साल २०१६ मे चा महिना. आम्ही आदल्या वर्षी केळीची लागण केली होती. ह्या दरम्यान घड बाहेर आले होते. त्याची फुगवण होण्यास सुरुवात झाली होती. त्याच दरम्यान एक छोटे वावटळ आले आणि ३०० झाडांना पस्तं करून गेले. काही महिन्यांत हे पीक काढणीला येणार होते आणि वावटळाने आमचा शेतात धिंगाणा घालून पिकाचे नुकसान केले.
साल २०१७ मे चा महिना. मागचा वर्षीचा इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसली फक्त वेगळ्या पद्धतीने.ह्या वर्षी वळीव पाऊसाचा प्रतीक्षेत आम्ही होतो. ह्या वर्षी पाऊस आला, जोरात पडला पण येतायता वादळाला ही सोबत घेऊन आला. जोरदार पाऊस आणि वादळ ह्या मुळे आम्ही केलेल्या केळीचा खोडव्यामध्ये ६५ गुंठे क्षेत्रामध्ये १२०० झाडे पडली. ऐन घड बाहेर पडलेली त्यांची फुगवण होण्यास सुरुवात होती. काही महिन्या नंतर हे पीक हाती घेणार तो पर्यंत असा निसर्गाचा तडका.
गेली 2 वर्षे आम्हाला हे पीक साधलं नाही. आम्ही लागण करायची वेळ बदलली. पीक आम्हाला नोव्हेंबर डिसेंबर मध्ये येईल काढणीला असा विचार करून आम्ही त्याच दरम्यान 2 एकर क्षेत्रावर लागण केली. मे मध्ये अजून झाडं लहान असतात त्यामुळे वळीव चा फटका बसणार नाही असा आमचा अंदाज.
हा अंदाज योग्य ठरला आणि मे मध्ये वळीव चा वादळाचा काही जास्ती परिणाम झाला नाही. पण नियतीला आमची परीक्षा घ्यायची होती. ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पाऊस आणि वादळ आले. १ तास फक्त पाऊस पडला आणि निसर्गाने आपली ताकत आम्हाला दाखवली. पहिला जोरदार पाऊस आणि त्या नंतर १-२मिनिटे चालले जोराचे वारे. झाडे अक्षरशः झुलत होती. घड बाहेर पडलेले त्यामुळे आम्हाला वाटले की ह्या वर्षीही मोठे नुकसान होणार. पाऊस थांबला त्यावेळी शेतात गुढग्याएव्हढं पाणी होते. दुसऱ्या दिवशी आम्ही नुकसानीचा पंचनामा करायला गेलो तर २ एकर क्षेत्रात फक्त ४ झाडे पडली. बाकीची सर्व झाडे सुस्थितीत होती. घडलाही कोणती इजा झाली नव्हती. पहिल्या वर्षी ३०० झाडे दुसऱ्या वर्षी १२०० आणि तिसऱ्या वर्षी फक्त ४ झाडे खराब झाले.
एवढा बदल एक वर्षामध्ये कसा झाला. २०१८ साली आम्ही जिवाणू खतांचा आणि जीवामृतचा वापर मोठ्या प्रमाणात करू लागलो. जमिनीचा पोत ही सुधारत होता. वाफसा स्थिती आम्हाला मिळवायचे सोपे होत होते. जमीन भुसभुशीत झाली होती.
मुळीची वाढ चांगली झाली होती. केळी साठी जैविक निविष्ठांचा वापर केल्यामुळे झाडामधील तंतुमध्ये ताकत आली होती. ह्या बळकट तंतूंमुळे ही झाडे वादळाला तोंड देऊ शकली. जिवाणू खतांचा आणि जीवामृतचा वापर केला मुळे अन्नद्रव्यांची पूर्तता चांगल्या प्रकारे तर होतेच पण त्याही पेक्षा काही आणखी गोष्टी ही घडतात. जसे की झाडांमधे नैसर्गिकरित्या संप्रेरक निर्माण होतात. एकाच प्रकारचे अन्नद्रव्ये जास्ती प्रमाणात उचल होत नाही. समप्रमाणात झाडाचा गरजेनुसार अन्नद्रव्यांची उचल होते त्यामुळे झाड मधील तंतू, मुळी,खोड,पाने आणि घड ह्या सगळ्यांची वाढ निरोगी आणि चांगली होते.
खरे परिणाम पुढचा काही दिवसात बघायला मिळाले.दर वर्षी घड ज्या वेळी भरायची त्यावेळी झाडाला बांबुचा काठीने किंवा पॅकिंग दोरीने आधार द्यावा लागायचा.
ह्या वर्षी पहिल्यांदा आम्हाला ह्यातील काहीच करायची गरज भासली नाही. झाडे आपल्या ताकतीने उभी होती. ज्या वेळी बोजा पेलत नव्हता त्यावेळी ही झाडे हळू हळू झुकायची आणि शेवटी केळीचा घडाचा आधार घेऊन त्यांचं झुकन थांबायचं. आमची केळी जी ९ व्हरायटी ची असल्या मुळे त्याला एक खूप वर्षापासूनच दोष होता तो म्हणजे ही झाडे घड भरायचा वेळेस खोडाचा मध्य भागातून वाकायची त्यामुळे घड नीट भरत नव्हते. ह्या वर्षी जिवाणू खते आणि जीवामृतचा वापर केल्या मुळे झाडे मधून वाकायची थांबली आणि आमचे होणारे नुकसान कमी झाले. जिवाणू खते आणि जीवामृतचा वापरा मुळे आम्ही रासायनिक खतांचा वापर खूप कमी केला त्यामुळे आमचा जमीनीचा पोत सुधारला झाडे बळकट झाली आणि भेसळयुक्त खतांमधून आमची सुटका झाली. केळी मध्ये दर वर्षी अशी अडचण असायची की एका वेळी खूप कमी घड काढायला यायची. आत्ता एक वेळी एक गाडी भरण्या एवढी केळी तर कमीतकमी निघतात. केळी ह्या पिकावर जैविक निविष्टांचा वापर केल्यामुळे फायदा झाला.
जय हिंद
संपर्क-विवेक पाटील,सांगली
०९३२५८९३३१९
Published on: 14 April 2022, 01:54 IST