यावर्षी सोयाबीन पिकाणे आणि सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी मैदान गाजवले. खाद्य तेलाचे दर, मांस, अंडी, ई. उत्पादनांच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी, सोयाबीन दर कमी करण्यासाठी शासनाने अनेक प्रयत्न केल्याचे दिसते. पहिले रिफाइंड आणि कच्या पाम तेलाच्या आणि मग सर्वच तेलांच्या आयात शुल्कात २-३ वेळा कपात केली. मग साठेबाजी करण्यास प्रतिबंध घालत साठे जाहीर करण्याचे आदेश दिले. पुढे सोयाबीन, सोयातेल, सोयापेंड, कच्या पाम तेलावर वायदे बंदी लावण्यात आली आणि सोयापेंड जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत टाकत त्यावरही साठा मर्यादा लादली गेली. पण एवढे सगळे करूनही शेतकऱ्यांची एकी, टप्या-टप्याने सोयाबीन विक्रीचा निर्णय यामुळे दर बराच काळ ६००० ते ६५०० रु प्रति क्विंटलच्या दरम्यान राहिले आहेत.
मागील वर्षी हंगामात सरासरी ४५०० रु क्विंटल असणारे सोयाबीन, असे काय झाले कि सोयाबीनला सोन्याचे दिवस आलेत? हे तात्पुरते आहे कि दीर्घकाळ सोयाबीनचे महत्व वाढत जाणार आहे? यात काय अडचणी आहेत? आपण काय करायला हवे म्हणजे याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना मिळवता येत राहील याचे विवेचन करण्याचा हा अल्पसा प्रयत्न आज करत आहे.
मागणी का वाढली?
२०५० साली जगाची लोकसंख्या १० अब्ज होण्याची शक्यता आहे आणि यासर्वांची अन्नाची गरज विशेषतः प्रथिनांची गरज भागवण्यासाठी सोयाबीन पिकाचे महत्व वाढत जाणार आहे. खाद्य तेलाची गरज पूर्ण करण्यासाठीसुद्धा सोयाबीन स्वस्त, चांगला पर्याय आहे. इतकेच नव्हे तर जगभरातील अभ्यासकांनी हे सिद्ध केले आहे कि ज्या देशाची परचेसिंग पॉवर (क्रयशक्ती) वाढली त्या देशात मांस खाण्याचे प्रमाण वाढत जाते. दिवसेंदिवस अश्या प्रकारे मांसयुक्त खाद्याची मागणी वाढत जाणार आहे. हे मांस कोंबडीचे असो (चिकन) कि डुकराचे (पोर्क जे विशेषतः चीन, युरोपात मोठ्या प्रमाणात खालले जाते) यांच्यासाठी पशूखाद्य बनते ते मुख्यतः सोयापेंडी पासून. त्यामुळे जितके मांसाहार करणारे वाढतील तितकी सोयाबीनची मागणी वाढत राहील. म्हणजे इथेही सोयाबीन उत्पादकासाठी आनंदाची बातमी आहे.
सोयाबीन प्रथिनांनी समृद्ध आहे (जवळपास ४०%) परंतु त्यात फायटेट्स, टॅनिन, ट्रिप्सिन इनहिबिटर आणि ऑलिगोसॅकराइड्ससह काही अॅंटी न्यूट्रिशनल फॅक्टर असतात, त्यामुळे ते थेट खाता येत नव्हते पण आता ग्रीन व्हेजिटेबल सोयाबीन स्वरूपात नवीन वाण विकसित झाल्या आहेत ज्यामुळे ते थेट तुरीच्या हिरव्या शेंगा खाण्या सारखे सुद्धा वापरता येईल.
यामध्यमातून त्यातील पूर्ण प्रथिने पचवणे शक्य आहे का या बाबत अद्याप काही मत-मतांतरे आहेत मात्र सोयाबीन हिरवे किंवा प्रक्रिया न करता खाता येण्याजोगे होण्यास ही योग्य सुरुवात आहे. त्यामुळे याची मागणी नक्की वाढेल.
शाकाहार करणारे सर्वजण घराबाहेर जेवताना मुख्यतः पनीर खातात पण दुधाच्या पनीर एवजी आता सोया टोफू ची मागणी वाढती आहे, कारण एकतर हे स्वस्त पडते आणि आता त्यातील नव्या वानांमुळे पनीर आणि टोफू मधील अंतर ओळखणे कठीण झाले आहे. तसेच लॅक्टोज अलर्जी असणाऱ्यांसाठी सोया टोफू उपयुक्त आहे.
भारतीय सोयाबीन उत्पादकासाठी आणखी एक चांगली बाब म्हणजे अद्याप भारतात जीएम सोयाबीन लागवडीस परवानगी नाही आणि जगभरातील प्रमुख देश जीएम सोयाबीन पेरणी करतात म्हणजे भारत हा नॉन जीएम सोयाबीन उत्पादक एक प्रमुख देश आहे. जगभरातील जागरूक ग्राहक आता नॉन-जीएम, सेंद्रिय उत्पादने मागणी वाढवत आहेत. याचाच परिणाम म्हणजे अमेरिकेत सेंद्रिय अंडी महागली आहेत. अमेरिकेत कोबड्यांना खायला वापरल्या जाणार्या सेंद्रिय सोया मीलसाठी अमेरिकाही दक्षिण आशियाई राष्ट्रावर ४०% पेक्षा जास्त अवलंबन आहे. या अर्थानेही भारतीय सोयाबीन भाव खात राहण्यास संधी आहे.
जैव इंधनाची (बायो-डिजेल) मागणी दिवसेंदिवस वाढत जात आहे आणि यासाठी सुद्धा सोयाबीनचा वापर वाढत आहे. म्हणजे सोया तेल थेट पेट्रोल/डिजेल प्रमाणे इंधन म्हणून वापरले जात नाही तर बायोडिझेल उत्पादनाची सर्वात सामान्य पद्धत म्हणजे वनस्पती तेल किंवा प्राण्यांच्या चरबीची मिथेनॉल किंवा इथेनॉलसह सोडियम हायड्रॉक्साईडच्या उपस्थितीत प्रक्रिया केली जाते. यातील ट्रान्सस्टेरिफिकेशन रिअॅक्शनमधून मिथाइल किंवा इथाइल ईस्टर (बायोडीझेल) आणि ग्लिसरीनचे ऊप-ऊत्पादन मिळते. अमेरिकेतील शेतकऱ्यांच्या प्रयत्नांमुळे बायोडिझेलसाठी सोयाबीन तेलाचा वापर करण्यास प्रोत्साहन मिळाले त्यामुळे अमेरिकेत सोयाबीन तेल सध्या बायोडिझेलच्या उत्पादनासाठी एक प्रमुख फीडस्टॉक आहे. पुढे तिथे युनायटेड सोयाबीन बोर्ड आणि त्यानंतर राष्ट्रीय बायोडिझेल बोर्डच्या निर्मितीद्वारे यासाठी भरीव कामगिरी सुरू आहे. एकंदरीत सोयाबीन पिकाची भविष्यातील मागणी वाढत जाणार आहे हे ऊघड आहे.
Published on: 18 January 2022, 10:49 IST