Agripedia

टोमॅटो पिकावर येणाऱ्या सदर रोगाची लक्षणे करपा(Blight) या रोगाची आहेत. या रोगामध्ये दोन प्रकार येतात. 1.लवकर येणारा करपा(Early Blight) 2.उशिरा येणारा करपा(Late Blight)

Updated on 19 October, 2021 8:21 PM IST

1.लवकर येणारा करपा (अर्लीब्लाईट):-

 हा रोग अल्टरनेरिया सोलाणी या बुरशीमुळे होतो. 

लक्षणे:-

 पानांच्या वरील बाजूस तांबडे काळसर गोलाकार ठिपके पडतात.

कालांतराने हे ठिपके एकमेकांत मिसळून अनियमित आकाराचे काळसर गोल बनतात.

 या ठिपक्यांच्या मध्यभागी एकच मध्यबिंदू असलेल्या गोल वलयाकृती रेषा आढळतात.

या रोगास उबदार दमट हवामान पोषक असते. अशा हवामानात रोगाचे प्रमाण वाढते आणि रोगाचे प्रमाण जास्त झाल्यावर पानांच्या देठांवर ठिपके आढळतात आणि सर्व झाड करपते. 

2.उशिरा येणारा करपा(Late Blight):-

रोगाचा उपद्रव झाडांवर व फळांवरदेखील आढळून येतो.

लक्षणे:

 पानांवर तपकिरी रंगाचे ठिपके पडतात नंतर ते आकाराने वाढतात संपूर्ण पान वाळते.

 या रोगाचा प्रादुर्भाव प्रथम खालील पानांवर आढळून येतो. 

पानांचा रोगग्रस्त भाग हात लावल्यानंतर कोलमडतो.

हवामान दमट असेल तर संपूर्ण पान दोन ते चार दिवसांत रोगग्रस्त होते.

या रोगाचा प्रादुर्भाव फळांवरसुद्धा होतो. फळांवर चट्टे पडतात व त्यामुळे अशा फळांना बाजारात कमी किंमत मिळते.

एकात्मिक रोग व्यवस्थापन:-

1)रोगमुक्त रोपांची लागवडी साठी निवड करावी.

2)करपा रोग सहनशील व प्रतिरोध वानास पसंती द्यावी  जसे अर्का रक्षक,जे करपा व विषाणुजन्य रोगास प्रतिरोध करते.

3)प्रादुर्भाव दिसताच रोगग्रस्त पाने तोडून शेताबाहेर नष्ट करावीत.

4)लवकर येणाऱ्या करप्यासाठी:-

टोमॅटोचे पीक पाच ते सहा आठवड्यांचे झाल्यावर मॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून दोन ते तीन दिवसांच्या अंतराने फवारावे. 

5)उशिरा येणाऱ्या करप्यासाठी:-

रोगाची लक्षणे दिसताच मॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवा अझोक्झिस्ट्रोबिन १० मि.ली. किंवा सीमोक्झनिल + मॅन्कोझेब २५ ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळून १५ दिवसांच्या अंतराने प्रत्येकी दोन फवारण्या आलटून पालटून कराव्यात किंवा कॉपर ऑक्झीक्लोराईड २५ ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळून १५ दिवसांच्या अंतराने आलटून-पालटून फवारावे. आवश्यकतेनुसार तीन ते चार फवारण्या कराव्यात. उशिरा येणारा करपा आणि फळसड रोगांच्या नियंत्रणासाठी वरील बुरशीनाशकांव्यतिरिक्त मेटॅलॅक्झील एम.झेड-७२ किंवा फोसेटील ए.एल. (२५ ग्रॅम प्रती १० ली. पाणी) आवश्यकतेनुसार आलटून पालटून फवारावीत.

English Summary: Symptoms of tomato crop and its management
Published on: 19 October 2021, 08:21 IST