाटे अळी लहान अवस्थेत असते तेव्हा एचएनपीव्ही 500 एल. ई. विषाणूची प्रति हेक्टरी फवारणी करावी. म्हणजेच 500 एल. ई.विषाणू 500 मिली 500 लिटर पाण्यात मिसळून त्यामध्ये 500 मिली चिकट द्रव्य म्हणजे स्टिकर आणि राणी पाल ( नीळ ) दोनशे ग्रॅम टाकावा.
Published on: 08 January 2022, 02:23 IST