Agripedia

शेती हा विषय खुप खोल आहे. सध्या परिस्थितीत शेती आर्थिक सामाजिक नैसर्गिक आणि राजकीय बाबींमध्ये पूर्णपणे कोसळलेली आहे. ठराविक वर्गांना महागाई वाटू नये म्हणून शेती कायम तोट्यात ठेवली गेलीय जाते अन जाणार आहे. मग सरकार कोणाचेही असो. शेतकऱ्यांचा राजकीय नेत्यांवर पाहिजे तसा अजिबात प्रेशर नाहीये. राजकीय लोक शेतकऱ्यांना केवळ भावनिक करून अणि काहीतरी बदल करू अशी आश्वासने देऊन दिवसा फसवतात मग ते कोणत्याही पक्षाचे असो किंवा कोणाचंही सरकार असो. असं माझं मत आहे कोणाला नाही पटल्यास त्याला मी काही करू शकत नाही.

Updated on 03 September, 2021 9:34 AM IST

ठराविक वर्गांना महागाई वाटू नये म्हणून शेती कायम तोट्यात ठेवली गेलीय जाते अन जाणार आहे. मग सरकार कोणाचेही असो. शेतकऱ्यांचा राजकीय नेत्यांवर पाहिजे तसा अजिबात प्रेशर नाहीये. राजकीय लोक शेतकऱ्यांना केवळ भावनिक करून अणि काहीतरी बदल करू अशी आश्वासने देऊन दिवसा फसवतात मग ते कोणत्याही पक्षाचे असो किंवा कोणाचंही सरकार असो. असं माझं मत आहे कोणाला नाही पटल्यास त्याला मी काही करू शकत नाही.

शेतीत भांडवली गुंतवणूक खूप जास्त आहे. शेती करण्यासाठी लागणारे संसाधनं चार चार पिढ्या गेल्या तरी शेतकरी पूर्णपणे घेऊ शकला नाही. त्याला कारण असयं की शेतीतून पिकलेल्या मालाचं खर्चवजा जाऊन दाम कधीच भेटलं नाही. त्यामुळे शेतकरी त्या सर्व गोष्टी वेळेवर अवलंबवू शकला नाही. त्यामुळे त्याला अधिक शारीरिक कष्ट करावे लागतात. आणि उत्पादनात वाढही होत नाही. आणि कसतरी करून तो जेंव्हा ही संसाधने घेत जातो तोपर्यंत तंत्रज्ञान बदलत जातं आणी त्यानी घेतलेल्या गोष्टी कालबाह्य होत जातात. सामाजिकरित्या शेती संपलेली आहे.

शेतकऱ्याला जरी वाटत असलं की तो पिकवतो म्हणून जगाला अन्न मिळतं. पण जे लोकं हा शेतमाल खरेदी करतात त्यांना वाटतं की आम्ही तो विकत घेण्यासाठी पैसा देतोय मग यात अन्नदाता म्हणून घेण्यासारखं काय आहे. शेतकरी ते त्याला पैसे मिळावे म्हणून पिकवतो. त्यानं ते पिकवून आमच्यावर कोणत्याही प्रकारचे उपकार वगैरे केलेले नाही. निसर्गानं शेतीचा शेतकऱ्याचा कायमचं गेम केलेला आहे. कधी दोनदोन वर्ष दुष्काळ. प्यायला पाणी नाही. जनावरांच्या चाऱ्याची पंचाईत. तर कधी पीक ऐन जोमात असताना येणारी गारपीट अवकाळी पाऊस चक्री वादळं. यामुळे शेती आणी शेतकरी पूर्णपणे उध्वस्त होतो. शेतीत गुंतवलेला पैसा वाया जातो. काहींना हे सगळं सहन होत नाही ते जीव देतात. काही मनावर दगड ठेवून उगाचं भंकस आशावाद निर्माण करून तग धरून राहतात.यावर उपाय एकचं आहे. कुटुंबातील सर्वच सदस्यांनी शेतीवर अवलंबून राहू नये. ज्या शेतकऱ्यांना दोन मुलं असतील त्याने मजूर मिळत नाही म्हणून दोन्ही मुलांना शेतीत ठेवून दोन्ही मुलांच्या भविष्याची वाट लावू नये. जो शिकण्यासारखा आहे त्याला शिकवावं. केवळ शाळाचं शिकला पाहिजे असं काही नाही. त्याला पोट भरून दोन पैसे गाठी ठेवता येईल अशी एखादी कला शिकवावी. फिटर काम शिकवावं. टेलरकाम शिकवावं. गवंडीकाम शिकवावं. जगात जिथून आपल्याला पैसा मिळवता येईल असं कोणतंही चांगलं काम शिकवावं.

हे नाहीचं जमलं तर कोणाच्या दुकानावर कामाला ठेवावं. कोणाच्या घरी भांडे घासायला ठेवावं पण दोन्ही मुलं शेतीत ठेवू नये. जो एक मुलगा शेतीत ठेवणार आहे त्याला शेतीत होणारे नवीन बारीकसारीक बदल व्यवस्थित समजून सांगावे. शेतीत येणारं नवीन मायक्रो तंत्रज्ञान त्याला माहिती करून द्यावं. उगाचं आपला रेटा कायम ठेवू नये. कमी कालावधीत येणारे पिकं कोणती आहे. त्याची माहिती कोठे मिळेल. त्याचं प्रशिक्षण कोठे मिळेल याची माहिती घ्यायला त्याला शिकवावं. हे बदल हळूहळू घरच्या शेतीत करायला लावावे. काहीतरी करून थोडं का होईना पण शाश्वत उत्पन्न आपल्याला ह्या शेतीतून कसं मिळवता येईल ते बघावं. तरंच ही शेती टिकू शकेल. नैसर्गिक आपत्ती कायमचं येणार आहे. याच्या मागेही येतंच होती. आताही आहे. आणी पुढेही येणार आहे.

पण आपण यातून कसे सर्व्हाईव करू शकू ते बघावं. आपलं दुःख जगाला सांगून आपल्याला केवळ सहानुभूती मिळू शकते पैसा नाही. जगायला पैसा लागतो.  कितीही सरकारं बदलले तरी शेती संबंधिची नीती कोणतंही सरकार बदलणार नाहीये. त्यासाठी आवाज जरूर उठवावा पण त्या सोबत आपल्या शेतीकडे दुर्लक्ष करू नये. पैशाचा आवाज मोठा असतो त्यासाठी पैसा शेतीतून किंवा शेतीबाह्य गोष्टीतून मिळवलाचं पाहिजे.

वरील सर्व गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत. उगाचं कोणाचं सांगावांगी ऐकून लिहिलेलं नाही. त्यामुळे केवळ स्वतःला शेतकरी म्हणवून बळीराजा म्हणवून अन्नदाता म्हणवून उर बडवण्यात काही अर्थ नाहीये असं माझंतरी मत झालंय. कोणाचा अनुभव वेगळाही असू शकतो. ऊगाच गैरसमज करून घेऊ नये.

 

मनोहर पाटील, जळगाव

English Summary: speak on agriculture field
Published on: 01 September 2021, 08:07 IST