मल्चिंग पेपरचा वापर आता बहुतांश भागातील शेतकरी करू लागले आहेत. मात्र मल्चिंग पेपर चा वापर करताना नेमकी कोणती काळजी घ्यावी. मल्चिंग पेपर वापरताना पाण्याचे नियोजन कसे करावे ? यासारख्या विविध पैलूंबाबबत जाणून घेणे गरजेचे आहे.
मल्चफिल्मची निवड करताना
मल्चचा रंग, आकार व जाडी यानुसार प्रकार आहेत व पिकाच्या गरजेनुसार मल्च ची निवड करायची असते.
विविध रंगी मल्च चे जे उपायोग सांगिलते जातात त्या नुसार होणारे फायदे प्रत्यक्षात होतीलच असे नाही. तंत्रशुद्ध प्रयोगात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे निरीक्षण मिळाले त्यामुळे स्थायी अनुमान निघालेले नाही
साधारणपणे गरजे नुसार ९० ते १२० से. मी चा पन्हा उपलब्ध असतो.
भुईमुगात ७ मायक्रोन जाडीचा पेपर वापरायचा असतो. एका वर्षाच्या आत निघणाऱ्या पिकासाठी २० ते २५ मायक्रोन, मध्यम काळाच्या पिकासाठी ४० ते ५० मायक्रोन व बहुवार्षिक पिकासाठी ५० ते १०० मायक्रोन जाडीचा पेपर वापरावा.
मल्चिंग पेपर वापरण्याची पद्धत
ज्या ठिकाणी मल्चिंगपेपर वापरावयाचे त्या ठिकाणी पीकवाढीच्या पूर्ण ‘ फ्लोरा ’ किंवा पानांचा घेरा आहे, तिथपर्यंत वापरणे आवश्यक आहे.
जेवढा आवश्यक आहे तेवढा पेपर कापून घ्यावा.
जिथे वापरायचा त्या ठिकाणी माती, दगड आदी घटक काढून स्वच्छ बेड तयार करून घ्यावा.
आच्छादनापूर्वी बेड पूर्ण ओला करावा व वाफशावर पेपर अंथरावा. ज्यामुळे हवा व इतर घटक त्यात जाणार नाहीत व बाष्पीभवन रोखले जाईल.
पीक लागवड अंतरानुसार पेपरचे अंतर ठरविले जाते.
फिल्म वापरतांना घ्यायची काळजी
पेपर जास्त ताणू नये तो ढिला सोडावा.
जास्त तापमान असताना शक्यतो पेपर अंथरु नये.
शक्यतो ऊन कमी असताना वापरावा. प्लास्टिक फिल्म सकाळी लवकर किंवा संध्याकाळी अंथरावी.
ठिबक नळ्यांना इजा पोहोचू नये याची दक्षता घेऊन फिल्मला छिद्रे पाडावीत.
छिद्रे एकसमान असावीत व फिल्म फाटू नये याची दक्षता घ्यावी. छिद्रे मल्चिंग ड्रीलच्या साह्यानेच पाडावीत.
मातीचा भराव दोन्ही बाजूस सारखा ठेवावा.
फिल्मची घडी नेहमी गोल गुंढाळूनच करावी.
फिल्मला फाटण्यापासून वाचवावे जेणेकरून ती परत वापरता येईल. फिल्मची साठवण सावलीत सुरक्षित ठिकाणी करा.
पाणी देण्याची पद्धत
मल्चिंग पेपर वापर करण्यापूर्वी पेपर खालून ठिबक सिंचनाच्या नळ्या टाकाव्या.
शक्यतो भाजीपाला पिकांमध्ये ठिबक सिंचन करणे आवश्यक आहे.
तुषार सिंचनाचा वापर करून भुईमूग सारख्या पिकात वापर करू शकता. भुईमूगारसंख्या पिकात मोकाट सिंचनसुद्धा करू शकता
मल्चिंग पेपरचे फायदे
हे पाणी पूर्णतः आत किंवा बाहेर जाऊ देत नाही.
बाष्पीभवनामुळे उडून जाणारे पाणी पूर्णतः थांबवते. त्यामुळे पाण्याची बचत होते.
बाष्पीभवन थांबविल्यामुळे जमिनीतील क्षार वरच्या भागावर येण्याचे प्रमाण थांबते.
खतांच्या वापरात बचत होते. कारण पाण्यात वाहून जाण्याचे खतांचे प्रमाण कमी होते.
जमिनीत हानिकारक सूक्ष्मजीवांच्या वाढीस अटकाव होतो.
वार्षिक ताणाच्या वाढीस प्रतिकार होतो. कारण सूर्यप्रकाश तिथपर्यंत पोहोचत नाही.
प्लॅस्टिकच्या प्रकाश परिवर्तनामुळे काही किडी-रोग दूर जातात. त्यांचे प्रमाण कमी होते.
जमिनीचे तापमान वाढते. जमिनीचे निर्जंतुकीकरण होण्यास मदत होते.
आच्छादन पेपरच्या खाली सूक्ष्म वातावरणनिर्मिती होते. ज्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण अधिक असते.
Published on: 25 February 2022, 01:47 IST