उन्हाळी हंगामातील पेरणीची योग्य वेळ अतिशय महत्वाची असते. उन्हाळी पिकांची पेरणी लवकर केल्यास त्याचा पीक उगवणीवर व पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम होता,तर पिकांची पेरणी उशिरा झाल्यास अतिउष्णतेचा विपरीत परिणाम फुलोऱ्यावर तसेच दाणे भरण्यावर होऊ शकतो. तसेच मे महिन्याच्या शेवटी होणाऱ्या अवकाळी पावसात काढणीच्या वेळी पीक सापडू शकते म्हणून उन्हाळी हंगामातील पिकांची योग्य वेळी पेरणी करणे आवश्यक आहे.
उन्हाळी सूर्यफुल:
उन्हाळी हंगामातील लागवडीकरिता फेब्रुवारीचा पहिला पंधरवडा ही पेरणीची उत्तम वेळ आहे. मध्यम खोल जमिनीत 45 x 30 से.मी व भारी जमिनीत 60 X 30 से.मी तसेच संकरीत आणि जास्त कालावधीच्या वाणांची 60 X 30 से.मी. अंतरावर पेरणी करावी पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी,म्हणजे बी व खत एकाच वेळी पेरता येते.बियाणे ५ से.मी. पेक्षा जास्त खोल पेरू नये बागायती पिकाची लागवड सरी वरंब्यावर टोकन पद्धतीने करावी.पेरणीसाठी सुधारित वाणाचे ८ ते १० किलो /हेक्टरी तर संकरीत वाणाकरिता ५ ते ६ किलो /हेक्टरी बियाणे वापरावे.
पेरणीकरिता सुधारित वाणामध्ये फुले भास्कर,भानू, एस एस ५६,तर संकरीत वाणा मध्ये KBSH 44,फुले रविराज ,MSFH 17 या वाणांची निवड करावी मर रोगाच्या प्रतिबंधासाठी २ ते २.५ ग्रम थायरम किंवा ब्रासिकॉल प्रति किलो बियाण्यास चोळावे.केवडा रोग टाळण्यासाठी ६ ग्रम अॅप्रोन ३५ एस डी. प्रति किलो बियाण्यास चोळावे तसेच विषाणूजन्य रोगाच्या प्रतिबंधासाठी इमिडॅक्लोप्रीड ७० डब्लू ए गाऊचा ५ ग्रम प्रति किलो बियाण्यास चोळावे त्यानंतर अॅझोटोबॅकटर २५ ग्रॅम /किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
उन्हाळी तीळ:
उन्हाळी तिळाची पेरणी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान करावी.पेरणी फेब्रुवारी नंतर केल्यास काढणीच्या वेळी पीक पावसात सापडण्याची शक्यता असते.त्यामुळे संक्रांतीनंतर त्वरित पेरणी करावी. पेरणी करतांना हेक्टरी बियाण्याचे प्रमाण २.५ ते ३ किलो घ्यावे.प्रति किलो बियाण्यास थायरम ३ ग्रॅम व ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.दोन ओळीतील अंतर ३० x १५ से.मी. किंवा ४५ x १५ से.मी. ठेवून पाभरीने पेरणी करावी. पेरणी करताना बियाण्यात बियाण्याएवढ्या आकाराची बारीक वाळू अथवा चालून घेतलेले शेणखत,गांडूळखत मिसळावे.म्हणजे बियाण्याचे वितरण प्रमाणशीर होण्यस मदत होते.पेरणी २.५ से.मी.पेक्षा जास्त खोलीवर करू नये.
पेरणीसाठी एकेटी -१०१,पीकेव्ही एनटी ११ ,जेएलटी -४०८, फुले तीळ-१, तापी (जेएलटी -७) ,फुले पूर्णा (जेएलटी ४०८-२ ),पदमा( जेएलटी २६) या वाणांची पेरणी करावी.तीळ पिकास २५ किलो नत्र ,२५ किलो स्फुरद व २० किलो गंधक प्रति हेक्टरी पेरणीच्या वेळी दयावे.पेरणीनंतर एक महिन्यांनी २५ किलो नत्र दयावे.
उन्हाळी ज्वारी:
उन्हाळी ज्वारीची पेरणी डिसेंबर चा शेवटचा आठवडा ते जानेवारीच्या पहिला पंधरवड्यात करणे अतिशय योग्य असते. विशेषतः संक्रांतीनंतर च्या आठवड्यात पेरणीची योग्य वेळ समजली जाते. पेरणीस उशीर झाल्यास पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना अतिउष्णतेचा विपरीत परिणाम पीक उत्पादनावर होऊ शकतो.तसेच काढणीच्या वेळी पीक पावसात सापडू शकते.
Published on: 22 February 2024, 10:51 IST