Agripedia

उन्हाळी भुईमूग पिकातील अन्नद्रव्याच्या किंवा खताच्या व्यवस्थापना संदर्भात आपण काही बाबी जाणून घेणार आहोत.

Updated on 06 January, 2022 4:25 PM IST

(A) नेमकी उन्हाळी भुईमूग पिकात विदर्भासाठी खताची किंवा प्राथमिक अन्नद्रव्याची काय शिफारस आहे? उन्हाळी भुईमूग पिकाकरिता माती परीक्षणाच्या आधारावर अन्नद्रव्याचे किंवा खताचे व्यवस्थापन करावे. साधारणपणे उन्हाळी भुईमूग पिकात 25 किलो नत्र अधिक 50 किलो स्फुरद अधिक आवश्यकता असल्यास 30 किलो पालाश प्रति हेक्टर पेरणी सोबत देण्याची शिफारस डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी केली आहे. 

B) उन्हाळी भुईमूग या पिकामध्ये एकीकृत अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा अंगीकार करून खते द्यावी म्हणजे नेमके काय?

(१) सर्वप्रथम माती परीक्षण करून घ्या आणि आपल्या जमिनीसंदर्भात सामू, चुनखडी चे प्रमाण, उपलब्ध नत्र स्फुरद पालाश तसेच उपलब्ध सूक्ष्म अन्नद्रव्य व इतर बाबीची माहिती घ्या व माती परीक्षणाच्या आधारावर शिफारशीप्रमाणे उन्हाळी भुईमूग पिकात पिकात अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करा हा एकिकृत अन्नद्रव्ये व्यवस्थापनाचा पाया आहे.

(२) उन्हाळी भुईमूग पिकाला शिफारशीप्रमाणे शेणखत किंवा कंपोस्ट खत द्या

(३) उन्हाळी भुईमूग पिकाला रायझोबियम आणि पीएसबी या जिवाणू खताची बीजप्रक्रिया करा

(४) उन्हाळी भुईमूग पिकात माती परीक्षणाच्या आधारावर आपल्या जमिनीमध्ये कमतरता असलेले सूक्ष्म अन्नद्रव्य शिफारशीप्रमाणे जमिनीत व फवारणीद्वारे द्या.

(४) शिफारशीप्रमाणे रासायनिक खताची मात्रा माती परीक्षणाच्या आधारावर योग्य खताची निवड करून निर्देशित शिफारशीत वेळी योग्य प्रमाणातच द्या.

(५) शिफारशीप्रमाणे जिप्सम या खताचा उन्हाळी भुईमूग या पिकात निर्देशित वेळी निर्देशित प्रमाणात वापर करा.

(६) विद्राव्य व सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त फवारणीच्या खताची शिफारशीप्रमाणे योग्य कालावधीत माती परीक्षणाच्या आधारावर अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार फवारणी करा.

शेतकरी बंधूंनो वर निर्देशित घटक सुयोग रित्या वापरून रासायनिक खताचा माती परीक्षणाच्या आधारावर योग्य तेवढाच वापर करणे म्हणजे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन होय. 

(C) एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा घटक म्हणून एक एकर उन्हाळी भुईमूग पिकाला कोणते सेंद्रिय खत किती प्रमाणात व कधी वापरावे? 

   शेतकरी बंधूंनो उन्हाळी भुईमूग पिकात जमिनीची पूर्वमशागत करताना शेवटच्या कुळवाच्या अगोदर प्रति हेक्टर पाच ते दहा टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून द्यावे म्हणजेच जवळजवळ प्रति एकर आठ ते दहा गाड्या चांगले कुजलेले शेणखत जमीन तयार करताना जमिनीत चांगले मिसळून द्यावे व नंतर शेवटची वखराची पाळी द्यावी.

(D) उन्हाळी भुईमूग पिकात सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांचा प्रति एकर वापर कसा , कधी व किती प्रमाणात करावा?

शेतकरी बंधूंनो पूर्वी सांगितल्याप्रमाणे सर्वप्रथम सूक्ष्म अन्नद्रव्य करता माती परीक्षण करून घ्या आणि माती परीक्षणाच्या आधारावर सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांचा वापर उन्हाळी भुईमूग पिकात करावा. सर्वसाधारणपणे विदर्भाच्या जमिनीत झिंक या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता जाणवते. माती परीक्षणाच्या अहवालात झिंक या अन्नद्रव्याची कमतरता आढळल्यास एकरी चार ते सहा किलो झिंक सल्फेट तसेच माती परीक्षणाच्या आधारावर तीन वर्षातून एकदा दोन किलो बोरॅक्‍स प्रति एकर या प्रमाणात पेरताना माती परीक्षणाच्या आधारावर जमिनीतून द्यावे. याव्यतिरिक्त झिंक या अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे उभ्या भुईमूग पिकात आढळून आल्यास तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य निदान करून झिंक या अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे आढळून चिलेटेड झिंक सल्फेट 50 ग्रॅम अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन गरजेनुसार तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली फवारणी करावी. या व्यतिरिक्त बोरॉन व लोह यांच्या कमतरतेची लक्षणे आढळल्यास तज्ञांचा सल्ला घेऊन योग्य निदान करून योग्य त्या उपाययोजना अमलात आणाव्यात.

(E) उन्हाळी भुईमूग पिकात जिप्समचा वापर : शेतकरी बंधुंनो जिप्सम या खतात किंवा भूसुधारक आत 24 टक्के कॅल्शिअम व 18 टक्के गंधक असते. या अन्नद्रव्याची सुद्धा उन्हाळी भुईमुगाच्या अधिक उत्पादनाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. तेव्हा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या शिफारशी प्रमाणे उन्हाळी भुईमुगाचे पीक 50% फुलोरा अवस्थेत असताना प्रति हेक्टर तीनशे ते पाचशे किलो जिप्सम उपलब्धतेनुसार झाडाच्या दोन्ही बाजूला साधारणता झाडाच्या लगत पाच सेंटीमीटर अंतरावर सरळ ओळींमध्ये टाकून देणे त्यानंतर डवऱ्याचा फेर देऊन ओलित करणे फायदेशीर आढळून आलेले आहे. या बाबींमुळे भुईमुगाच्या आऱ्या जमिनीत सुलभरित्या जाण्याकरिता तसेच शेंगा चांगल्या पोसण्यास मदत होते व उत्पादनात वाढ होते. याव्यतिरिक्त महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या सुधारित 2013 च्या शिफारशीप्रमाणे 400 किलो जिप्सम प्रति हेक्टर विभागून म्हणजे 200 किलो जिप्सम प्रति हेक्‍टर पेरणीच्या वेळेस व उर्वरित दोनशे किलो जिप्सम प्रति हेक्टर आर्या सुटताना अशीसुद्धा जिप्सम वापरण्याची एक शिफारस आहे 

(G) उन्हाळी भुईमूग पिकात जैविक खताचा वापर कसा, कधी, व किती प्रमाणात करावा?

शेतकरी बंधूंनो उन्हाळी भुईमूग बियाण्याला पिकाला 250 ग्रॅम रायझोबियम व 250 ग्रॅम पीएसबी या जिवाणू खताची प्रति 10 किलो बियाण्यास या प्रमाणात बीज प्रक्रिया करून घ्यावी. भुईमुगाचे बियाणे नाजूक असल्यामुळे हे बियाणे ओले गच करणे टाळावे, हाताने चोळणे टाळावे तसेच बीज प्रक्रिया करताना प्रत्यक्ष तज्ञांचा सल्ला घेऊन योग्य ते कौशल्य अवगत करून भुईमूग बियाण्याची साल किंवा टरफल निघणार नाही याची पूर्ण काळजी घ्यावी. आवश्यक असल्यास तज्ञाचा सल्ला घेऊनच बीजप्रक्रिया करावी. जिवाणू खताची बीजप्रक्रिया रासायनिक बुरशीनाशके किंवा रासायनिक कीटकनाशके यांच्याबरोबर करू नये तसेच रासायनिक निविष्ठांची बीजप्रक्रिया करावयाची झाल्यास ती प्रथम करावी व नंतर 15 ते 20 मिनिटानंतर जैविक खताची किंवा जैविक निविष्ठा ची बीज प्रक्रिया करावी व रासायनिक निविष्ठांची बीजप्रक्रिया केली असल्यास जीवाणू खत वापराचे प्रमाण शिफारशीपेक्षा दीडपट किंवा दुप्पट ठेवावे.

अधिक उत्पादन घेण्याकरिता उन्हाळी भुईमूग पिकात अन्नद्रव्याचे किंवा खताचे व्यवस्थापन करताना घ्यावयाच्या सर्वसाधारण काळजी.

(१) उन्हाळी भुईमूग पिकात माती परीक्षणाच्या आधारावर एकीकृत अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा अंगीकार करूनच खताची किंवा अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करा.

(२) असंतुलित अविवेकी व अतिरेकी खताचा वापर टाळा विशेषता उभ्या पिकात नत्रयुक्त खताचा अवाजवी वापर टाळा.

(३) आवश्यकतेनुसार तज्ञांचा सल्ला घेऊन योग्य खताची निवड करून शिफारशीत अन्नद्रव्यांची मात्रा त्या खतातून शिफारशीप्रमाणे जाते का तसेच ते आर्थिक दृष्ट्या परवडण्यासारखे आहे का व जमिनीच्या आरोग्यासंदर्भात सुद्धा ते हितावह आहे का या सर्व बाबीची शहानिशा करून शास्त्रोक्त शिफारशीप्रमाणे उन्हाळी भुईमूग पिकात अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन किंवा खताचे व्यवस्थापन करा.

 

राजेश डवरे कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम

English Summary: Summer groundnut crops nutrients
Published on: 06 January 2022, 04:25 IST