Agripedia

शेतकरी बंधूंनो आगामी खरीप हंगामाकरिता प्रमुख पिकासाठी काही महत्त्वाच्या तांत्रिक नियोजनात्मक बाबी सारांश रुपात

Updated on 06 June, 2022 4:58 PM IST

प्रमुख सूत्राच्या रूपात खालील प्रमाणे नमूद केल्या आहेत १)उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण जाणून घेण्यासाठी व त्यानुसार पिकाला खताचा वापर करण्यासाठी, समस्यायुक्त जमिनीची सुधारणा करण्यासाठी, फळझाड संदर्भात संबंधित फळ पिकाकरिता संबंधित जमिनीची योग्यता तपासण्यासाठी योग्य पद्धतीने माती नमुना काढून माती परीक्षण करून घ्या, माती परीक्षणाच्या आधारावरच एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा अंगीकार करून खरीप पिकात अन्नद्रव्याचे (खताचे) व्यवस्थापन करा.२)जमिनीची पूर्वमशागत करताना ३ वर्षातून एकदा खोल नांगरणी करून वखराच्या २ ते ३ पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करून घ्यावी. तसेच पूर्व पिकाचे अवशेष उदाहरणार्थ मागील पिकाची धसकटे पालापाचोळा गोळा करून कुजवून त्याचे खत तयार करावे. तसेच पेरणीपूर्वी संबंधित पिकाच्या शिफारशीप्रमाणे सर्वसाधारणपणे प्रति हेक्टर ५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत टाकून वखराची पाळी देऊन हे शेणखत जमिनीत चांगले मिसळून घ्यावे.३) सोयाबीन सारख्या महत्त्वाच्या खरीप पिकात व इतर पिकत पेरणीपूर्वी बियाण्याची उगवणक्षमता तपासूनच पेरणी करावी. पेरणीपूर्वी सोयाबीन सारख्या बियाण्याची उगवण क्षमता तपासण्यासाठी बियाण्यातील १०० प्रातिनिधिक दाने रॅन्डम पद्धतीने घेऊन ओल्या फडक्यात किंवा गोणपाटाच्या तुकड्यात किंवा माती टाकलेल्या कुंडीत टाकून योग्य ओलावा ठेवून या १०० दानयापैकी किती जोमदार दाण्याची उगवण होते ते पहावे. व त्यावरून बियाण्याची उगवण टक्केवारी काढावी.

सोयाबीनसारख्या पिकात शिफारशीत बियाण्याचा दर पेरणीसाठी ठेवण्यासाठी किमान ७० टक्के उगवणक्षमता असणारे बियाणे पेरणी योग्य ठरते. ६० टक्‍क्‍यांपेक्षा कमी उगवण क्षमता असणारे सोयाबीन बियाणे पेरणी करण्यासाठी टाळावे. मागील हंगामातील घरचे बियाणे व बाजारातील खरेदी केलेले बॅगचे बियाणे दोन्ही संदर्भात योग्य पद्धतीने बियाण्याची उगवण क्षमता तपासून त्यानुसारच शिफारशीत हेक्टरी बीयाण्याचे पेरणीचे प्रमाण ठेवावे, बियाण्यांच्या उगवन क्षमतेवरच शेतातील हेक्‍टरी झाडांची संख्या अवलंबून असते. म्हणजे शेतात योग्य झाडांची संख्या नसेल तर संबंधित पिकात उत्पादनात घट येईल तेव्हा उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा. कारण उगवण क्षमता तपासणी व त्यानुसार बियाण्याचा दर राखणे हा पीक उत्पादनाचा महत्त्वाचा घटक आहे.४)कोरडवाहू शेतीसाठी मूलस्थानी जलसंधारण करणे हा पीक उत्पादन तंत्राचा मूलमंत्र आहे, आगामी खरीप हंगामात मूलस्थानी जलसंधारणाच्या कमी खर्चाच्या उपाययोजना म्हणून उताराला आडवी पेरणी, सलग समपातळी रेषेवर पेरणी, सोयाबीनसारख्या पिकात रुंद सरी वरंबा पद्धतीने पेरणी, सोयाबीन सारख्या पिकात पेरणीनंतर अंदाजे ३० दिवसांनी सोयाबीनच्या ३ ओळींनंतर सरी काढणे, फुले लागण्यापूर्वी सोयाबीन सारख्या पिकात दुसऱ्या डवरणीच्या वेळी डवऱ्याच्या पाशीला दोरी गुंडाळून भर देणे, यासारख्या कमी खर्चाच्या मूलस्थानी जलसंधारणच्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करावा म्हणजे पिकाकरिता जमिनीत पाणी मुरवले जाईल. आणि कोरडवाहू पिकाकरिता ते योग्य अवस्थेत संजीवनी म्हणून कार्य करेल.

शेतकरी बंधूंनो आगामी खरीप हंगामाच्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या नियोजनात्मक बाबी आपण वरिलप्रमाणे पाहिल्या आहेत. आता आपण उर्वरित काही महत्त्वाच्या बाबी पहात आहोत.अ)प्रमुख खरीप पिकात वाण निवडताना आपल्या शेतातील स्थानिक परीसंस्थेचा अभ्यास व विचार करून म्हणजे आपले शेतातील जमिनीचा प्रकार, हवामान, ओलिताची उपलब्धता या व इतर सर्व बाबींचा विचार करून, कृषी विद्यापीठाने संबंधित भागाकरिता शिफारशीत केलेले, पाण्याचा ताण सहन करू शकणारे, कीड व रोगाला कमी बळी पडणारे, आपले परंपरागत वाणापेक्षा अधिक उत्पादन देणारे, अद्यावत वाण संबंधित कृषी विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे संबंधित विषयाच्या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली निवडणे केव्हाही चांगले व हितावह असते. सोयाबीन सारख्या स्वयम् परागीकरण असणाऱ्या पिकात सरळ वानांकरिता प्रथमवर्षी अद्यावत वाहनाचे प्रमाणित बियाणे कमी प्रमाणात आणून, जागी विरजण आणून या सरळ वाणाचे बियाणे आपले स्वतःची शेतावर तयार करून आपल्या शेतातील चांगले अनुभवाच्या आधारावर नंतर अशा वाणाचा पेरा पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात स्वतःच्या चांगल्या अनुभवाच्या आधारावर वाढवू शकता. परंतु सोयाबीन सारख्या पीकाच्या मोठ्या प्रमाणात बाजारातील वानाच्या बॅग्स पहिल्याच वर्षी खरेदी करून मोठ्या प्रमाणात उत्पादन खर्च वाढवू नका व बियाण्या संदर्भात सरळ वाहनांमध्ये स्वतः स्वयंपूर्ण होऊन इतर शेतकऱ्यांना सुद्धा खुले बियाणे आपण सोयाबीन सारख्या पिकात सरळ वा ना संदर्भात पुरवठा करू शकता.काही महत्त्वाच्या खरीप पिकातील महत्त्वाच्या अद्यावत वानांची यादी खालील प्रमाणे संकलित केली आहे, परंतु या वानाच्या संदर्भात या वानातील सर्व गुणवैशिष्ट्ये अभ्यासून संबंधित कृषी विद्यापीठाची शिफारस लक्षात घेऊन संबंधित विद्यापीठाच्या तज्ञाचा सल्ला घेऊनच वाणाची निवड करावी.१) सोयाबीन: जेएस 335 (आपले जुने परंपरागत वाण), जेएस 9305, जेएस 9560, MAUS 158, MAUS 162, AMS -1001 (PDKV Yellow Gold), AMS- MB -5 -18 (सुवर्ण सोया), फुले संगम (KDS-726), पीडीकेव्‍ही अंबा ( एएमएस - 100 -39), MAUS 71, फुले किमया (KDS- 753) इत्यादी.

२) तुर : पीकेव्ही तारा, BSMR 736, BDN 716, विपुला, फुले राजेश्वरी, BDN 708, AKT 8811 इत्यादी.३) मुग :BM 2003-2, पीकेव्ही ग्रीनगोल्ड, BM2002-1, BPMR145, वैभव, पीकेव्ही एकेएम - 4 इत्यादी.४) उडीद :पीडीकेव्‍ही ब्लॅक गोल्ड, पीकेव्ही उडीद 15, TAU-1, TAU -2 इत्यादी.५) खरीप ज्वारी : खरीप ज्वारी पिकात संकरित वानात काही वानाचा उल्लेख करावयाचा झाल्यास CSH-9, CSH -14CSH-16, CSH-17 इत्यादी तर सुधारित वानांमध्ये उल्लेख करावयाचा झाल्यास SPV 669, CSV-23, CSV-27, CSV- 28 PDKV कल्याणी या वानाचा उल्लेख करता येईल ६) कपाशी : कपाशी सारख्या पिकात गुलाबी बोंड अळीच्या प्रतिबंध करता एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा महत्त्वाचा घटक म्हणून बीटी कपाशी घ्यावयाची झाल्यास १५० ते १६० दिवसांत परिपक्व होणाऱ्या कमी कालावधीच्या व कीड रोग प्रतिकारक्षम असणाऱ्या Boll guard 2 BT वानांना प्राधान्य द्यावे वर निर्देशित काही महत्त्वाच्या वाणाची काही महत्त्वाच्या खरी पिकातील यादी वर संकलित केली असली तरीही स्थानिक कृषी विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे संबंधित विषयाच्या तज्ञांचा सल्ला घेऊन वर निर्देशित वाहनातील गुणवैशिष्ट्ये अभ्यासून तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य त्या वाणाची निवड करावी. आपणास सर्वसाधारण काही महत्त्वाच्या वानाची कल्पना यावी म्हणून ती संकलित केली आहे प्रत्यक्ष स्थानिक परीसंस्थेचा अभ्यास करून त्याच्या मार्गदर्शनाखाली योग्य ते वान निवडावे.ब)आगामी खरीप हंगामात पेरणी करताना संबंधित पिकाकरिता संबंधित कृषी विद्यापीठाने पेरणीसाठी शिफारस केलेल्या बियाण्याचा दर, पेरणीसाठीचे २ ओळींतील व २ झाडांतील अंतर, पेरणी करताना राखावयाची बियाण्याची खोली, पेरणीची वेळ इत्यादी बाबत संबंधित कृषी विद्यापीठाच्या शिफारशींचा अभ्यास करून शिफारशी प्रमाणे पेरणी करावी. उदाहरणार्थ कपाशी सारख्या पिकात गुलाबी बोंडअळी संदर्भातील जीवनचक्रात बाधा

टाकण्याकरिता पूर्व मान्सून कपाशीची लागवड टाळा व कपाशीची लागवड १५ जून ते ३० जूनच्या दरम्यान करा असा सल्ला यावर्षी दिलेला आहे.क)आगामी खरीप हंगामात बियाणे खरेदी करताना विशेष काळजी घेऊन बियाण्याचे बॅगवर उत्पादकाचे नाव, संबंधित प्रकारच्या बियाण्याचे बॅगवरील लेबल, वजन किंमत इत्यादी बाबी पाहून पक्के बिल घेऊनच बियाणे खरेदी करावी.शेतकरी बंधूंनो आगामी खरीप हंगामाच्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या नियोजनात्मक बाबी आपण वरिलप्रमाणे पाहिल्या आहेत. आता आपण उर्वरित काही महत्त्वाच्या बाबी पहात आहोत.अ) आगामी खरीप हंगामात महत्त्वाच्या खरीप पिकात कृषी विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे बुरशीनाशके, कीटकनाशके, जैविक बुरशीनाशके, जैविक खते यांची संबंधित पिकातील शिफारशीप्रमाणे बीजप्रक्रिया करणे ही बाब पीक उत्पादन तंत्रात अत्यंत महत्त्वाची बाब असून या बीजप्रक्रियेमुळे संबंधित पिकात कीड व रोगाचा प्रतिबंध, अन्नद्रव्यांची उपलब्धता यासारख्या बाबीचा फायदा मिळून पिकाची उत्पादनात वाढ होते. प्रमुख खरीप पिकात कोणत्या बाबीची बीज प्रक्रिया केली जाऊ शकते ते सारांश रूपाने आपण खालील प्रमाणे पाहू.१) जैविक खताची व जैविक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया :सोयाबीन तूर उडीद मूग, भुईमूग यासारख्या द्विदल धान्याच्या पिकात रायझोबियम व पीएसबी या जिवाणू खताची तर ज्वारी बाजरी मका कपाशी यासारख्या एकदल पिकात अझोटोबॅक्टर व पीएसबी या जिवाणू खताची २५० ग्रॅम प्रत्येक जिवाणू खत प्रति १० किलो बियाणास या प्रमाणात पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करून घ्यावी व हि जिवाणू खते द्रवरूप स्वरूपात उपलब्ध असल्यास संबंधित पिकातील शिफारशीप्रमाणे प्रत्येक जिवाणूखत ८ ते १० मिली प्रति एक किलो बियाण्यास म्हणजेच २५० मिली प्रति ३० किलो बियाण्यास या प्रमाणात बीज प्रक्रिया करून घ्यावी, तुरी सारख्या पिकात ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची १० ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.

२) रासायनिक बुरशीनाशकाची व कीटकनाशकाची बीजप्रक्रिया : सोयाबीन व तूर या पिकात पेरणीपूर्वी Carboxin 37.5 % + Thiaram 37.5% या मिश्र बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. सोयाबीन पिकामध्ये खोड माशीच्या व चक्रभुंगा या किडींच्या प्रतिबंधासाठी Thiamethoxam 30 % F.S. 10 मिली प्रति किलो बियाण्यास या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. कपाशी पिकात Carboxin 1 एक ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करून घ्यावी. ज्वारी सारख्या पिकात इमिडाक्लोप्रिड 70 टक्के 10 मिली किंवा Thiamethoxam 30 % 10 मिली प्रति किलो बियाण्यास याप्रमाणे बीज प्रक्रिया करून घ्यावी.बीज प्रक्रिया करताना रासायनिक निविष्ठा यांची बीजप्रक्रिया प्रथम करावी व नंतर थोडावेळ जाऊ देऊन जैविक निविष्ठा उदाहरणार्थ पीएसबी रायझोबियम ट्रायकोडर्मा याची बीजप्रक्रिया करावी व रासायनिक निविष्ठा बीजप्रक्रियेसाठी वापरले असल्यास जैविक निविष्ठाचे प्रमाण शिफारशीपेक्षा दीडपट अधिक ठेवावे. बीज प्रक्रिया करताना कोणतेही बियाणे ओले गच करू नये बियाणाला व विशेषता सोयाबीनचे बियाण्याला चोळू नये बियाण्याला फार पूर्वी बीज प्रक्रिया करून बियाणे तसेच ठेवू नये व प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत सुकवून ताबडतोब पेरणीसाठी वापरावे.शेतकरी बंधुंनो आगामी खरीप हंगामात सोयाबीन तूर कपाशी उडीद मूग इत्यादी महत्त्वाच्या खरीप पिकात ५ टक्के निंबोळी अर्काचा वापर एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा घटक म्हणून करावयाचा आहे. त्याकरिता लागणाऱ्या आता काही कालावधीत उपलब्ध होणाऱ्या निंबोळ्या गोळा करून वाळवून सुकवून त्याची पावडर तयार करून ठेवा म्हणजे योग्यवेळी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विविध खरीप पिकात या निंबोळी पावडरचा वापर एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा घटक म्हणून कीड व्यवस्थापनासाठी योग्यवेळी प्रभावीपणे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार करणे शक्य होईल.

शेतकरी बंधूंनो आगामी खरीप हंगामाच्या दृष्टकोनातून काही महत्त्वाच्या नियोजनात्मक बाबी आपण वरिलप्रमाणे पाहिल्या आहेत. आता उरलेल्या काही महत्त्वाच्या बाबी पाहणार आहोत.अ)आगामी खरीप हंगामात रासायनिक खताची जुळवाजुळव करून अधिक उत्पादनाकरिता रासायनिक खताचा वापर करण्यासाठी शेतकरी बंधू उत्सुक असतात आणि ते क्रमप्राप्त आहे, परंतु आगामी खरीप हंगामात विविध पिकांना खते देताना एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा अंगीकार करून माती परीक्षणाच्या आधारावर योग्यवेळी योग्य प्रमाणात रासायनिक खताचा वापर संतुलित रित्या केल्यास पिकाची उत्पादकता वाढते व त्याबरोबर जमिनीची सुपीकता सुद्धा टिकून राहते. आणखी सोप्या भाषेत बोलायचे झाल्यास प्रमुख खरीप पिकांना खते देताना माती परीक्षण अहवालाच्या आधारावर शेणखत, कंपोस्ट खत, जैविक खत, सूक्ष्म अन्नद्रव्याचा माती परीक्षणाच्या आधारावर वापर, विद्राव्य किंवा फवारणी युक्त खताचा गरजेनुसार शिफारशीप्रमाणे वापर त्याचबरोबर माती परीक्षणाच्या आधारावर योग्यवेळी योग्य प्रमाणात रासायनिक खताचा वापर अशा पद्धतीनेच प्रमुख खरीप पिकात अन्नद्रव्य व्यवस्थापन करा.ब) आता आपण महत्त्वाच्या खरीप पिकात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी शिफारशीत केलेल्या प्रमुख अन्नद्रव्यांच्या मात्रा व त्या देण्याच्या वेळा याविषयी माहिती घेऊ या. शिफारशीत अन्नद्रव्याच्या मात्रे प्रमाणे योग्य खत निवडून माती परीक्षणाच्या अहवालानुसार अन्नद्रव्यांची अंतिम मात्रा ठरवून तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली खताचे व्यवस्थापन करावे.१) सोयाबीन : शेतकरी बंधूंनो सोयाबीन पिकात ३० किलो नत्र, + ६० किलो स्फुरद, + ३० किलो पालाश प्रति हेक्टर अन्नद्रव्यांची मात्रा पेरणी सोबत देण्याची शिफारस आहे. सोयाबीन पिकास पेरणीपूर्वी हेक्‍टरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत, बियाण्यास पीएसबी व रायझोबियम जिवाणू खताची तर बीजप्रक्रिया तसेच माती परीक्षणाच्या आधारावर कमतरतेनुसार जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर, पेरणीनंतर ५० व ७० दिवसांनी २ टक्के युरियाची फवारणी केल्यास म्हणजे एकिकृत अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा अंगीकार केल्यास पेरणी सोबत व निर्देशीत अन्नद्रव्यांची मात्रा १५ किलो नत्र + ३० किलो स्फुरद + १५ किलो पालाश प्रती हेक्टर या प्रमाणात द्यावी अर्थात या मात्रा देत असताना आपल्याजवळ जर माती परीक्षणाचा अहवाल असेल तर त्या माती परीक्षणाच्या अहवालानुसार संबंधित अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार किंवा जास्त प्रमाणानुसार या अन्नद्रव्यांच्या मात्रा कमी जास्त होतात 

त्या अनुषंगाने खताच्या मात्रा सुद्धा कमी जास्त होतात म्हणून माती परीक्षणाच्या अहवालाच्या अनुषंगाने प्रत्यक्ष तज्ञांचा सल्ला घेऊन योग्य खताच्या रूपात शिफारशीप्रमाणे सोयाबीन पिकास खत व्यवस्थापन करावे. कृपया या ठिकाणी अन्नद्रव्यांच्या मात्रा दिली असून खताच्या मात्रा दिल्या नाही याची नोंद घ्यावी या अन्नद्रव्यांच्या मात्रा वरून योग्य खत निवडून खताच्या मात्रा देता येतात.२) तुर :तुर पिकास पेरताना २५ किलो नत्र + ५० किलो स्फुरद + ३० किलो पालाश व माती परीक्षणाच्या अहवालानुसार कमतरतेनुसार २० किलो गंधक प्रति हेक्टर देण्याची शिफारस करण्यात आली आहे.३) उडीद व मुग : उडीद व मूग या पिकासाठी २० किलो नत्र, ४० किलो स्फुरद + माती परीक्षणाच्या आधारावर २० किलो पालाश प्रती हेक्टर पेरणी सोबत देण्याची शिफारस आहे ४) कपाशी : बागायती बीटी कपाशीला १२० किलो नत्र + ६० किलो स्फुरद + ६० किलो पालाश प्रति हेक्टर अशी शिफारस आहे यापैकी ४० किलो नत्र + ६० किलो स्फुरद आणि ६० किलो पालाश प्रति हेक्टर कपाशीची लागवड करताना पेरणीच्या वेळेस द्यावयाचा आहे. तर ४० किलो नत्र कपाशी एक महिन्याची झाल्यानंतर आणि उर्वरित ४० किलो नत्र कपाशी २ महिन्याची झाल्यानंतर द्यावयाचा आहे.५) खरीप ज्वारी :खरीप ज्वारी पिकाला ८० किलो नत्र + ४० किलो स्फुरद + ४० किलो पालाश प्रति हेक्टर अशी शिफारस करण्यात आली आहे. या शिफारशीत मात्रापैकी ४० किलो नत्र, संपूर्ण स्फुरद, पालाश पेरणी सोबतच देण्याची शिफारस आहे.

ही मात्रा पेरणी सोबतच पुरवठा करण्यासाठी २०० किलो सुफला 20 : 20 : 0 + ६७ किलो म्यूरेट ऑफ पोटॅश पेरणी सोबत देता येईल. उर्वरित ४० किलो नत्र प्रति हेक्टर २५ ते ३० दिवसांचे झाल्यावर ८७ किलो युरिया प्रति हेक्टर या रुपात देता येईल. वरखत देताना जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करून घ्यावी.शेतकरी बंधूंनो काही प्रमुख पिकासंदर्भात अन्नद्रव्यांच्या शिफारशीत मात्रा वर दिल्या असल्या तरी माती परीक्षण अहवालाच्या आधारावर एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा भाग म्हणून योग्य रासायनिक खत निवडून योग्यवेळी संतुलित रित्या शिफारशीप्रमाणे द्यावे. आवश्यकतेनुसार तज्ञांचा सल्ला घेऊन योग्य खताची निवड करावी.क) सारांश रूपाने सांगावयाचे झाल्यास शास्त्रोक्‍त हवामानाचा अंदाजचा वेध घेऊन आगामी खरीप हंगामासाठी मूलस्थानी जलसंधारण, सोयाबीन सारख्या पिकांमध्ये रुंद सरी वरंबा पद्धतीचा अंगीकार, माती परीक्षणाच्या आधारावर सेंद्रिय जैविक व रासायनिक खतांचा संतुलित वापर, बीजप्रक्रिया, घरचे बियाणे व बियाण्याची उगवणशक्ती तपासून पेरणी, नवीन अद्यावत शिफारशीत वानाचा अंगीकार, योग्य पद्धतीने, योग्यवेळी, योग्य अंतर राखून योग्य पेरणी, खोली राखून केलेली पेरणी, तसेच कीड, रोग व तनाचे व्यवस्थापनासाठी एकात्मिक कीड-रोग व तण व्यवस्थापन तंत्र यांचा अंगीकार करा व उत्पादन खर्चात कपात करून निव्वळ नफा वाढवा.आपणा सर्वांना आगामी खरीप हंगामाच्या खूप खूप शुभेच्छा.

 

राजेश डवरे :तांत्रिक समन्वयक, कृषि महाविद्यालय रिसोड, तथा कीटक शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र करडा, वाशिम

English Summary: Some important planning matters for the upcoming kharif season: a look
Published on: 06 June 2022, 04:42 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)