कीटकनाशके पाण्यासोबत एकत्र करून वेगवेगळ्या फवारणी यंत्राद्वारे पिकांना लहान थेंबांमध्ये रूपांतरित करून दिले जाते. सहसा इसी फॉर्मुलेशन, वेटेबल पावडर फॉर्मुलेशन योग्य प्रमाणात पाण्याबरोबर एकत्र केले जातात जे सामान्य कीटकनाशके वाहक आहेत.
स्प्रे व्हॉल्युम विचारात घेण्याचे महत्वाचे घटक:
विशिष्ठ क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या स्प्रे द्रवाची मात्रा ही विविध घटकांवर अवलंबून असते जसे की,स्प्रे प्रकार, कव्हरेज, एकूण लक्ष्य क्षेत्र, स्प्रे थेंबांचा आकार,आणि स्प्रे थेंबांची संख्या. हे उघड आहे की जर फवारणीचे थेंब मोठे असतील तर स्प्रेची मात्रा ही लहान आकाराच्या थेंबासाठी लागणाऱ्या स्प्रे मात्रा पेक्षा जास्त असेल.
फवारणी तंत्रांचे प्रकार
स्प्रे व्हॉल्युम च्या आधारे फवारणीचे तंत्र खालील प्रमाणे वर्गीकृत केले जातात
१ हाय व्हॉल्युम फवारणी : ३००-५०० लीटर /हेकटर
२ लो व्हॉल्युम फवारणी : ५०-१५० लीटर /हेकटर
३ अल्ट्रा लो व्हॉल्युम फवारणी: < ५ लीटर /हेकटर
हाय व्हॉल्युम पेक्षा लो वोल्युम फवारणी जास्त फायदेशीर आहे. जर हाय व्हॉल्युम फवारणी करायची असेल तर वेळ,मजूर,आणि फवारणीसाठी लागणारा खर्च देखील जास्त लागतो, तथापि लो व्हॉल्युम फवारणीमध्ये कीटकनाशकाची फवारणी ही केंद्रित स्वरूपाची असल्यामुळे कमी वेळेत फवारणी होते.
फवारणी यंत्रांचे वर्गीकरण:
शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फवारणी यंत्रे वापरली जातात. या यंत्रांचे वर्गीकरण त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पावर सोर्स नुसार केले जाते. यामध्ये मानव चलित, बैल चलित, ट्रॅक्टर चलित आणि पावर टिलर चलित यंत्रांचा समावेश होतो. एरियल स्प्रेइंग ही एक आधुनिक फवारणी प्रणाली आहे. धुरळणीसाठी प्लंजर डस्टर, रोटरी डस्टर, पावर डस्टर यांसारख्या धुरळणीयंत्राचा वापर केला जातो.
फवारणी संधर्भात घ्यावयाची खबरदारी:
शेतीमध्ये फवारणी हे एक अगत्याचे काम आहे आणि ही फवारणी करत असताना शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे असते कारण कीटकनाशके जर जास्त विषारी असली आणि योग्य ती काळजी घेतली नाही तर फवारणी करणाऱ्या व्यक्तीला बऱ्याच गोष्टीना सामोरे जावे लागू शकते उदा. डोळे जळजळणे, चेहऱ्याची तसेच पूर्ण शरीराची आग होणे, जास्त उन्हामध्ये फवारणी केली तर चक्कर येणे ऊलट्या होणे, डोकेदुखी.फवारणी करत असताना जेवढी काळजी घेणे गरजेचे आहे तेवढीच काळजी फवारणी आगोदर आणि फवारणी नंतर देखील घेणे गरजेचे आहे.
कीटकनाशक फवारणी करताना शेतकऱ्यांनी खालीलप्रमाणे काळजी घ्यावी
१ फवारणी आगोदर घ्यावयाची खबरदारी:
१ गरज असेल तरच कीटकनाशक वापरावे.
२ केवळ शिफारस केलेले कमी विषारी कीटकनाशक वापरावे.
३ निशचित करा की सर्व घटक स्वच्छ आहेत.
४ फवारणी यंत्राची योग्यरीत्या चाचणी करून घ्या.
५ अनुप्रयोगाशी संबंधीत सर्व लोकांना प्रशिक्षण देऊन त्यातील महत्वाच्या शिफारशी देखील सांगाव्यात.
६ फवारणी अगोदर फवारणी यंत्र स्वच्छ धुवून घ्यावे.
फवारणी करत असताना घ्यावयाची खबरदारी:
१ कीटकनाशके योग्य प्रमाणात मिसळली आहेत याची खात्री करा
२ डोळे, तोंड,आणि त्वचेला होणारे दूषितीकरण टाळा
३ जास्त वारा,उच्च तापमान आणि पावसात फवारणी करू नका
४ रसायनांचा अपव्यय टाळण्यासाठी फवारणीची योग्य दिशा निवडावी तसेच नोझल आणि बूम योग्य उंचीवर सेट करावे.
५ योग्य संरक्षणात्मक कपडे वापरा
६ कीटकनाशके मिसळताना किंवा लागू करताना कधीही खाऊ पिऊ नका तसेच धूम्रपान करू नका
७ कीटकनाशके मिसळताना लहान मुले किंवा इतर व्यक्तीना जवळपास येऊ देऊ नका
फावानीनंतर घ्यावयाची खबरदारी
१ फवारणीनंतर उरलेली कीटकनाशके कधीही शेतात सोडू नका.
२ फवारणीनंतर टाकीमध्ये शिल्लक राहिलेली कीटकनाशके रिकामी करून त्याची योग्य विल्लेवाट लावावी.
३ सिंचन कालवे किंवा तलावांमध्ये रासायनिक टॅंक कधीही रिकामी करू नये.
४ कोणत्याही कारणांसाठी रिकाम्या झालेल्या कीटकनाशकांच्या बाटल्या वापरू नयेत.
५ द्रावण तयार करण्यासाठी वापरलेले सर्व साहित्य स्वच्छ धुवून ठेवावे.
६ सर्व कपडे आणि स्वतःला चांगले स्वछ करावे.
७ कीटकनाशकांच्या वापराची योग्य नोंद ठेवा.
८ फवारणी केलेल्या शेतामध्ये जाण्यासाठी इतरांना प्रतिबंधीत करा
९ तणनाशक फवारणी केलेली असेल तर फवारणी यंत्र स्वच्छ धुवून ठेवावे जेणेकरून दुसऱ्या पिकांना अपाय होणार नाही.
फवारणी यंत्रांची निगा आणि देखभाल:
फवारणी यंत्राची क्षमता आणि गुणवत्ता टिकवण्यासाठी त्याची वेळोवेळी योग्य ती देखभाल करणे अत्यंत गरजेचे आहे. यामध्ये खालील काही बाबी लक्षात घ्याव्यात.
१ केरोसीन तेल किंवा भरपूर प्रमाणात पाण्याचा वापर करून ब्रश किंवा सुती कापडाने फवारणी यंत्राचा बाह्यपृष्ठभाग स्वच्छ करावा.
२ घर्षण आणि हालचाल होणाऱ्या भागावर वंगण तेल लावावे.
३ रासायनिक द्रावण टाकीमध्ये टाकताना नेहमी गाळून घ्यावे.
४ गॅस्केट सह झाकण लीकप्रूफ करा.
५ स्टोर हाऊस मध्ये फवारणी यंत्र व्यवस्थित व्यवस्थीत ठेवावेत.
६ डिस्चार्ज पाइप, नोझल्स फवारणी यंत्राला जोडून ठेऊ नये
७ सर्व नोझल्स स्वतंत्र आणि स्वछ ठेवावेत
८ फिरणारे भाग आणि वॉशर आठवड्यातून एकदा तेलातुन काढावेत.
९ आठवड्यातून एकदा उपकरणाच्या सामान्य कामगिरीसाठी आवश्यक असणारी योग्य ती चाचणी करून घ्यावी
१० इंजिन थोड्यावेळ नियमितपणे चालवावे.
लेखक
डॉ.अमोलमिनिनाथ गोरे
कृषि अभियांत्रिकी विभाग
महाराष्ट्रा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी औंगाबाद.
मो.नं ९४०४७६७९१७
Published on: 02 April 2021, 09:08 IST