हरभरा हे एक महत्वाचे कडधान्य पीक आहे. या पिकाचा वापर मानवी आहारात विविध प्रकारे केला जातो. या पिकासाठी मध्यम व कसदार व पाण्याचा निचरा होणारी जमीन उत्तम असते. पाणथळ, चोपण व क्षारयुक्त जमीनीत हरभरा पेरणी करू नये. हरभ-याला दाणे स्वरूपात असताना त्यांना घाटा असे म्हणतात. एका घाट्यात बहुतेक दोन दाणे सापडतात. हरभ-याचे झाड 1-2 फुट उंच वाढते.
पेरणी
हरभरा या पिकासाठी रब्बी हंगामात पेरणी चांगली असते. हरभ-याची पेरणी शक्यतो ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पुर्ण करावी. हरभरा ओलिताखाली पेरणी केल्यास उत्पादन अधिक मिळते. हरभ-याच्या पेरणीकरिता दोन स-याच्या ओळीतील अंतर 30 सें.मी. तर दोन झाडातील अंतर 10 सें.मी. इतके असावे. हरभ-यासाठी रूंद वाफा पध्दत वापरावी. हरभ-यास थंड व कोरडे हवामान, सुर्यप्रकाश, व पुरेसा ओलावा असणे आवश्यक असते. साधारणत: 10 अंश ते 15 अंश सें.ग्रे. तापमान असेल तर पिकाची वाढ चांगली होते असे तापमान महाराष्ट्रात नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यात असते.
पूर्व मशागत
हरभरा पेरणी करण्यासाठी खरीप पीक निघाल्यावर जमिनीची नागंरट खोल करावी. खरीप पिकात शेणखत दिल्यास नवीन खत देण्याची गरज नाही. परंतु दिले नसल्यास हेक्टरी पाच टन कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत नागंरणीपुर्वी जमिनीवर पसरवावे.
बियाण्याचे प्रमाण
हरभरा वाफ्यात स-या पाडल्या जातात व स-याच्या दोन्ही बाजुला 10 सें. मी. अंतरावर बियाणे टोकावे. काबुली वाणासाठी जमीन ओली करून वाफ्यावर पेरणी करावी.
- हरभराच्या लहान दाणाकरिता विजय, विशाल, दिग्विजय, एकेजीएस 50-60 किलो प्रतिहेक्टर बियाणे पेरावे.
- काबुली दाण्यासाठी आयसीसीव्ही-2, पीकेव्ही काबुली-2 100-125 किलो प्रतिहेक्टर बियाणे पेरावे .
आंतरमशागत
पीक 30-35 दिवसाचे असताना कोळपणी करावी. कोळपणीनंतर हरभ-याला घाटा येण्याच्या अगोदर खुरपणी किंवा निदणी करावी.
आंतरपीक
हरभरा पिक मोहरी, करडई, ज्वारी, ऊस पिकांबरोबर आंतरपिक घेता येते. मोहरी आणि करडई च्या एक ओळ याप्रमाणे आंतरपिक घ्यावे. हरभरा हे पिक टोकण केल्यास हरभ-याचे अतिशय चांगले उत्पादन मिळते.
घाटे अळी नियंत्रण
ही अळी हरभ-यावरील मुख्य कीड आहे. ही कीड तूर, मका, सूर्यफूल, टोमॅटो, भेंडी, ज्वारी, वाटाणा इ. पिकांवर उपजीविका करत असल्यामुळे या किडीचे वास्तव्य शेतात वर्षभर राहते त्यामुळे जमिनीची निवड करताना अगोदरच्या हंगामात यापैकी पिके घेतली असल्यास अशा जमिनीत हरभरा पिक घेऊ नये. किड नियंत्रण प्रभाव कमी करण्याकरिता वेगवेगळे औषधे फवारणी करावी.
पाणी व्यवस्शापन
पेरणीच्या वेळेस पहिले हलके पाणी द्यावे. त्यानंतर मध्यम जमिनीसाठी 25-30 दिवसांनी पाणी द्यावे. व दुसरे पाणी 45-50 दिवसांनी आणि आवश्यकता असल्यास तिसरे पाणी 65-70 दिवसांनी द्यावे. हरभरा हे पिक अतिशय संवेदनशील असे पिक आहे.
काढणी
हरभ-याचे घाटे पुर्ण वाळल्यानंतर तरच हरभ-याची काढणी करावी. त्यानंतर पिकाची कापणी करावी. जवळजवळ 100-110 दिवसात पिक चांगले तयार होते. पिक ओलसर किंवा हिरवट असताना काढणी करू नये. हरभरा काढणीनंतर 5-6 दिवस धान्यास कडक उन्हात वाळून घ्यावे व त्यानंतर यंत्राच्या साहाय्याने हरभ-याचे दाणे वेगळे करून घ्यावे. हरभरा साठवणी करिता त्यात कडुलिंबाचा पाला 5 % घालावा. त्यामुळे साठवणीत किड लागत नाही.
उत्पादन
25 ते 30 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळू शकते.
Published on: 27 July 2020, 07:26 IST