अवर्षणप्रवण क्षेत्रामध्ये जनावरांच्या चाऱ्याची व पिण्याच्या पाण्याची समस्या अधिकच गंभीर होत आहे; परंतु या परिस्थितीत डगमगून न जाता पर्यायी व्यवस्था शोधून, त्याचा उपयोग करून दुष्काळग्रस्त परिस्थितीवर मात करता येणे शक्य आहे. काही उपलब्ध वनस्पतींचा उपयोग वैरण म्हणून करता येतो.
महाराष्ट्र हा उष्ण कटिबंधात असून, पाऊसमानाप्रमाणे त्यातील वनस्पतींचे खालीलप्रमाणे मुख्य प्रकार आहेत.
1) सदाहरित,
2) नीम-सदाहरित,
3) अधिक पाऊसमानातील पानझडी,
4) काटेरी वनस्पती व वाळवंटी जंगले.
ज्या ठिकाणी वार्षिक पाऊस 250 सें.मी.हून अधिक आहे, अशा भागात म्हणजे पश्चिम घाटाच्या पश्चिमेकडील उतारावर बांबू, वेत, जांभूळ, भेरली, माड, हिरडा व सातवीण यांसारख्या सदाहरित झाडांचे प्राधान्य असते. जेथे पाऊस 150 ते 250 सें.मी.पर्यंत असतो अशा ठिकाणी नीम-सदाहरित व पानझडी वृक्ष वाढतात. पानझडी वृक्षांची पाने हिवाळ्याच्या शेवटास झडतात, याचे कारण कोरड्या ऋतूत जमिनीत पाण्याचे प्रमाण कमी होते व त्यामुळे तग धरून राहण्यासाठी झाडांना ते पाणी जपून वापरावे लागते. तसेच, याच सुमारास पाने धारण करून ठेवण्याची वृक्षांमधील शक्तीही कमी होते.
या सर्वांचा परिणाम म्हणून झाडांची पाने गळतात. काटेरी बांबू, ऐन, असाणा, तून, कोसंब यांसारखे वृक्ष नीम-सदाहरित प्रकारात मोडतात. तर साग, बहावा, साल, शिसव, महुवा, भेंडी, आवळा, पळस, सावर, वारस वगैरे वृक्षांची पानझडी प्रकारात गणना होते. कमी पावसाच्या प्रदेशात लहान-लहान डोंगरांवर खुरटी झुडपे व काटेरी वनस्पती आढळतात. त्यात बाभूळ, खैर, महारूख, चार यांसारख्या वृक्षांचा समावेश होतो.
1) आपटा -
विशेषतः गाई याची पाने खातात. पानझडी जंगलात सर्वसाधारण आढळणारा हा वृक्ष आहे. उंची सहा ते नऊ मी., घेर 0.9 ते 1.2 मी. सर्व प्रकारच्या जमिनीत वाढू शकतो.
हेही वाचा : सकस चाऱ्यासाठी लसूण घासची करा लागवड, पशुंसाठी आहे उपयुक्त
2) आवळा -
याची पाने, फळे गाई व बैल जास्तकरून खातात. मध्यम ते लहान आकाराच्या पानझडी जंगलात आढळणारे हे झाड आहे. उंची नऊ ते 12 मी., घेर 0.9 ते 1.8 मी. याची लागवडही करतात. या फळंत जीवनसत्त्व "क' जास्त प्रमाणात असते.
3) उंबर -
याची पाने व फळे गाई, बैल व शेळ्या विशेषकरून खातात. नेहमी हिरवीगार पाने असलेला, सर्वत्र आढळणारा; तसेच नदी- ओढ्याच्या काठी आढळणारा हा वृक्ष रस्त्याच्या दुतर्फाही लावलेला आढळतो. उंची 15 ते 18 मी., घेर 1.5 ते 2.4 मी. पानांचे रासायनिक पृथक्करण ड्रायमॅटर बेसिस टक्केवारी ः मूलावस्थेतील प्रथिने 12.36 टक्के, स्निग्ध 2.75 टक्के, मूलावस्थेतील तंतू 13.03 टक्के, शत कर्बोदके 71.91 टक्के व राख 12.98 टक्के.
4) उंबर काळा किंवा खारोटी, भोकाडा अथवा बोक्रिया -
याची पाने व डहाळ्या उन्हाळ्यात गाई विशेषकरून खातात. कोकणातील नदीकाठावर तसेच जास्त पाणी किंवा पाऊसमान असणाऱ्या जमिनीत आढळतो. उंची सहा ते नऊ मी., घेर 0.9 ते 1.2 मी.
5) अंजन -
याची हिरवी पाने गाई, बैल व म्हशी आवडीने खातात. कमी पावसाच्या जंगलात सर्वत्र आढळणारा हा पानझडी वृक्ष आहे. तसेच, खानदेशातील सातपुडा पर्वतात नेहमी आढळतो. याची हिरवी पाने वैरण म्हणून अतिशय उपयोगी असतात. उंची 16 ते 18 मी., घेर तीन ते 3.5 मी., पानांच्या रासायनिक पृथक्करणातील ओलावा टक्केवारी - 7.78, प्रथिने 10.79, स्निग्ध 5.21, तंतू 28.21, कर्बोद 38.87 व राख 9.14, तसेच चुना 4.10, स्फुरद 0.24.
6) आंबा -
पूर्ण वाढ झालेली पाने व बाठे गाई विशेषकरून खातात. सर्व ठिकाणी सापडणारा, नेहमी हिरवीगार पाने असणारा हा वृक्ष आहे. उंची 15 ते 20 मी., घेर चार ते पाच मी., पानांचे रासायनिक पृथक्करण ड्रायमॅटर बेसिस टक्केवारी ः मूलावस्थेतील प्रथिने 7.8 टक्के, स्निग्ध 3.8 टक्के, कर्बोदके 54.0 टक्के, तंतू 21.1 टक्के, राख 13.3 टक्के तसेच स्फुरद 0.38 टक्के, चुना 2.93 टक्के. फार काळ जनावरांना पाने खाऊ घातल्यास जनावरे दगावण्याचा संभव असतो, असे गुजरातेत दिसून आले आहे. बाठे जनावरांना तसेच कोंबड्यांना खुराक म्हणून घालतात, त्याचे रासायनिक पृथक्करण दर टक्केवारी ः प्रथिने 9.5 टक्के, स्निग्ध 10.7 टक्के, कर्बोदके 72.80 टक्के, राख 3.66 टक्के, वाळू 0.41 टक्के, शर्करा 1.07 टक्के, टूनिन 0.11 टक्के, मॅग्नेशिअम 0.34 टक्के, लोह 0.93 टक्के, चुना 0.23 टक्के, सोडिअम 0.28 टक्के, पालाश 1.31 टक्के, पाचक प्रथिने 6.1 टक्के, टी.डी.एन. 70.0 टक्के, स्टार्च इक्विव्हालेंट 67.5 पौंड/ 100 पौंड. बाठ्यात एकंदर 15 अमिनो ऍसिड्स असून, त्यात कोणताच विषारी पदार्थ नसतो.
7) कडुनिंब -
याची फळे मुख्यत्वे शेळ्या व मेंढ्या आवडीने खातात. मध्यम ते मोठ्या आकाराचा हा वृक्ष कमी पावसाच्या जंगलात, तसेच रस्त्याच्या दुतर्फा लावलेला आढळतो. उंची 12 ते 15 मी. व घेर 1.8 मी. असतो.
हेही वाचा : फिश अमीनो एसिड बनवण्याची उत्तम व सुलभ पद्धत
8) काटे सावरी -
याची पाने विशेषतः गाई व बैल खातात. सरळ वाढणारे 18 ते 27 मी. उंच व 3.6 ते 4.5 मी. घेराचे हे काटेरी झाड पानझडी अरण्यात तसेच कोकणात आढळते.
9) सुबाभूळ -
पाने, शेंगा, बिया व कोवळ्या फांद्या गाई, बैल, शेळ्या व मेंढ्या खातात. साधारण चार मी. उंचीचे सरळ वाढणारे हे लहान झाड राज्यात सर्वत्र उगवू शकते व आढळून येते. हिरव्या पाल्याचे रासायनिक पृथक्करण केले असता टक्केवारी - 70.4 टक्के ओलावा, 5.3 टक्के प्रथिने, 0.6 टक्के स्निग्ध, 12.2 टक्के कर्बोदके, 9.7 टक्के तंतू व 1.8 टक्के राख, तसेच पाचक प्रथिने 3.9 टक्के, टी.डी.एन. 17.5 टक्के, न्युटीटीव व रेशीओ 3.5 टक्के असून यांच्या पानात प्रथिने व कॅरोटिन असल्यामुळे लसूणघासच्या पानांसोबत कोंबड्यांच्या खुराकात उपयोगात येते. बिया दुभत्या जनावरांसाठी सत्त्वयुक्त असतात.
10) खिरणी -
गाई व म्हशी या वृक्षांची पाने खातात. नेहमी हिरवीगार पाने असलेले 15 ते 18 मी. उंच व 3.6 ते 4.5 मी. घेराचे शोभिवंत झाड कमी पावसाच्या भागात आढळते. रासायनिक पृथक्करण केले असता टक्केवारी - मूल्यावस्थेतील प्रथिने 9.3 टक्के, स्निग्ध 6.2 टक्के, कर्बोदके 53.9 टक्के, तंतू 23.3 टक्के व एकूण राख 7.4 टक्के तसेच अविद्राव्य राख 0.8 टक्के, स्फुरद 0.49 टक्के व चुना दोन टक्के आढळून येतो.
याही व्यतिरिक्त चारोळी, जांभू, देवदारी, टेंभुर्णी, तीवर, तिवस, तुती, देवकापूस, पळस, पांगारा, पिंपळ, बाभूळ, बिबवा, बेहडा, बेल, महारूख, मुरूड शेंग, मेड शिंगी, शिवण, शिसवी, शेवरी, सामान, शिसम, हिंगणबेट, हिवर इत्यादी वनस्पतींचा उपयोग दुष्काळात वैरणीसाठी होऊ शकतो.
:- लेखक :-
डॉ .गणेश उत्तमराव काळुसे
विषय विशेषज्ञ(पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय )
डॉ .सी पी .जायभाये
( कार्यक्रम समन्वयक )
कृषि विज्ञान केंद्र , बुलढाणा
Published on: 04 June 2021, 02:50 IST