पाऊस उशिरा, अनिश्चित व कमी प्रमाणात झाला तरी इतर तृणधान्य पेक्षा अधिक धान्य व चारा उत्पादन देणारे बाजरी हे पीक आहे आपत्कालीन पीक व्यवस्थापनामध्ये या पिकाला महत्त्व आहे. हे पीक कमी कालावधीत तयार होणारे असल्यामुळे खरीप आनंतर रब्बीची पिके वेळेवर देता येतात. ह्या लेखात आपण बाजरी पिकाचे लागवडीचे नियोजन कसे असावे याबद्दल माहिती घेणार आहोत.
बाजरी साठी लागणारी जमीन
अधिक उत्पादनासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू हा साडेसहा ते साडेसात च्या दरम्यान असावा.
बाजरी पिकासाठी लागणारे हवामान
उष्ण व कोरडे हवामान या पिकास चांगले मानवते. चारशे ते पाचशे मीमी पावसाचे प्रमाण असलेल्या भागात हे पीक घेतात. पिकाची उगवण व वाढ 23 ते 32 अंश सेल्सिअस तापमानात चांगली होते. पिकाच्या संपूर्ण वाढीच्या काळात स्वच्छ सूर्यप्रकाश अधिक उत्पादनासाठी आवश्यक आहे.
बाजरी च्या जाती
श्रद्धा, सबुरी, शांती ही संकरित वाण आहेत. आयसीटीपी-8203, समृद्धी, परभणी संपदा हे सुधारित वाण आहेत.
बाजरीची लागवड
खरीप बाजरीची पेरणी 15 जून ते 15 जुलै या कालावधीत जमिनीत चांगली ओल असताना दोन ओळींमध्ये 45 सेंटिमीटर तर दोन रोपांमध्ये बारा ते पंधरा सेंटीमीटर अंतर राहील अशा बेताने करावी. पेरणी शक्यतो दोन चाड्याच्या पाभरीने करावी म्हणजे रासायनिक खते बियाणे सोबत व बियाण्याच्या खाली दिल्यामुळे त्यांची उपयुक्तता वाढवून चांगले उत्पादन मिळते.
खत व्यवस्थापन
अधिक उत्पादनासाठी दहा किलो झिंक सल्फेट प्रति हेक्टरी पूर्वमशागतीच्या वेळेस जमिनीतून द्यावे. स्फुरदाची मात्रा सिंगल सुपर फॉस्फेट मधून दिल्यास पिकास कॅल्शिअम व सल्फर हे अतिरिक्त सूक्ष्म अन्नद्रव्ये ही मिळतात.माती परीक्षणानुसारच रासायनिक खते द्यावीत.
बाजरी पिकावरील रोग नियंत्रण
भुंगे- या किडीचा उपद्रव बाजरी पीक फुलोऱ्यात असताना होतो. यावर उपाय म्हणून बीएचसी 10% पावडर हेक्टरी 20 किलो या प्रमाणात धुरडतात.अरगट आणि गोसावी रोगाच्या नियंत्रणासाठी बीजप्रक्रिया केलेले प्रमाणित बियाणे वापरावे.
पाणी व्यवस्थापन
बाजरी पिकास फुटवे येण्याची वेळ, पीक पोटरी अवस्थेत असताना आणि कणसात दाणे भरताना जमिनीत पुरेसा ओलावा असणे गरजेचे आहे.
बाजरी पिकाचे उत्पादन
श्रद्धा या वाणाचे एकरी उत्पन्न 26 क्विंटल तर एमएच 179 या वाणाचेसरासरी उत्पन्न 22 क्विंटल मिळते. बाजरीच्या इतर वाणांचे उत्पन्न हे सरासरी 15 ते 20 क्विंटल मिळते.
Published on: 21 October 2021, 01:47 IST