समशीतोष्ण हवामानास हे पीक चांगला प्रतिसाद देते.स्ट्रॉबेरीच्या उत्तम वाढीसाठी भरपूर सूर्यप्रकाश आणि 10-25 अंश सें. तापमान पोषक ठरते. परदेशातून आयात केलेल्या (कॅलिफोर्निया) जातींना सरासरी 30 अंश ते 37 अंश से. तापमान, 60 ते 70 टक्के हवेतील आर्द्रता आणि भरपूर सूर्यप्रकाश असे हवामान चांगले मानवते.
कशा जमिनीची निवड करावी
स्ट्रॉबेरीच्या उत्तम वाढीसाठी पाण्याचा उत्तम निचरा असणारी हलकी, मध्यम काळी, वालुकामय पोयटा, गाळाची जमीन असावी. जमिनीचा आम्ल-विम्ल निर्देशांक 5.5 ते 6.5 या दरम्यान योग्य असतो. भुसभुशीत – वालुकामय जमिनीत स्ट्रॉबेरीच्या रोपांची मुळे जोमाने वाढतात.
स्ट्रॉबेरीच्या विविध जाती
महाराष्ट्रात प्रामुख्याने सेल्वा, चॅन्ड्लर, स्वीट चार्ली, कॅमारोझा, रागिया, डग्लस, फेस्टिवल, ओसो ग्रॅंडी, विंटर डॉन, केलजंट, पजारो इत्यादी कॅलिफोर्नियन जातींची आयात केली जाते.स्ट्रॉबेरी पिकाच्या विविध जाती दिवस व रात्रीच्या कालावधीस विशेष प्रतिसाद देतात. हा मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता स्ट्रॉबेरीमध्ये शॉर्ट डे जाती व डे न्युट्रल जाती अशा दोन प्रकारच्या जाती आढळतात.शॉर्ट डे जाती या जातींना दिवस लहान व रात्र मोठी असताना फुले येतात. सूर्यप्रकाशाचा कालावधी ठराविक कालावधीपेक्षा (10 तास) जास्त असल्यास या जातींना फुले येत नाहीत.
उदा. डग्लस, चॅंडलर, पजारो, ओसो ग्रॅंडी इ.डे न्युट्रल जाती या जातींना दिवस कितीही लहान किंवा मोठा असला तरी वाढीवर व फुलधारणेवर परिणाम होत नाही. अशा जातींना वर्षभर फुले येतात. उदा. सेल्वा, फर्न, आयर्विन इ. भारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्ली यांनी विकसित केलेली पुसा अर्ली ड्वार्फ ही जात डे न्युट्रल प्रकारची आहे.
पूर्वमशागत
उन्हाळ्यात जमिनीची उभी-आडवी खोलवर नांगरट करून, तव्याच्या कुळवाने ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी.तणांचे व जुन्या पिकांचे अवशेष गोळा करून नष्ट करावेत.हिरवळीच्या खतासाठी धेंचा किंवा तागासारखे पीक जमिनीत घ्यावे.शक्यतो स्ट्रॉबेरी लागवडीच्या अगोदर घेतल्या जाणाऱ्या पिकास शेणखत अथवा कंपोस्ट खत एकरी 8 ते 10 टन दिलेले असावे.
गादीवाफे तयार करणे
स्ट्रॉबेरीची मुळे मातीच्या वरच्या 15 ते 20 सें.मी. पर्यंतच्या थरातच वाढतात. स्ट्रॉबेरीच्या चांगल्या वाढीसाठी मऊ आणि भुसभुशीत गादी वाफे तयार करावेत.
गादी वाफ्यावर स्ट्रॉबेरीची लागवड दोन ओळी, तीन ओळी अथवा चार ओळी पद्धतीनेसुद्धा केली जाते. त्यानुसार योग्य आकाराचे तयार करावेत.
गादी वाफ्यावर स्ट्रॉबेरीची लागवड दोन ओळी, तीन ओळी अथवा चार ओळी पद्धतीनेसुद्धा केली जाते. त्यानुसार योग्य आकाराचे तयार करावेत.
दोन ओळी पद्धतीसाठी – 90 सें.मी. रुंद व 30 ते 45 सें.मी. उंची असलेल्या गादीवाफ्यावर दोन रोपांतील अंतर 30 सें.मी. व दोन ओळीतील अंतर 60 सें.मी. असावे. दोन ओळी पद्धतीत प्रति एकर 22 ते 25 हजार रोपे लागवडीसाठी लागतात.
तीन ओळी पद्धतीसाठी – 120 सें.मी. रुंद व 30 ते 45 सें.मी. उंची गादी वाफे करावेत.चार ओळी पद्धतीनेही लागवड होत असली तरी आंतरमशागत, फळ तोडणी, गादीवाफ्यास प्लॅस्टिक मल्चिंग करणे या मध्ये अडचणी येत असल्याने प्रामुख्याने दोन ओळी पद्धतीने लागवड सोईस्कर ठरते.
रोपांची लागवड
स्ट्रॉबेरीची लागवड उन्हाळा, हिवाळा व पावसाळा या तिन्ही हंगामांत करता येते; परंतु महाराष्ट्रातील ऑक्टोबर ते मार्च या कालावधीतील हवामान स्ट्रॉबेरीच्या उत्पादनासाठी पोषक आहे.पश्चिम घाटातील डोंगराळ प्रदेशात स्ट्रॉबेरीची लागवड पाऊस थांबताच म्हणजे ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यात तर सपाट प्रदेशात जुलै – ऑगस्ट महिन्यात करणे योग्य ठरते.
तयार केलेल्या गादीवाफ्यांवर दोन ओळी पद्धतीने लागवड करण्यासाठी 1 फूट x 1 फूट अंतरावर खड्डे करून त्यात 150 ते 200 ग्रॅम चांगले कुजलेले शेणखत, 5 ग्रॅम मिथाईल पॅराथिऑन पावडर किंवा चिमूटभर फोरेट (10 जी) आणि आवश्यक रासायनिक खतांची मात्रा टाकून ते व्यवस्थित मिसळावे. त्या मिश्रणात मध्यभागी मूठभर माती टाकून त्यात रोप लावावे. प्लॅस्टिक पिशवीतील रोप असल्यास ती पिशवी काढून त्याच्या बुडातील थोडी माती मोकळी करून ते रोप लावावे.रोपाचा सुरवा (कोंब) जमिनीत गाडला जाणार नाही याची काळजी घेऊन बाहेरील मातीने मुळे पूर्णपणे झाकावीत.
फळातील पोषक घटक
१) पाणी – 87.8%,
२) प्रथिने – 0.7%,
३) स्निग्ध पदार्थ – 0.2%,
४) खनिजे – 0.4%,
५) तंतुमय पदार्थ – 1.1%,
६) कर्बदके – 9.8%,
७) फॉस्फरस – 0.08%,
८) लोह – 1.8%,
९) ऊर्जा मूल्य (100 ग्रॅम) – 44 मि. ग्रॅम,
१०) जीवनसत्त्व ब 1-30 मि. ग्रॅम,
११) जीवनसत्त्व क – 52 मि. ग्रॅम.
Published on: 25 March 2022, 03:52 IST