डॉ.एस.के.घोडके, डॉ.एम.एस.माने, डॉ.आर.एल.भिलारे
महाराष्ट्रामध्ये ऊस पिकाखालील क्षेत्र जवळजवळ १०-१२ लाख हेक्टर असते तसेच दर हेक्टरी उत्पादकता ८०-९० टन दरम्यान दिसून येते. राज्याची दर हेक्टरी उत्पादकता ही फारच कमी दिसून येते. त्याचे प्रमुख कारण म्हणजे खोडवा पिकाचे कमी उत्पादन हे आहे. कारण राज्यातील एकूण ऊस क्षेत्रापैकी ४० टक्के क्षेत्र खोडव्याचे आहे. मात्र एकूण उत्पादनात खोडव्याचा हिस्सा फक्त २० ते २५ टक्के इतकाच आहे. म्हणून ऊस पिकाचे सरासरी प्रति हेक्टरी उत्पादन वाढविण्यासाठी लागणीच्या ऊसाइतकेच खोडवा पिकास महत्व देणे आवश्यक आहे.
परंतु खोडवा व्यवस्थापनाकडे पाहिजे त्या पध्दतीने लक्ष न दिल्याने खोडव्याची उत्पादकता कमी झाल्याचे दिसून येते. खोडवा पिकाची जोपासना आधुनिक तंत्राने केल्यास खोडव्याचे उत्पादन लागणीच्या ऊसा इतकेच येऊ शकते, किंबहुना त्याहीपेक्षा जास्त येऊ शकते, असे मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगांव येथील संशोधनावरुन दिसून आले आहे.
ऊस पाचटमध्ये उत्तम कर्ब
ऊसाच्या पाचटामध्ये ०.५ टक्के नत्र, ०.२ टक्के स्फुरद आणि ०.७ ते १ टक्के पालाश असते आणि ३२ ते ४० टक्के सेंद्रिय कर्ब असते. असे पाचट जाळल्यास त्यातील सेंद्रिय कर्बाचा पूर्णतः नाश होतो. पाचटातील नत्र आणि स्फुरदाचा ९० टक्केहून अधिक भाग जळून जातो. केवळ पालाश काही प्रमाणात शिल्लक राहते. या सर्व बाबींचा विचार करुन पाचटाचा खोडव्यामध्ये वापर करण्याच्या दृष्टीने प्रयोग घेण्यात आले. त्यात असे आढळून आले की, एक हेक्टर क्षेत्रामधून ८ ते १० टन पाचट मिळते आणि त्यापासून ४० ते ५० किलो नत्र, २० ते ३० किलो स्फुरद, ७५ ते १०० किलो पालाश आणि ३ ते ४ हजार किलो सेंद्रिय कर्ब जमिनीत घातले जाते.
महाराष्ट्रामध्ये घेतल्या जाणा-या खोडवा पिकामध्ये पाचटाचा वापर मात्र २ टक्के क्षेत्रावरही होत नाही. हे थांबविण्यासाठी पाडेगांव येथे खोडव्यात पाचट, सुरुवातीच्या कालावधीमध्ये आच्छादन म्हणून आणि नंतर हयाच पाचटाचे जागेवरच चांगले सेंद्रिय खत तयार करण्याचे तंत्र विकसित केले आहे, आणि त्याचे निष्कर्ष फारच परिणामकारक आहेत. हे दृष्य परिणाम पाडेगांव येथील संशोधन प्रक्षेत्रावर पाहून शेतक-यांनी ते आपल्या शेतावर आमलात आणले आहेत. त्याचे क्षेत्रदेखील दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे सर्व ऊस उत्पादक शेतक-यांना विनंती की ऊसाची पाचट न जाळता खोडव्यामध्ये हया नैसर्गिक साधन संपत्तीचा पुनश्चः वापर करुन खोडवा व्यवस्थापन करावे. त्यामुळे खोडव्याचे उत्पादनात वाढ होतेच शिवाय जमिनीची सर्व प्रकारची सुपिकता व उत्पादकता देखील वाढते.
खोडवा पिकापासून होणारे फायदे :
१. लागण ऊसाप्रमाणे खोडवा पिकासाठी पूर्वमशागत करावी लागत नसल्याने जमिनीतील पूर्वमशागतीवरील खर्च वाचतो. त्यामुळे साधारणपणे सुरु ऊसासी तुलना करताना हेक्टरी रु.१२००० ते १५००० इतकी खर्चात बचत होते.
२. पूर्वमशागतीवरील खर्चाबरोबरच शेताच्या तयारीसाठी लागणारा वेळ आणि श्रम यांची बचत होते.
३. खोडवा घेतल्यामुळे ऊस लागवडीसाठी लागणारे ऊस बेणे, बीजप्रक्रिया व ऊस लागवड इत्यादी बाबतीत खर्चात बचत होते. साधारणपणे सुरु ऊसासी तुलना करताना प्रति हेक्टरी रु.२१०००/-पर्यंतच्या खर्चाची बचत होते.
४. खोडवा पिकास फुट होण्यासाठी जमिनीतील कांडयावर भरपूर डोळे असतात. त्यामुळे ऊसांची संख्या लागणीच्या ऊसापेक्षा जास्त मिळते.
५. खोडवा पीक पाण्याचा ताण जास्त प्रमाणात सहन करते, त्यामुळे पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात फारशी तफावत पडत नाही.
६. खोडवा पिकात पाचटाचा पूर्ण वापर करणे सहज शक्य होते. पाचटाचा आच्छादन म्हणूनही उपयोग होत असल्याने पाण्याची कमतरता असल्यास खोडवा पीक चांगले तग धरते.
खोडवा पीक घेतांना विचारात घ्यावयाच्या बाबी
१. सर्वसाधारणपणे १५ फेब्रुवारी पर्यंत तुटलेल्या ऊसाचाच खोडवा ठेवणे फायदेशीर ठरते. त्याच्यानंतर खोडवा घेतल्यास खोड किडींचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर होतो.
२. ज्या ऊस लागणीच्या ऊसाचे उत्पादन हेक्टरी १०० टन आणि ऊस संख्या एक लाखापेक्षा जास्त आहे, अशा ऊसाचाच खोडवा ठेवावा.
३. ऊस पीक विरळ झाल्यास नांग्या भराव्यात. नांग्या भरण्यासाठी प्लास्टिकच्या / पॉलिट्रेमधील तयार केलेली रोपे वापरावीत. किवा सुपरकेन नर्सरीचे तंत्रज्ञान वापरावे.
४. खोडवा पीक हे हलक्या, कमी खोलीच्या तसेच निचरा न होणा-या क्षारपड अथवा चोपण जमिनीत घेऊ
नये.
५. शिफारस केलेल्या ऊस जातींचाच खोडवा ठेवावा.
Published on: 16 January 2024, 03:52 IST