वास्तविकता बियाणे उपलब्धता उत्पादकता आणि अफवा तसेच बियाणे व्यापार महत्वाच्या गोष्टी सोयाबीन पीक हे अतिशय महत्वाचे व नगदी पीक म्हणून महाराष्ट्रात घेतले जात आहे, त्यामुळे शेतकरी जागरूक होवून नवीन तंत्रज्ञान तसेच वाण यांचा वापर करून आपले उत्पादवाढीसाठी प्रयत्न करत आहेत, ही एक शेतीसाठी अतिशय चांगली गोष्ट आहे.गेली १५-२० वर्षे महाराष्ट्र तसेच देशात सोयाबीन पिकाचे क्षेत्र वाढत आहे, आणि अगदी मागील २-३ वर्षे सोडले तर, प्रामुख्याने JS-३३५ वाणाचे क्षेत्र बघितले तर ९० टक्के व त्यापेक्षा जास्त होते, हा एकच वाण मोठ्या प्रमाणावर लागवड केल्या जात होता.सोयाबीन पीक संशोधन संस्था तसेच कृषी विद्यापीठ, ( राहुरी, अकोला, परभणी ) यांनी मागील ७-८ वर्षात अनेक जास्त उत्पादन देणारे वाण शोधले व त्यानंतर हळूहळू नवीन वाण शेतकरी लागवड करू लागले, प्रामुख्याने राहुरी कृषी विद्यापीठाचे सोयाबीन ब्रीडर डॉ मिलिंद देशमुख सर, यांचे फुले संगम हे वाण क्रांतिकारी ठरले, त्यानंतर फुले किमया, तसेच PKV अंबा, MAUS ६१२ हे वाण सुध्दा शेतकरी पसंतीस आले व गेल्या २ वर्षापासून शेतकरी नवीन वाण पेरू लागले आहेत व उत्पादनात वाढ सुध्दा झाली आहे, परंतु हे सर्व होत असताना यातून काही वेगळ्या गोष्टी सुध्दा घडू लागल्या आहेत,
ते म्हणजे बियाणे व्यापार ( म्हणजे जास्त उत्पादन देणारे वाण असा प्रचार करून महाग बियाणे विकणे ).आपला महत्वाचा मुद्दा आहे KDS - ९९२ हे वाण सद्या खूप चर्चेत आहे, कोणीही त्याचे बीयाणे पाहिजेत म्हणतो, कितीही भाव असेल तरी खरेदी करू असे बोलतात, काही लोकांनी तर ३००-४०० -६०० रुपये किलो प्रमाणे बियाणे विक्री केली, असे माझ्या निदर्शनास आले आहे, (त्यामुळे याठिकाणी मी हा लेख लिहित आहे) परंतू ते लोक देत असलेले बियाणे हे खरच KDS -९९२ चे आहे का, किंवा त्यांचेकडे ते बियाणे कसे आले याची शहानिशा केल्याशिवाय शेतकरी मित्रांनी ते बियाणे खरेदी करणे कितिपत योग्य आहे.मुख्य म्हणजे कोणतेही वाण विकसित झाले की त्याला बियाणे साखळी मद्ये यायला वेळ लागतो कमीत कमी ३ वर्षे तरी, आणि कोणतेही वाण विकसित झाल्या नंतर त्याचे Notification झाल्या शिवाय बियाणे साखळी मद्ये येत नाही किंवा आणता येत नाही, त्यामुळे शेतकरी मित्रांनी नवीन वाणाचा बियाण्यासाठी थोडा धीर ठेवणे आवश्यक आहे.मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे या वाणाचा झालेला अपप्रचार # अफवा # डबल उत्पादन देणारे वाण अशा जाहिराती # You Tube वरती जास्त लाईक मिळावे म्हणून केलेला अपप्रचार व अतिशयोक्ती या सर्व गोष्टींचा असा परिणाम होऊन शेतकरी KDS -९९२ च्या मागे लागले आहेत व अक्षशः ५०० रुपये किलो प्रमाणे बियाणे खरेदी करत आहेत ते सुध्दा खोटे / खरे हे माहीत नाही.
मुख्य म्हणजे कोणतेही वाण विकसित होते त्याचे उत्पादन चांगले असतेच किंवा ते रोग प्रतिकारक असते, परंतु असा (डबल उत्पादन देणारे वाण) सांगणे कितीपत योग्य आहे, आणि यात काही वस्तिविकात तरी आहे का, शक्य आहे का डबल उत्पादन मिळणे, ठीक आहे १०-२० टक्के उत्पादन वाढ असेल आणि रोग प्रतिकारक असेल याचा अर्थ संगम आणि किमया यांचे पेक्षा दुप्पट उत्पादन मिळेल असा होत नाही. याठिकाणी आपण अफवांना बळी पडू नये.राहुरी कृषी विद्यापीठाचे फुले संगम, फुले किमया तसेच परभणी चे MAUS-६१२, PKV अंबा हे मागील २-३ वर्षात आलेले वाण आहेत आणि अतिशय चांगले उत्पादन देणारे वाण आहेत, त्यामुळे यांची निवड करा उगाच जास्तीचे पैसे मोजून खात्री नसलेलं बियाणे का खरेदी करायचे, या वर्षी नाहीतर पुढील वर्षी नक्कीच आपल्याला बियाणे मिळेल ना.वाण विकसित झाले नंतर Notification व त्यानंतर सुरवातीला मूलभूत बियाणे त्यानंतर पैदासकार बियाणे हे फक्त विद्यापीठात तयार केले जाते आणि ते सुद्धा काटेकोर पद्धतीने मुख्य ब्रीडर च्या मार्गद्शनाखाली केले जाते त्यांनतर जर वाण notification झालेला असेल तर बियाणे साखळी मद्ये येतो किंवा आणता येतो त्यानंतर विद्यापीठ महाबीज किंवा इतर संस्था यांना पैदास्कार बियाणे देते त्यापासून पायाभूत बियाणे व त्यानंतर प्रमाणित बियाणे तयार होते अशा प्रमाणे शेतकरी वर्गापर्यंत बियाणे येण्यासाठी कमीतकमी ३ वर्ष तरी लागतात, त्यामुळे आपल्या नवीन KDS- ९९२ या वाणाचे notification हे २०२१ ला झाले म्हणजे फक्त एक वर्ष झालेले आहे, त्यामुळे या वर्षी बियाणे मिळणे कसे शक्य आहे, याचा विचार आपण करावा, सर्व गोष्टी व्यवस्थित व प्रमाणीकरनाणेच होत असतात, यात कुठेही शॉर्टकट नाही.राहिला मुद्दा तो वास्तविकतेचा : तर कोणतेही वाण विकसित झाले तरी डबल उत्पादन मिळणे शक्य नाही त्यामुळे हा संभ्रम दूर करा,
उत्पादन हे संगम आणि किमया या वाणांचे सुद्धा अतिशय चांगले त्यामुळे उगाच खात्री नसलेले बियाणे वाजवी दरात खरेदी करून आपली फसवणूक करून घेऊ नका व दुसऱ्यांची सुद्धा करू नका.हा लेख लीहीण्या मागचा उद्देश इतकाच आहे की या वाणाबद्दल असलेले गैरसमज दूर होतील, व शेतकरी मित्रांची फसवणूक होणार नाही ( कारण जे कोणी ते बियाणे विकत त्यांना जर विचारले की काय विशेष गुण आहेत/ किंवा तुम्ही कोठून आणले / शेंगा कशा आहेत/ पाने कसे आहेत, तर त्यांना काहीही सांगता येत नाही व त्यांना त्या बॅग मद्ये कोणते बियाणे पॅक केले ते सुद्धा माहीत नाही ( संगम / किमया ) पण KDS- ९९२ सांगून विकत आहेत, त्यामुळे त्यांना त्यांचे काम करू द्या तुम्ही जागरूक राहा व असे बियाणे खरेदी करू नका.KDS-९९२ ( फुले दुर्वा ) हे वाण राहुरी कृषी विद्यापीठाने २०२०-२१ मद्ये प्रसारित केलेले सोयाबीन चे वाण दक्षिण भारतात ( महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश,तामिळाडू) या राज्यांत लागवडी साठी शिफारशीत आहे, वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या उत्पादन चाचणी मद्ये इतर वाणाच्या तुलनेत १०-१२ % अधिक उत्पादन मिळाले ( हे डबल नाही हे लक्षात घ्या), तसेच १०० ते १०५ दिवसांत परिपक्व होणारे हे वाण आहे. चांगले वाण आहे यात काही शंका नाही परंतु झालेला अपप्रचार व अफवा तसेच YouTube वरील व्हिडिओ यांना बळी न पडता आपण अजून एक वर्ष धीर ठेवणे आवश्यक आहे, आणि इतर फुले किमया आणि फुले संगम तसेच ६१२ हे सुद्धा अतिशय चांगले वाण आहेत त्यामुळे त्यांची निवड करावी.सोयाबीन चे अनेक वाण उपलब्ध आहेत, जमीनीचा प्रकार व कालावधी नुसार वेगवेगळ्या २-३ वाणांची निवड लागवडी साठी करावी, मागील आठवड्यात मी वाण निवड हा लेख टाकला होता त्यानुसार वाण निवड करावी नक्कीच शाश्वत व चांगले उत्पादन मिळेल.शेतकरी हितार्थ लिहिले आहे कुठेही संदर्भ म्हणून वापर करू नये
डॉ अनंत उत्तमराव इंगळे
( Ph.D. Genetics and Plant Breeding MPKV Rahuri)
विदर्भ शेती विकास संस्था चिखली बुलडाणा
Published on: 10 June 2022, 01:04 IST