Agripedia

सध्या परिस्थिती मध्ये बऱ्याच भागात उसावर पायरीला व पांढरी माशी या रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

Updated on 23 January, 2022 6:26 PM IST

सध्या परिस्थिती मध्ये बऱ्याच भागात उसावर पायरीला व पांढरी माशी या रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

पायरीला (पाकोळी)- या किडीची पिल्ले व प्रौढ ऊसातील पानाचा रस शोषून घेतात त्यामुळे उसाच्या पानाचा हिरवेपणा कमी होऊन पाने निस्तेज व पिवळी पडतात तसेच हि किड पानावर एक प्रकारचा चिकट व गोड पदार्थ सोडते त्यामुळे पानावर काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव होऊन काजळी पडल्यासारखा रंग चढून पानांची अन्न तयार करण्याची प्रक्रिया मंदावते आणि उसाची पाने वाळू लागतात व ऊसातील साखरेचे प्रमाण घटते.

पांढरी माशी - या किडीची पिल्ले व प्रौढ दोन्ही पानातील रस शोषण करतात परंतु बाल्यावस्था पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करते या अवस्थेत कीड पानाच्या मागील बाजूने स्थिर राहून पानातील रस शोषण करते त्यामुळे पान निस्तेज होतात,पिवळी व गुलाबी पडतात आणि कालांतराने वाळू लागतात बर्‍याचदा किड तिच्या शरीरातून करीत असलेल्या चिकट गोड स्त्रावामुळे कॅप्नोडियम बुरशीची पानावर वाढ होऊन पाने काळी पडू लागतात व अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो.

व्यवस्थापन

१.उसाची लागवड पट्टा अथवा रुंद सरी पद्धतीने करावी त्यामुळे कीडनाशकांची फवारणी किंवा धुरळणी करणे सोयीचे होईल.

२. पांढऱ्या माशी ने प्रादुर्भावग्रस्त पाने काढून नष्ट करावीत.

३.ऊसात पाणी साचत असल्यास चर काढून पाण्याचा निचरा करावा आणि पाण्याचा जास्त ताण पडल्यास पाणी द्यावे.

४. नत्रयुक्त खतांचा जास्त वापर करू नये.

५. पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर करावा.

६. पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.

७. व्हर्टिसिलियम लिकॅनी या जैविक बुरशीची ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

८. रासायनिक कीटकनाशकामध्ये क्लोरोपायरीफॉस २० टक्के ३० मिली किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के ३ मिली किंवा अॅसीफेट ७५% २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

आवश्यकता वाटल्यास दहा दिवसानंतर दुसरी फवारणी करावी.

कीटकनाशकाची फवारणी आलटून-पालटून करावी

वरील प्रमाण साध्या पंपासाठी असून पावर पंपासाठी किटकनाशकाचे प्रमाण तीन पट करावे.

 

अधिक माहितीसाठी संपर्क करा

कृषि विज्ञान केंद्र, औंरगाबाद-१

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी

English Summary: Sugercane white fly management
Published on: 23 January 2022, 06:26 IST