उन्हाळ्यातील जास्त तापमान मूग पिकाच्या वाढीसाठी उत्तम असून, या काळात मुगाचे चांगले उत्पादन मिळू शकते. उन्हाळी हंगामासाठी शिफारशीत सुधारीत वाणांची निवड करावी.
मूग पिकाला मध्यम ते भारी, उत्तम निचऱ्याची जमीन आवश्यक असते. या पिकाला जास्त मशागतीची आवश्यकता लागत नाही. एक हलकी नांगरट व वखराच्या दोन पाळ्या देऊन पेरणी करता येते.
सुधारीत वाणांची निवड –
उन्हाळी मुगाची पेरणी करण्यासाठी खालील वाणांची निवड करावी.
वाण ः कालावधी (दिवस) ः उत्पन्न (क्विं/हे.) ः प्रमुख वैशिष्ट्ये
कोपरगाव ः ६० ते ६५ ः ८-१० ः टपोरे हिरवे चमकदार दाणे
एस-८ ः ६० ते ६५ ः ९-१० ः हिरवे चमकदार दाणे, खरीप व रब्बी हंगामासाठी योग्य
फुले एम-२ ः ६० ते ६५ ः ११-१२ ः मध्यम हिरवे दाणे, खरीप व उन्हाळी हंगामासाठी
बीएम-४ ः ६० ते ६५ ः १०-१२ ः मध्यम हिरवे दाणे, खरीप व उन्हाळी हंगामासाठी
पेरणी –
वैशाखी मुगाची पेरणी १५ फेब्रुवारी ते १५ मार्चदरम्यान करावी. दोन ओळीतील अंतर ३० सें. मी. असावे. बी पेरणीपूर्वी रायझोबीयम व स्फुरद विरघळवणारे जीवाणू संवर्धक २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाण्यास चोळावे. प्रति हेक्टरी १५ ते २० किलो बियाणे वापरावे.
खत व्यवस्थापन –
मुगासाठी शेवटच्या वखरणीअगोदर ६-८ टन प्रति हेक्टरी शेणखत किंवा कंपोस्ट द्यावे.
पेरणीच्या वेळी २० किलो नत्र आणि ४० -५० किलो स्फुरद प्रति हेक्टरी द्यावे.
आंतरमशागत व तणनियंत्रन –
हे पीक कमी कालावधीचे असल्याने उभ्या पिकामध्ये वेळीच आंतरमशागत करणे गरजेचे आहे. पेरणीनंतर ३ ते ४ आठवड्यांनी एक कोळपणी वा एक खुरपणी करून घ्यावी. त्यामुळे आंतरमशागतीसोबतच तणांचे नियंत्रण होण्यास मदत होते.
पाणी व्यवस्थापन –
उन्हाळी मुगासाठी पेरणीनंतर १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या एकूण ४ ते ५ पाळ्या द्याव्यात. पीक फुलावर येण्याच्या वेळी तसेच दाणे भरण्याच्या वेळी पाणी देणे आवश्यक असते. जेव्हा फक्त एकच पाणी उपलब्ध असेल त्या वेळी मात्र मुगास पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी पाणी द्यावे.
डॉ. भगवान आसेवार, ९४२००३७३५९
(वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे डॉ. गरुड हे वरिष्ठ संशोधन केले असून, डॉ. आसेवार हे प्रमुख शास्त्रज्ञ आहेत.
Published on: 22 January 2022, 01:12 IST