सोयाबीन शेती मध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे बियाण्याची उगवण. मातीचा भेगांमधून पोपटी कोवळी अंकुरे बाहेर पडताच शेतकरी सुटकेचा निश्वास सोडतात. ससे ह्याच कोवळ्या पोपटी अंकुरांची वाट बघत असतात. अंकुरित झालेल्या बीजाने जमिनी बाहेर डोकं काढताच त्यावर ताव मारतात. सस्यांकडून होणारे नुकसान अतिशय अल्पप्रमानात होते. पण काही ठिकाणी हा प्रकोप खूप मोठ्या प्रमाणावर जाणवतो. त्यासाठी एक चांगला उपाय म्हणजे चविष्ट कोवळ्या अंकुरांना कडू करणे. त्यासाठी आपण करंज,निर्गुडी किंवा निंबोळी अर्काची फवारणी करू शकतो.
दहा लिटर पाण्यामध्ये दोन किलो स्वच्छ केलेला निंबोळी/निर्गुडी किंवा करंजाचा पाला घालावा. त्याला उकळावे. ह्या द्रावणाला उकळी आल्यास त्याचे वस्त्रगाळ करून घ्यावे. हे द्रावण प्रति पंप ५००मिली एवढ्या प्रमाणात घेऊन त्याची फवारणी करावी.फवारणी नंतर ह्या झाडपाल्याचा कडवटपणा कोवळ्या अंकुरांवर येतो त्यामुळे नकळत झाड किटकाशी सामना करू शकतो व ससे ही लांब राहतात.
ज्यावेळेस आपले पीक १० ते २० दिवसांचे होते त्यावेळेस त्यावर रसशोषक किडीचा प्रादुर्भाव होतो. त्यासाठी एखादी निंबोळी अर्काची फवारणी घ्यावी. पहिल्या फवारणी मधून नियंत्रण न मिळाल्यास तंबाखू अर्काची फवारणी घ्यावी. दहा लिटर पाण्यामध्ये एक किलो तंबाखु धस टाकावे. त्यास चांगले उकळावे.
द्रावनास उकळी आल्यास त्याची पिकावर फवारणी करावी. प्रति पंप अर्धा लिटर द्रावण घेऊन त्याची फवारणी करावी. वरील दोन फवारणी पश्चात पिकावर किडीचा प्रादुर्भाव होणे कठीण असते.
ह्याच दरम्यान पिकांना खते देने ही आवश्यक असते. मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी मशागतीच्या वेळेस खते देतात. त्यावेळी खते दिल्यास खताचा प्रत्येक दाणा पिकाला उपलब्ध होइल असे नाही. त्यातील बरीच खते प्रथम तणांमार्फत आपल्या वाढीसाठी वापरले जातात किंवा ती खते सोयाबीन पिकाचा मुळीला उपलब्ध होत नाहीत. खतांचा कार्यक्षम वापर करण्यासाठी आम्ही रासायनिक खतांचा वापर पिकाची उगवण झाल्यानंतर देतो. पीक ज्यावेळेस १०दिवसांचे होते त्यावेळेस ही खते आम्ही दोन ओळीचा मध्ये टाकतो आणि कोळपणी करून घेतो. कोळपणी केल्यामुळे खते मातीआड जातात. पिकाचा मुळीचा कक्षेत असल्यामुळे ह्या खतांचा संपूर्ण वापर होतो. आम्ही एकरी चार पोती सिंगल सुपर फॉस्फेट, एक पोत म्युरेट ऑफ पोटॅश आणि दहा किलो गंधकाची वापर करतो.
ह्या दिवसात काही ठिकाणी सुष्मअन्नद्रव्यांची कमतरता झाडांचा पानावर दिसून येते. ही कमतरता भरून काढण्यासाठी आपण सुष्मन्नअद्रव्यांची फवारणी ही करू शकतो. सुष्मअन्नद्रव्याचा कमतरते कडे आपण दुर्लक्ष करू नये. पिकाला सुष्मअन्नद्रव्यांची गरज खुप अल्पप्रमानात असते. जर ही गरज पूर्ण केल्यास आपल्या उत्पादनात कित्येक क्विंटलचा फरक पडतो. झाडाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. प्रकाशसंश्लेषण क्रिया सुधारते. दाण्यांचे वजन वाढते.
सोयाबीन १०-२०दिवसांचा कालावधीत पोहचताच बऱ्याचशा अडथळ्यांना पिकाने मात केलेली असते. ह्या दिवसात गरज असते ती फक्त त्याचा वाढीला दिशा देण्याची. इथे गफलत झाल्यास आगामी काळात त्याचे मोठे नुकसान सोसावे लागतात.
विवेक पाटील,सांगली
०९३२५८९३३१९
Published on: 03 February 2022, 09:54 IST