शेतकरी जे काही पिकांची लागवड करतात, यातील बऱ्याच पिकांचा उत्पादन कालावधीचा विचार केला तर हा तीन महिन्याच्या पुढेच असतो आणि एवढेच नाही तर बऱ्याच पिकांना उत्पादनखर्च जास्त लागतो. परंतु भाजीपाला वर्गीय पिकांमध्ये बरेच पिके हे कमीत कमी खर्चात जास्त उत्पादन देण्याची क्षमता ठेवतात.
यामध्ये जर आपण काही निवडक पालेभाज्यांची लागवड केली तर नक्कीच उन्हाळ्यामध्ये देखील अगदी कमी खर्चात व कमी कालावधीत चांगला पैसा हातात येणे शक्य आहे. या लेखात आपण अशाच काही महत्त्वाच्या पालेभाज्यांच्या लागवडीविषयी माहिती घेऊ.
कमी खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या पालेभाज्या
1- पालक- पालक लागवड करायची असेल तर तुमच्याकडे मध्यम काळी व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन असेल तर पालक लागवड ही तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. यासाठी तुम्हाला हेक्टरी आठ ते दहा किलो बियाणे लागते.
पालक ची लागवड करताना तीन बाय दोन मीटर आकाराचे सपाट वाफे मध्ये दोन ओळीत 15 सेंटिमीटर चे अंतर ठेवून लागवड करावी. व्यवस्थापन करताना लागवड करण्यापूर्वी शेणखत मिसळून घ्यावे व माती परीक्षणाच्या अहवालानुसार प्रति हेक्टरी 80 किलो नत्र व प्रत्येकी 40 किलो स्फुरद व पालाश त्यांची मात्रा द्यावी. परंतु नत्राची मात्रा देताना दोन समान भागांमध्ये विभागून द्यावी म्हणजे आणि दुसर्या कापणीच्या वेळी द्यावी.
2- कोथिंबीर- कोणत्याही प्रकारचे हवामान असेल तरी कोथिंबीर ची लागवड चांगले उत्पादन देते.मात्र तापमान 36 अंशच्या पुढे नको. मध्यम कसदार व मध्यम खोलीची जमीन लागवडीसाठी योग्य असते. सेंद्रिय खतांचा वापर केला तर कोथिंबिरीची वाढ चांगली होते. प्रति हेक्टरी 60 ते 70 किलो बियाणे लागते.
लागवड करण्यासाठी तीन बाय दोन मीटर आकाराचे सपाट वाफे तयार करून त्यामध्ये दोन ओळीत 15 सेंटिमीटर अंतर ठेवावे व लागवड करावी. खत व्यवस्थापन करताना पेरणीपूर्वी माती परीक्षणानुसार 20 किलो नत्र, 40 किलो स्फुरद व 20 किलो पालाश ची मात्रा द्यावी व बियाण्याची उगवण झाल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसांनी हेक्टरी 40 किलो नत्राची मात्र द्यावी. खोडवा घ्यायचा असेल तर कापणीनंतर हेक्टरी 40 किलो नत्र द्यावे.
3- मेथी- मध्यम काळी व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन योग्य असते. कोथिंबीर लागवड करण्याआधी प्रति हेक्टर दहा टन शेणखत जमिनीत मिसळले तर भरपूर फायदा होतो. प्रति हेक्टर 25 ते 30 किलो बियाणे लागते. लागवड करताना सपाट वाफे तयार करून त्यामध्ये दोन ओळीत 10 सेंटिमीटर अंतर ठेवून लागवड करावी व हलके पाणी द्यावे.
4- अळू- त्यासाठी मध्यम व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. याची लागवड कंदाच्या माध्यमातून केली जाते, म्हणून कंदांची निवड करताना ती निरोगी कंद आहेत हे व्यवस्थित पाहून कंद निवडावेत. हेक्टरी 12 ते 13 हजार कंदांची लागवड करता येते.
खत व्यवस्थापन करताना एकरी 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 80 किलो पालाश द्यावे. परंतु नत्र व पालाश खते देताना ती तीन समान हप्त्यात लागवडीच्या वेळी आणि त्यानंतर दीड महिन्याच्या अंतराने विभागून द्यावीत. लागवड करताना सरी-वरंबा पद्धतीने 90 बाय 30 सेंटीमीटर अंतरावर करावी.
Published on: 16 August 2022, 01:24 IST