Agripedia

आज स्वातंत्र्य दिवस. कधी काळी हा देश आजाद होईल

Updated on 16 August, 2022 3:08 PM IST

आज स्वातंत्र्य दिवस.कधी काळी हा देश आजाद होईल,ह्या देशावर आपल्या माणसाचं राज्य येईल अशी स्वप्न येथील जनता बघत असे. परकीय आक्रमणाची जणू ह्या भूमीला सवयच होती. हजारो वर्षात इथल्या जनतेला वाटू लागलं की इथे आपलं राज्य असावं,स्वराज्य.ब्रिटिश राजवटी मध्ये एका घटकाचे सर्वात जास्त शोषण होत होते तो होता शेतकरी. न पेलणारे कर,त्या करांचा जोरावर ऐश्वर्य संपन्न होत चाललेली ब्रिटिश अर्थव्यवस्था

आणि दुसरी भूकबळी ने नेताला शरण जाणारी भारतीय जनता.And the second is the Indian people surrendering to the leader through starvation अन्याय सहन करेल तो शेतकरी कसला. १८७५चा सावकारी विरोधात भीमथडी दिलेला प्रतिकार असो किंवा १८५९ साली बंगाल मधील नीळ आंदोलन किंवा चंपारणचे सत्याग्रह असो. मऊ मातीत काम करून त्याचे मन पाषाणासारखे घट्ट बनते. तो कधीही अन्याय सहन करत नाही. तो नेहमीच लढतो आणि आपला हक्क

मिळवतो. आज त्या वृत्तीला सलाम करून आपण सोयाबीनच्या तिसऱ्या महिन्याचा नियोजनाची माहिती घेऊया.सुंदर जांभळ्या फुलांची जागा आता लांबलचक शेंगांनी घेतली आहे. इथून पुढे झाडाच्या खोडामध्ये साठलेली साखर ही शेंगांकडे पाठवली जाते.एवढे दिवस आपण झाडाचा खोडामध्ये साखर कशी वाढेल ह्यावर भर देत होतो. आता आपण खोडात साठवलेली साखर शेंगांपर्यंत कार्यक्षमरित्या कशी पोहोच करता येईल ह्यावर भर

देणार आहोत. ह्या सर्व प्रक्रियेमध्ये आपण अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा आधार घेणार आहोत. आपण कोणत्याही पध्दतीचे टॉनिक किंवा इतर प्रोडकटचा वापर करणार नाही.कारण झाडाची वाढ ही अन्नद्रव्यांच्या जोरावर होत असते. कोणतेही टॉनिक किंवा प्रॉडक्ट् अन्नद्रव्यांच्या पोषणा शिवाय उत्पादनात वृद्धी आणू शकत नाही.पीक फुलोऱ्या अवस्थेत असताना आपण चिलेटेड सुक्ष्मअन्नद्रव्यांचा

वापर केला जेणेकरून आपल्याला ह्या अवस्थेत सूक्ष्मअन्नद्रव्यांची गरज पूर्ण करता आली. हीच क्रिया जर आपण शेंगा भरण्याचा अवस्थेत केली तर दाण्यांचा आकार आणि त्यामधील तेलाचे प्रमाण ह्यामध्ये आपणास वृद्धी मिळेल. एकरी ४००ग्राम सूक्ष्मअन्नद्रव्यांची फवारणी सोबत ४००ग्राम सिलिकॉन ह्या अन्नद्रव्यांची फवारणी केल्यास झाडाची रोगप्रतिकारक शक्ती सोबत दाणे भरण्याची

क्रिया ही सुधारते.शेंगांमधील दाणे भरण्याची क्रिया ही पालाश ह्या अन्नद्रव्या शिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे आपण एकरी दीड किलो ह्या प्रमाणात ००:००:५०(पोटॅशियम सल्फेट) किंवा म्युरेट ऑफ पोटॅशची फवारणी करू शकतो.आशा आपणास एकूण दोन फवारण्या घेणे अपेक्षित आहे.दुसरी फवारणी आपण अखेरीस घेणार आहोत.ज्यावेळी शिवाराच्या ऐका कोपऱ्यात सोयाबीनची पाने वाळू लागतात त्यावेळी समजावं की झाडाची मुळी आता

सर्वत्र शिथिल झाली आहे. अशा वेळी दाने भरण्यासाठी लागणारे पालाश पिकास उपलब्ध होत नाही. त्यामुळे अशा वेळी एखादी पालाश ह्या अन्नद्रव्यांची एकरी दीड किलो ह्या प्रमाणात फवारणी केल्यास दाणे भरण्यास मदद होते.मागील काही वर्षात दोन रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला जाणवतोय. प्रथम शेंगा पोखरणारी अळी आणि द्वितीय शेंगेवरील करपा. शेंगा पोखरणारी अळीवर नियंत्रण मिळवणे खूप अवघड आहे. कारण कीड ही शेंगेत असते आणि

झाडाचा भोवतीने हिरव्या पानांचे आवरण असल्यामुळे कीटकनाशकाची फवारणी शेंगे पर्यंत पोहचत नाही. ह्यासाठी पेट्रोल पंपाचा साहाय्याने फवारणी करावी,जेणेकरून पंपांद्वारे फवारणी करतेवेळेस हवेचा झोत किटकनाशकाना शेंगांपर्यंत पोहोच करतील.ही फवारणी झाल्यानंतर आपण आपल्या द्वितीय रोगासाठी म्हणजेच शेंगेवरील करपा ह्या रोगासाठीही टेबुकोनाझोल १० % डब्लू.पी.+सल्फर ६५ % डब्लू.जी. २५ ग्रॅम १०

लिटर पाण्यात मिसळून झाडावर फवारणी करावी. ह्या दोन्ही रोगांमुळे आपणास खुप मोठे नुकसान होते. जर शेंगा चांगल्या भरल्या तर शेंगा पोखरणारी कीड आपल्या उत्पन्नावर डल्ला मारते आणि जर शेंगेवर करप्याचा प्रादुर्भाव झाला तर शेंगा पोचट राहतात. त्यामुळे शेवटच्या मासात आपणास डोळ्यात तेल घालून पिकाचे निरीक्षण करणे गरजेचे आहे.

ह्या सर्व गोष्टी पाळल्या नंतर वेळ येते ती सोयाबीन काढणीची. सोयाबीनची कापणी झाल्यावर शेतकरी सोयाबीनचा मोठा ढीग करून सोयाबीन रचून ठेवतात आणि काही दिवसानंतर त्याची मळणी करतात. ह्या पध्दतीमध्ये एक दोष असा आहे की सततच्या पावसामुळे जर ह्या ढिगावर पावसाचे थेंब पडले तर सोयाबीन काळं पडते आणि त्यावर बुरशी लागते. बऱ्याच संशोधकांशी चर्चा केल्या नंतर एक गोष्ट जाणवली की सोयाबीन उभा असेल तर त्यावर कितीही पाऊस पडू दे सोयाबीनचे

दाणे काळे पडत नाहीत. पण जर त्याची कापणी केली आणि पाऊस झाला तर निश्चितच सोयाबीन खराब होते. त्यासाठी त्यांनी एक पर्याय सुचवला की सोयाबीनची कापणी ज्यादिवशी होते त्याच दिवशी त्याची मळणी करून घ्यावी. जेणेकरून आपणास अधिक नुकसान सोसावे लागणार नाही. ह्या पध्दतीने पुढील अडचणींचा आढावा घेत जर आपल्याकडून कृती घडली तर आपणास वेळेला धावपळ करावी लागत नाही.

आज आपण ह्या महान देशाचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत आहोत. गेल्या ७५वर्षात आपण बरीच प्रगती केली पण शेती कडे सरकारच दुर्लक्ष दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. समस्या दिवसेंदिवस वाढत चालले आहेत.एकमेकांनचे हात धरून बाहेर येण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. एकमेकांचे पाय धरण्या ऐवजी आपण एकमेकांचे हात धरू आणि ह्या देशाचा उन्नती मध्ये आपली भागीदारी नोंदवू.

 

विवेक पाटील,सांगली

०९३२५८९३३१९

English Summary: Soybean fifth and sixth fortnight planning, grain filling and postharvest planning
Published on: 16 August 2022, 03:08 IST