श्री.पांडुरंग काळे, श्री. राजेंद्र वावरे, डॉ. रविंद्र सिंग
सोयाबीन भारतातील तेलबिया पिकांपैकी एक मुख्य पीक असून भुईमूग आणि मोहरी नंतर सोयाबीन पिकाचे क्षेत्र आणि उत्पादनाच्या बाबतीत नंबर लागतो. सोयाबीन पिकच्या मुळांवरील गाठींमुळे 60 ते 100 किलो प्रति हेक्टरी नत्र जमिनीमध्ये स्थिरीकरण केले जाते व सोयाबीनच्या पानगळीमुळे आपल्या शेतात सेंद्रिय कर्ब वाढतो. सोयाबीन पिकाचा कालावधी कमी आहे. चांगल्या पैकी उत्पादन आणि भाव असल्यामुळे सोयाबीन खालील क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात या पिकाखालील क्षेत्र दरवर्षी वाढत असून उत्पादन व उत्पादकतेमध्ये सुद्धा वाढ होत आहे.
जमीन
•मध्यम ते भारी तसेच काळी पोयट्याची जमीन योग्य
•पाण्याचा चांगला निचरा होणारी असावी.
•हलक्या जमिनीत सोयाबीन उत्पादन कमी मिळते.
•पाणी साठवून राहणारे जमिनीत सोयाबीनची उगवणक्षमता चांगली होत नाही.
पूर्वमशागत
•जमीनीची एक खोल नांगरट करून उभ्या आडव्या दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.
पेरणी व लागवडीचे अंतर
•पेरणी खरीपात १५ जून ते १५ जुलै या दरम्यान करावी.
•कमीतकमी 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी यापेक्षा कमी पाऊस पडल्यास पेरणी करू नये.
•पेरणी करताना जमिनीत किमान सहा इंचा पर्यंत ओल असावी.
•१५ जुलै नंतर शक्यतो पेरणी करणे टाळावे.
•भारी जमिनीत पेरणी 45 सें.मी x 5 सें.मी
•मध्यम जमिनीत 30 सें.मी x 10 सें.मी अंतरावर करावी.
•हलक्या जमिनीत सोयाबीनची पेरणी ५ सेंमी खोलीपर्यंत करू शकतो
•परंतु भारी जमिनीमध्ये सोयाबीनची पेरणी ३ सेंमी पर्यंत करावी.
बियाणे
•सोयाबीन स्वपरागसिंचित पीक असल्यामुळे दरवर्षी नवीन बियाणे विकत घेण्याची आवश्यकता नाही ज्या वर्षी प्रमाणित बियाणे विकत घेऊन वापरले जाईल त्यानंतर ते बियाणे आपण तीन वर्षासाठी वापरू शकतो.
•जर घरगुती बियाणे वापरावयाचे असेल तर पेरणी करण्यापूर्वी त्याची उगवण क्षमता करून पहावी जर ७० टक्क्यांपेक्षा जास्त क्षमता असेल तर ते बियाणे म्हणून पेरणीस वापरावे, जर उगवणक्षमता ६० टक्के असल्यास १० टक्के अधिक बियाणे वापरावे.
प्रति एकरी बियाण्याचे प्रमाण
•पेरणीसाठी ३० किलो
•बीबीएफ यंत्राद्वारे २२ किलो
•टोकण पद्धतीसाठी १६ ते १८ किलो
बीजप्रक्रिया (१० किलो बियाण्यासाठी)
•बीजप्रक्रिया करताना सगळ्यात आगोदर बुरशीनाशकाची नंतर कीटकनाशकाची व शेवटी जैविक खताची बीजप्रक्रिया करावी.
•बुरशीनाशक > कीटकनाशक > जैͪवक खते
•बुरशीजन्य रोग: (चारकोल रॉट, कॉलर रॉट व रोपावस्थेतील इतर रोगांपासून संरक्षण)
काबर्बोक्झीन 37.5% + थायरम 37.5% WS - 30 ग्रॅम किवा ५० ग्रॅम ट्रायकोडर्मा
•कीटकनाशकाची बीजप्रͩक्रिय : खोडमाशीसाठी
थायोमेथोक्झाम 30% FS (100 ͧमिली) + गरजेनुसार थोडे पाणी
•जैविक बीजप्रक्रिया: २५० ग्रॅम रायझोबियम + २५० ग्रॅम पीएसबी + २५० ग्रॅम केएसबी
आंतरपीक पद्धती
•आंतरपीक पद्धतीसाठी सोयाबीन अतिशय उत्कृष्ट पिक आहे. सिंचन व्यवस्था उपलब्ध असल्यास ऊस, मका आणि कापूस या पिकांबरोबर ४:२ या गुणोत्तरानुसार सोयाबीन आंतरपीक म्हणून घ्यावे.
•सोयाबीन + तूर ३:१ या प्रमाणात घ्यावे.
आंतरमशागत
•आवश्यकतेनुसार सोयाबीन मध्ये दोन कोळपण्या कराव्यात.
•पहिली कोळपणी पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी तर दुसरी कोळपणी पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी करावी.
•तसेच आवश्यकतेनुसार एक ते दोन हात खुरपणी कराव्या.
•सोयाबीन पीक फुलोरा अवस्थेत असताना अंतर मशागती करू नयेत.
•अपवादात्मक परिस्थितीत पिकाची कायिक वाढ जास्त झाल्यास वाढ रोधकाची फवारणी करावी
पाणी व्यवस्थापन
•सोयाबीन हे खरीप हंगामातील पीक आहे त्यामुळे त्यासाठी जास्त पाण्याची आवश्यकता नाही परंतु सोयाबीनच्या काही संवेदनशील अवस्थेत पावसाने ताण दिल्यास खालील अवस्थेत पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
•पिकाला फांद्या फुटताना (पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी)
•व पीक फुलोऱ्यात असताना (पेरणीनंतर ४५ ते ५० दिवसांनी)
•शेंगा भरण्याच्या अवस्थेत (पेरणीनंतर ६० ते ७० दिवसांनी)
खत व्यवस्थापन
•चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी 12 ते 15 टन वापरावे
•सोयाबीन पीक द्विदलवर्गीय असल्यामुळे संपूर्ण रासायनिक खताची मात्रा पेरणीच्या वेळी द्यावी.
रासायनिक खताची मात्रा प्रती एकरी
•युरिया ४३ किलो + सिंगल सुपर फास्फेट १८७ किलो + म्युरेट ऑफ पोटॅश २९ किलो पेरणीच्या वेळी द्यावे
•खते पेरणीपूर्वी जमिनीत मिसळून घ्यावे अथवा दोन चाड्याच्या पाभरीने खते व बियाणे एकाच वेळी पेरून घ्यावे
•तसेच गंधक१० किलो प्रती एकरी वापरावे त्यामुळे सोयबींन मधील तेलाचे प्रमाण वाढून इतर अन्नद्रव्य उपलब्ध होण्यास मदत होते.
•खरीप हंगामात पाऊसचा खंड पडल्यास १ टक्के नायट्रेटची पहिली फवारणी ३५ व्या दिवशी व २ टक्के पोटॅशियम नायट्रेटची दुसरी फवारणी ५५ व्या दिवशी देण्याची शिफारस करण्यात आलेली आहे.
एकात्मिक कीड व्यवस्थापन
•चिकट सापळे: रस शोषण करणाऱ्या किडीसाठी पिवळे १५ चिकट सापळे व निळे ५ चिकट सापळे प्रति एकरी लावावे
•कामगंध सापळे : तंबाखूवरील पाने खाणारी आळी व घाटे आळीसाठी ४ कामगंध सापळे प्रति एकरी लावावे
•पक्षी थांबे: आळी वर्गीय किडीसाठी २० पक्षी थांबे एकरी लावावे
काढणी
•सोयाबीनच्या शेंगा चा रंग पिवळट तांबूस झाल्यानंतर काढणी करावी.
•किंवा जातीच्या पक्वतेच्या कालावधीनुसार १०० ते ११० दिवसांत काढणी करावी.
•पीक काढणीस उशीर झाल्यास शेंगा फुटण्यास सुरुवात होते.
•सोयबिन पिकाचे उत्पादन २०-२५ क्विंटल प्रति हेक्टरी मिळते.
लेखक - श्री. पांडुरंग काळे (विषय विशेषज्ञ – कृषिविद्या ) मो.नं- ७३५०८४४१०१
श्री. राजेंद्र वावरे (विषय विशेषज्ञ – मृदा शास्त्र ) मो.नं. ९७३०२६७०३८
डॉ. रविंद्र सिंग (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख) मो.नं- ७९०६३१४४२१
श्री सिद्धगिरी कृषि विज्ञान केंद्र, कणेरी कोल्हापूर
Published on: 20 May 2024, 05:10 IST