Agripedia

उन्हाळी भुईमूग लागवडीची अनेक पद्धती आपण आज जाणून घेणार आहोत.

Updated on 06 January, 2022 4:38 PM IST

उन्हाळी भुईमूग लागवडीची रुंद वाफा सरी पद्धत किंवा गादीवाफा पद्धत :

या पद्धतीत गादी वाफ्याची जमिनीलगत रुंदी 150 सेंटीमीटर ( ५ फूट) तर वरची म्हणजे माथ्याची रुंदी 120 सेंटीमीटर ( ४ फूट) ठेवून तसेच या वाफ्याची जमिनीपासून उंची साधारणता पंधरा सेंटीमीटर (अर्धा फूट) ठेवून गादीवाफे तयार केल्या जातात. याप्रकारे तयार केलेल्या वाफ्याची लांबी जमिनीच्या उतारानुसार 40 ते 50 मीटर ठेवता येते. अशा गादीवाफ्यावर दोन ओळीतील अंतर तीस सेंटीमीटर व दोन झाडांतील अंतर दहा सेंटीमीटर ठेवून उन्हाळी भुईमुगाची टोकण पद्धतीने लागवड करावी. बियाण्याची टोकण करताना जमिनीत गादीवाफ्यावर असणारी ओल बियाण्याची उगवणशक्ती तसेच टोकण करताना बियाणे पाच ते सहा सेंटीमीटर पेक्षा खोल पडणार नाही याची काळजी घेऊन टोकन करणे गरजेचे असते. गादीवाफा पद्धतीने पेरणी केल्यास जमीन भुसभुशीत राहत असल्याने मुळांची कार्यक्षमता वाढून पिकाची वाढ जोमदार होते व उत्पादनात वाढ होते. गादीवाफा पद्धतीमध्ये जमिनीत पाणी व हवा याचे प्रमाण संतुलित ठेवता येते त्यामुळे पिकाची कार्यक्षमता वाढते व पिकास पाण्याचा ताण बसत नाही तसेच जास्त पाणी दिल्या गेल्यास सरीतून पाण्याचा निचरा होण्यास मदत होते. गादीवाफा पद्धती मध्ये तुषार सिंचन पद्धतीने पाणी देणे सोयीस्कर होते. या पद्धतीत पाटाने पाणी सुद्धा देता येते त्यासाठी वेगळी रानबांधणी करावी लागत नाही तसेच या पद्धतीत संतुलित अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन उन्हाळी भुईमूग पिकाला करणे शक्य होते.

सर्वसाधारण टोकण पद्धत किंवा सपाट वाफा पद्धत :

 सपाट वाफा पद्धतीने भुईमुगाची पेरणी करावयाची झाल्यास पेरणी यंत्राच्या साह्याने किंवा टोकण पद्धतीने किंवा तिफणीच्या मागे सरते बांधून पेरणी करता येते.पेरणी यंत्र नसल्यास पेरणी शक्यतोवर टोकण पद्धतीने करावी. सपाट वाफा पद्धतीने पेरणी करावयाची झाल्यास पेरणी यंत्राच्या साह्याने दोन ओळीतील अंतर तीस सेंटिमीटर व दोन झाडांतील अंतर दहा सेंटीमीटर ठेवून टोकण करता येईल. पेरणी यंत्र नसल्यास पेरणी टोकण पद्धतीने करावी. एका ठिकाणी एक बी टोकावे. बियाण्याची उगवणशक्ती कमी असल्यास एका ठिकाणी दोन बि टोकणयास हरकत नाही किंवा त्यापेक्षा दोन बियाणे मधील अंतर कमी करून एका ठिकाणी एकच बी टोकन करणे सुद्धा चांगले. टोकण पद्धतीने पेरणी केल्यास बियाणे कमी लागते व हेक्‍टरी झाडांची संख्या योग्य राखता येते. तिफणीने सऱ्या पाडून ठराविक अंतरावर मजुरांच्या साह्याने बी टोकण करता येते. पेरणी झाल्यानंतर बी चांगले झाकले जाईल

तसेच पक्षी बी खाणार नाहीत याची काळजी घ्यावी व बियाणे टोकन किंवा लागवड करताना साधारणतः दोन ते अडीच इंच यापेक्षा जास्त ( ५ ते ६ सेंटीमीटर पेक्षा जास्त ) खोल पडणार नाही तसेच अति उथळ सुद्धा राहणार नाही याची काळजी घ्यावी. बी जास्त खोल पेरल्यास बिया ची ताकद अंकुर जमिनी बाहेर निघण्यामध्येच खर्च होईल आणि मूळ लहान राहून त्याची वाढ आणि विस्तार बरोबर होणार नाही. जमिनीच्या मगदुरानुसार उन्हाळी भुईमूगसाठी तयार केलेल्या जमिनीस पेरणीपूर्व ओलीत करून वाफसा आल्यावर पेरणी करणे योग्य ठरते.पेरणी झाल्यानंतर उगवन होईपर्यंत शेताची राखण करावी.

   शेतकरी बंधूंनो सर्वसाधारणपणे साध्या सपाट वाफा दोन ओळीतील अंतर 30 सेंटीमीटर व दोन झाडांतील अंतर दहा सेंटीमीटर ठेवून पेरणी केल्यास टीएजी 24 यासारख्या वानात बियाण्याची आदर्श उगवणक्षमता गृहीत धरून एकरी 55 ते 60 किलो बी पेरणीसाठी लागते. साधारणता हेक्‍टरी 3.33 लाख उन्हाळी भुईमुगाची झाडे या प्रमाणात झाडाची संख्या शेतात राहील याची काळजी घ्यावी.

    भुईमुगाचे चांगले उत्पादन येण्याकरता उगवण झाल्यावर खांडन्या आढळल्यास त्या भरून घ्याव्यात व मुख्यतः खांडन्या पडणारच नाहीत याची काळजी घ्यावी.

टीप: 

१) पेरणीपूर्वी योग्य शिफारशीत व प्रमाणित बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्याची उगवणशक्ती तपासून घ्यावी 

निर्देशीत पद्धतीचा वापर करण्यापूर्वी प्रत्यक्ष तज्ञांचा सल्ला

  आपले स्थानिक परिस्थितीनुसार आपले स्वतःचे अनुभव आवश्यकतेनुसार वापरून योग्य लागवड पद्धती द्वारे प्रत्यक्ष तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच लागवड पद्धतीचा वापर करणे केव्हाही चांगले. वर निर्देशित पद्धती एक सर्वसाधारण कल्पना शेतकरी बंधूंना यावी याकरता दिल्या आहेत. प्रत्यक्ष तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा वापर करणे केव्हाही हितावह असते.

 

राजेश डवरे कीटक शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम.

English Summary: Summer groundnut drilling methods
Published on: 06 January 2022, 04:38 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)