जागतिक पातळीवर सोयाबीन या पिकाला प्रथम व अग्रगण्य स्थान आहे. सध्या देशातील खाद्य तेलाची व आहारातील पौष्टीक कमतरतेची तूट भरुन काढण्यासाठी सोयाबीन हे पीक अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडत आहे. सोयाबीन हे एक सकस अन्न असून त्यात १८-२० टक्के खाद्य तेल ३८-४२ टक्के प्रथिनांचे प्रमाण आहे.
सोयाबीन हे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन देणारे पीक असल्यामुळे या पीकाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आणि या पीकामुळे महाराष्ट्रातील कोरडवाहू शेती अधिक लाभदायक झाली. परंतू गेल्या काही वर्षात पावसाळ्याला उशिरा सुरुवात आणि लवकर संपत असल्यामुळे तसेच सरासरी तापमाणात वाढ झाल्यामुळे हे पीक मोठ्या प्रमाणात प्रभावीत झाले. या उदभवलेल्या परीस्थीतीत यशस्वी सोयाबीन उत्पादन घेण्याकरीता आधुनिक सुधारीत तंत्रज्ञानाचा वापर करणे आता अपरिहार्य झाले आहे. हे पीक तापमान व सुर्यप्रकाशाचा कालावधी या दोन्ही बाबीला संवेदनशील आहे. उगवणीच्या काळात तापमान ३० अंश सेल्सीयस आणि फुलोऱ्याच्या काळात २२ ते २७ अंश सेल्सीयसच्या जवळपास असावे.
जमिन व्यवस्थापन:
मध्यम ते भारी पण पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन सोयाबीनच्या लागवडीसाठी योग्य आहे. हलक्या जमिनीत पिकाचे उत्पादन कमी येते. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ असावा. पुर्वीच्या पिकांची काढणी होताच जमिनीची नांगरणी करावी. नांगरणी उन्हाळ्याच्या सुरुवातीस केल्यास शेतातील सुप्तकिडी, कोष व तणांचा बंदोबस्त होण्यास मदत मिळेल. नांगरणी नंतर वखराच्या दोन ते तीन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. वखर पाळीच्या अगोदर हेक्टरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत जमीनीवर द्यावे म्हणजे ते कुळवाच्या शेवटच्या पाळीने जमिनीत चांगले मिसळले जाते.
सुधारीत वाणांची निवड:
पीकाच्या उत्पादनात, जमीन व हवामान स्वरुप, योग्य त्या सुधारीत वाणाची निवड व त्याचे निरोगी उच्च दर्जाचे बियाण्याची उपलब्धता, यांचा सिंहाचा वाटा आहे. चांगल्या निवडक जातीचे बियाण्याची उपलब्धता हा सोयाबीन शेतकर्यांना नेहमीचाच भेडसावणारा प्रश्न आहे. या करीता त्यांनी आवश्यक असलेले बियाणे स्वत: तयार करावे. सोयाबीनचे काही महत्वाचे वाण व त्याचे वैशिष्टे खालील तक्त्यात देण्यात आलेले आहेत.
अ. क्र. |
वाणाचे नांव |
परीपक्वता कालावधी |
१०० दाण्याचे वजन |
हेक्टरी उत्पादन |
१. |
जे. एस. ३३५ |
९५ ते १०० |
११-१२ |
२२-२५ |
२. |
एन. आर. सी. ३७ |
१०५ ते १०७ |
१०-११ |
२५-३० |
३. |
एम. ए. सी. एस. ४५० |
९० ते ९५ |
११-१२ |
२५-३५ |
४. |
जे. एस. ९३-०५ |
८५ ते ९० |
१२-१३ |
२२-२४ |
५. |
जे. एस. ९७-५२ |
१०० ते १०५ |
११-१२ |
२५-३० |
६. |
जे. एस. ९५-६० |
८० ते ८५ |
१२-१३ |
२०-२५ |
टिप: जे.एस.९७-५२ हे सोयाबीन वाण वाय.एम.व्ही. (पिवळा मोझॅक) या रोगाला कमी बळी पडणारे आहे.
जिवाणू खते व बिजप्रक्रिया:
प्रती किलो बियाण्यास ३ ग्राम थायरम किंवा २ ग्राम थायरम + व १ ग्राम कार्बेन्डाझीम लावल्यानंतर तिन तासांनी ४ ग्राम ट्रायकोडर्मा लावावे व त्यानंतर जिवाणूखते रायझोबियम जपोनिकम व पी.एस.बी. प्रत्येकि २५० ग्राम प्रती १० किलो बियाण्यास पेरणीपुरर्वी २ ते ३ तास अगोदर लावूण बियाणे सावलीमध्ये वाळवावे.
मूलद्रव्य व्यवस्थापन:
पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी पेरणीच्या वेळेस हेक्टरी ३० किलो नत्र, ७५ किलो स्फुरद व ३० किलो पालाश द्यावे. खताची पुर्ण मात्रा पेरणीच्या वेळी जमिनीत एकाच वेळी पेरुण द्यावीत. त्याचप्रमाणे ३० किलो गंधक, २० किलो झिंक सल्फेट व २० किलो बोरॅक्स दिल्यास पिकाची प्रतिकारक्षमता वाढते. रासायनिक खत व सोयाबीन बियाणे एकत्र करुन कधीच पेरु नये. पेरणीच्या वेळेस खत खाली व बियाणे वर पडेल याची दक्षता घ्यावी.
पेरणी:
पिकाची योग्य वेळी पेरणी करणे हे उत्पादन वाढीचे बीनखर्चीक व तेवढेच महत्वाचे गुणसुत्र आहे. या पिकाची पेरणी मान्सूनचा चांगला पाऊस झाल्यानंतर २० जून ते १० जुलै पर्यंत तिफनीणे ३ सें. मी. खोल बियाणे ओलीवर पडेल या बेताने करावी. भरघोस उत्पादनासाठी हेक्टरी झाडांची संख्या ४.४ लाख प्रती हेक्टर एवढी असणे आवश्यक आहे. दोन ओळितील व दोन रोपातील अंतर ४५x५ सें. मी. किंवा ३०x८ सें. मी. राहील अश्याप्रकारे पेरणी करावी. हेक्टरी ७५ किलो बियाणे पेरावे. बियाणे ३ सें. मी. अधिक खोल पडल्यास ऊगवण कमी होऊन हेक्टरी रोपांची संख्या अपेक्षीत राहणार नाही. पेरणी रूंद वरंबा सरी पद्धतीने केल्यास उत्पादनात वाढ झाल्याचे संशोधनात आढळून आले आहे. अशा रानबांधणीमुळे कमी पावसात जलसंधारण व जास्तीच्या पर्जन्यमानात पाण्याचा निचरा हॊऊन जमिनीची धुप कमी होण्यास मदत होते.
आंतरमशागत:
सोयाबीन पिकातील प्रभावी तणनियंत्रण योग्य वेळी करणे पिक उत्पादनाच्या द्दष्टीने महत्वाचे आहे. त्याकरीता पेरणीनंतर ३ ते ४ आठवड्यानी एक खुरपणी व एक कोळपणी करावी. मजुरांची कमतरता असल्यास अलाक्लोर (लासो ५० इ. सी.) प्र. हे. १ किलो क्रि. घ. पिक उगविण्यापुर्वी फवारणी केल्यास व्दिदल तणांचा बंदोबस्त होतो. तणाच्या प्रभावी नियंत्रणाकरीता बासालीन ४५ टक्के किंवा ट्रफ्लान ४८ टक्के १ किलो क्रि.घ. हेक्टरी ६०० ते ७०० लिटर पाण्यात मिसळून पेरणीपुर्वी जमिनीवर फवारणी करावी.
संजीवक व खतांची फवारणी:
सोयाबीन पिकापासून अधिक धान्य उत्पादन व आर्थिक मिळकतीकरीता फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत्त १५ पिपिएम जिब्रेलिक अॅसिडची ८.३ ग्राम जिब्रेलिक आम्ल (९० टक्के क्रियाशील घटक) प्रती हेक्टर ५०० लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी. सोयाबीन पीक ५० दिवसाचे झाल्यानंतर पहिली आणि ७० दिवसाचे झाल्यानंतर दुसरी २ टक्के युरियाची (म्हणजेच १०० लिटर पाण्यात २ किलो युरीया) फवारणी केल्यास पिकाची नत्राची गरज भरून निघेल आणि शेंगामध्ये दाणे भरण्यास मदत होईल.
पाणी व्यवस्थापण:
सोयाबीन पिकाचे फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्था पाण्याच्या ताणास संवेदनशील आहेत. या कालावधीत २०-२५ दिवसाची पावसाचा खंड पडल्यास पिकास पाणी देणे आवश्यक आहे.
पिकाची काढणी आणि मळणी:
पिक परीपक्व झाल्यानंतर ८५ ते ९० टक्के पाने देठासहीत जमिनीवर गळुन पड्तात. शेंगाचा रंग पिवळा ते काळसर होऊ लागतो. पावसाचा अंदाज पाहूनच म्हणजे पाऊस येणार नाही याची खात्री करुन काढणी करावी. सोयाबीनचे शक्यतो एकत्र मोठे ढीग किंवा गंजी करुन ठेऊ नयेत. त्यामुळे त्यास बुरशी लागुण बियाण्याची प्रत खराब होते. काढणी केलेले पिक उन्हात पसरुण वाळवावे व नंतरच मळणी करावी. सोयाबीन पिकाची मळणी ट्रक्टरच्या चाकाखाली किंवा मळणी यंत्राव्दारे मळणी यंत्राची गती ४०० ते ४५० फेरे प्रती मिनीट ठेऊन करता येते. मळणी यंत्राव्दारे मळणी करावयाची असल्यास बियाण्यातील आर्द्रता १४ टक्केच असावी.
साठवण:
साठवण करतांना बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १० ते १२ टक्के असावे. पोत्यात साठवण करावयाची असल्यास पोते सरळ जमिनीवर न ठेवता लाकडाच्या फळीवर ठेवावे. एकावर एक पोती साठवतांना सहा पेक्षा जास्त साठवु नये.
लेखक:
श्री. गणेश कंकाळ
८८०५१६४५४३
डॉ. संदीप कामडी
९४२३४२१५६७
Published on: 16 June 2020, 09:27 IST