Agripedia

शेतकरी बांधवांनो आपली जमीन कशी आहे तिची सुपीकता अथवा उत्पादनक्षमता काय दर्जाची आहे, तिच्यात दोष काय आहेत व त्यात कोणत्या सुधारणा करणे जरूर आहे, हे व अशा तऱ्हेचे प्रश्न अनेक शेतकरी मंडळीच्या मनात थैमान घालीत असतात.

Updated on 25 January, 2023 2:29 PM IST

शेतकरी बांधवांनो आपली जमीन कशी आहे तिची सुपीकता अथवा उत्पादनक्षमता काय दर्जाची आहे, तिच्यात दोष काय आहेत व त्यात कोणत्या सुधारणा करणे जरूर आहे, हे व अशा तऱ्हेचे प्रश्न अनेक शेतकरी मंडळीच्या मनात थैमान घालीत असतात. सुधारलेल्या पद्धतीने शेती करणाऱ्या सर्व पाश्चात्य राष्ट्रात जमिनीची अधून मधून तपासणी करून घेणे ही एक आवश्यक बाब मानली गेली असून त्यासाठी सरकारी व निमसरकारी पातळीवरून मोफत अथवा माफक फी आकारून जमिनीची तपासणी करून योग्य तो तांत्रिक सल्ला देणाऱ्या योजना अतिशय लोकप्रिय, उपयुक्त ठरल्या आहेत.

जमिनीचा कस किती आहे याचा अंदाज घेण्यासाठी, खताचे प्रमाण ठरविण्यासाठी व इतर आवश्यक काळजी घेण्यासाठी व क्षार कमी करणे, जमिनीचा चोपणपणा कमी करणे, निचऱ्याची सोय करणे, चुना वापरणे वगैरे मातीची तपासणी ही एक गुरुकिल्लीच आहे. या किल्लीचा उपयोग करून उत्पादन वाढविणे सहज शक्य आहे. खतांचा वापर केला म्हणजे उत्पादन वाढते ही गोष्ट सामान्य शेतकऱ्यालाही माहीत आहे. परंतु तो वापर केव्हा व कसा करावयाचा हे ठरविण्यासाठी मातीची तपासणी करणे ही एक अत्यंत आवश्यक बाब आहे.

त्यासाठी रासायनिक खते योग्य वेळी, योग्य प्रमाणात, योग्य स्वरुपात व योग्य पद्धतीने देणे सुलभ होतेच पण त्याबरोबर अनावश्यक खतांचा वापर कमी करून खतांच्या खर्चात बचत करणे सोपे होते. डॉक्टरने निश्चित निदान केल्याशिवाय शारीरिक तक्रारीवर औषधाची योजना करून बरे होणे अवघड असते. तद्वत मातीची जरूर ती तपासणी केल्याशिवाय खतांचा वापर करणे म्हणजे आपल्या पैशाचा पुष्कळ वेळा अतिरिक्त व अप्रासंगिक उपयोग केल्यासारखेच आहे. हे तोटे टाळून आपल्या पैशाचा भरपूर व वास्तव फायदा घ्यावयाचा असेल तर मातीचे परीक्षण करणे अगदी इष्ट आहे.

मातीचे परीक्षण करून सल्ला देण्याचा सध्या भारतातील प्रत्येक प्रांतात मातीचे परीक्षण करणाऱ्या अनेक प्रयोगशाळा स्थापन झाल्या, निमसरकारी पातळीवर मातीचे परीक्षण करून घेण्याची सोय आहे. या सोयींचा त्या त्या भागातील शेतकऱ्यांनी फायदा करून घ्यावयास पाहिजे. जमिनीजमिनीत फरक का असतो? एकाच तऱ्हेच्या खनिज तत्त्वापासून निर्माण झालेली जमीन, पाऊस, उष्णतामान,नैसर्गिक वनस्पती व भौगोलिक चढउतार यांतील फरकामुळे सारखी असत नाही, निरनिराळ्या भागांत आढळणाऱ्या एकाच रंगाच्या मातीच्या गुणधर्मातसुद्धा बराच फरक असू शकतो. इतकेच नव्हे तर एकाच शेतातील मातीसुद्धा पुष्कळ वेळा वेगवेगळी असू शकते.

त्यातच फेरपालटीची पिके, पाण्याचा व खताची कमीअधिक वापर या व इतर अन्य कारणांनी मातीच्या रासायनिक व भौतिक गुणधर्मांवर परिणाम होऊन मातीची उत्पादनक्षमता बदलू शकते. शेतजमिनीची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी, ती टिकविण्यासाठी व त्यामुळे शेतीउत्पादन बावल्याचा आनंद उपभोगण्यासांठी आपल्या शेतजमिनीची तपासणी करून घेणे हे एक आवश्यक वैयक्तिक व राष्ट्रीय कर्तव्यच मानले पाहिजे. या तपासणीमुळे सतत पीक घेत राहिल्यामुळे शेतजमिनीतील अपुऱ्या पडणाऱ्या घटकद्रव्यांचा पुरवठा करता येतो, त्यात निर्माण झालेले क्षारता, आम्लता अथवा विम्लता यांसारखे दोष समजून येतात व त्याची तीव्रता कमी करण्यासाठी शास्त्रीय व तांत्रिक उपाययोजना करण्यासाठी जागरूक राहता येते.

निसर्ग हा जिवाणुच्या मदतीने चालवतो नत्राचे चक्र...

एकंदरीत कोणते पीक घ्यावे, एखाद्या विशिष्ट पिकाला आपली जमीन योग्य आहे किंवा नाही, कोणती खते खते वापरावी, त्यांचे प्रमाण काय ठरवावे व पिकांचा समन्वय कसा साधावा यावर आपल्याला बरीच माहिती मिळते. व त्या माहितीच्या आधारावर शेती उत्पादन वाढीच्या प्रयत्नात नव्या जोमाने वाटचाल करता येते. मातीचे नमुने गोळा करताना पाळावयाचे पथ्य मातीचे परीक्षण यासंबंधी विचार करताना एक गोष्ट अगत्याने लक्षात ठेवावयास पाहिजे व ती म्हणजे ज्या जमिनीची तपासणी करायची त्या जमिनीतून पृथ:करणासाठी गोळा केलेले मातीचे नमुने हे त्या जमिनीचे प्रातिनिधिक नमुने असावेत. ते तसे नसल्यास मातीपरीक्षणाचा फायदा मिळत नाही व उत्पादनवाढीच्या आपल्या संकल्पाला खीळ पडते.

क्षेत्र, जमिनीच्या रांगेतील फरक, जमिनीची खोली व जमिनीचा उतार वगैरे सर्व बाबी विचारात घेऊनच मातीचे किती नमुने गोळा करावयास पाहिजेत हे ठरवावे लागते. मातीचे नमुने गोळा करण्याचेही एक विशिष्ट तंत्र आहे. या तंत्रात प्रत्येक सलग व सपाट जमिनीचे चार भाग कल्पून त्या प्रत्येक भागातून एकाच खोलीतील माती निदान २-३ ठिकाणी गोळा करून ती एकत्र करून मिसळली जाते व एकत्र केलेल्या मातीचा ढीग करून त्याचे पुन्हा चार भाग करून त्यातील एकचतुर्थांश भागातील माती सुमारे १ किलोग्रॅम पृथ:करणासाठी प्रयोगशाळेत पाठविली जाते.प्रातिनिधिक स्वरूपाप्रमाणे जमिनीची तपासणी करून घेण्यासाठी मातीचा जो नमुना गोळा करावयाचा तो केव्हा घ्यावा यालाही तंत्र या दृष्टीने तितकेच महत्त्व आहे.

साधारणपणे जमीन तयार झाल्यावर पेरणी करण्यापूर्वीच अथवा उभ्या पिकाची कापणी केल्यावर १-२ आठवड्यांत मातीचे नमुने गोळा करणे उत्तम ठरते. पीक उभे अथवा जोरखत घातल्यावर निदान ८-१० आठवडे तरी मातीचे नमुने गोळा करू नयेत. तसे केल्यास मातीतील अन्नघटकद्रव्यांबाबत चुकीची माहिती मिळून त्यावरून ठरविलेली खतांची योजना फलदायी ठरत नाही. शेतजमिनीची तपासणी करण्यासाठी मातीचे नमुने गोळा करताना ते नमुने शेतातील जनावरे बसण्याची जागा, खत, कचरा साठवण्याची जागा, पाणथळ जमीन, कंपोस्ट खताची जागा, झाडाखालील जागा व शेताचे बांध या ठिकाणाहून गोळा करू नयेत. तसेच कमी-अधिक खोलीतील नमुनेही एकत्र करू नयेत. या दोन सूचनांचे कटाक्षाने पालन न केल्यास मातीपरीक्षणाने जी माहिती मिळते ती चुकीची व दिशाभूल करणारी ठरते व आपलेच 'नुकसान होते. तपासणी कोणत्या घटक द्रव्यासाठी होते.

जमिनीची तपासणी करण्याचे विशिष्ट तंत्र आहे. त्यातील बारीक सारीक बारकावे हे जमिनीची तपासणी कोणत्या हेतूने करावयाची यावर अवलंबून असतात. स्थूलमानाने मातीची चाचणी करताना तिचा आम्लविम्ल निर्देशांक अथवा सामू क्षाराचे प्रमाण व त्याचे स्वरूप, सेंद्रिय कर्बाचे प्रमाण व उपयुक्त स्फुरद व पालाश यांची पातळी (हेक्टरी प्रमाण) वगैरे गोष्टी पाहिल्या जातात. या सर्व माहितीचा साकल्याने विचार करून मगच त्यावरील तांत्रिक सल्ला दिला जातो. विशिष्ट समस्येसाठी करावयाचे पृथ:करण नेहमीच केले जाते असे नाही.

माती परीक्षकाला अनेक साधकबाधक गोष्टींचा विचार करूनच सल्ला द्यावा लागतो. उत्पादनवाढीसाठी जे प्रयत्न करावयाचे ते प्रयत्न शेतातील सर्वच भागात एकाच पद्धतीने सरसकटपणे न करता त्या त्या भागांचे गुणधर्म विचारात घेऊन विभागवार आराखडा तयार करून केल्यास श्रमाचा व पैशाचा योग्य मोबदला मिळण्यास मदत होते.माती परीक्षणात पीक हा केंद्रबिंदू मातीचे परीक्षण करून त्यावर आधारित खतांचे प्रमाण व स्वरूप सुचविताना कोणते पीक घ्यावयाचे आहे हे गृहीत धरून निर्णय घेतला जातो. प्रत्येक पिकाच्या अन्नद्रव्याविषयक गरजा ह्या वेगवेगळ्या असल्याने त्याच जमिनीत एकाऐवजी दुसरे पीक घेताना नत्र, स्फुरद व पालाश यांच्या प्रमाणात थोडाफार बदल करावा लागतो. त्यामुळे एकदा सुचविलेले खतांचे प्रमाण सगळ्याच पिकांना सारखे लागू पडणार नाही.

त्यामुळे उत्पादनात घट येऊ नये म्हणून मातीचे परीक्षण करून ठरविलेले खताचे प्रमाण वापरताना कोणते पीक घ्यावयाचे हे चित्र नेहमी डोळ्यांसमोर ठेवले पाहिजे. म्हणजे त्या सुचनानुसार केलेल्या श्रमाचा पुरेपुर मोबदला मिळतो. दुसरा मुद्दा लक्षात ठेवावयाचा म्हणजे मातीचेपरीक्षण करून सुचविलेल्या सर्व गोष्टी कटाक्षाने पाळणे जरूर आहे. खताचा प्रत्यक्ष परिणाम खत देतेवेळी जमिनीत पुरेसा ओलावा आहे किंवा नाही, व त्यानंतर रोग किडीपासून पिकांचे संरक्षण वेळेवर केले जाते किंवा नाही यावरच अवलंबून राहतो. वा दोन्ही गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्यास परीक्षणांवरून दिलेल्या तांत्रिक सल्ल्यामुळे फायदा काही मिळत नाही व त्यामुळे माती परीक्षण तंत्राबद्दल व त्याच्या उपयोगाबद्दल सामुदायिक गैरसमज होऊ शकतात. निरनिराळ्या अनेक कारणांमुळे दोन निरनिराळ्या शेतांना सारखे खत देऊनही त्यातून निघणारे ज्यादा पीक सारखे असू शकत नाही. अपेक्षा व प्रत्यक्ष अनुभव यांत खूपच तफावत पडते.

काही प्रांतातून सध्या फिरत्या दवाखान्यांप्रमाणे प्रयोगशाळांची माती परीक्षणासाठी प्रयोग सुरू झालेला आहे. या पद्धतीने दिलेला सल्ला हा उपयुक्त खरा पण तो स्थूल स्वरुपाचा असल्याने त्यापासून फार मोठ्या प्रमाणावर फायदा होण्याची सर्वांनीच आशा बाळगली तर काहींना तरी निराशा पदरात पडण्याचा धोका असतो. कारण दिलेला तांत्रिक सल्ला हा कमीत कमी वेळात पृथ:करण करून आलेल्या निष्कर्षावर आधारित असल्याने त्याच्या उपयुक्ततेलाही मर्यादा राहणारच. सर्वसामान्य शेतकऱ्यांनी ही बाजू पूर्णपणे समजावून घेणे आवश्यक आहे.

काळ्या टोमॅटोची लागवड करून देशातील शेतकरी होत आहेत श्रीमंत, जाणून घ्या फायदे...

माती परीक्षणाचा प्रात्यक्षिक अनुभव कृषी विज्ञान केंद्र मधे काम करणाऱ्या मातीचाचणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी माती परीक्षा करून सुचविलेल्या सर्वसामान्य प्रमाणापेक्षा किती प्रमाणात फायदा वाढतो अथवा कमी होतो याचे प्रत्यक्ष पिकांवर केले. या सर्व प्रयोगांत असे आढळून आले की, प्रत्येक मातीचे परीक्षण करून जे खताचे प्रमाण सुचविले व त्याचे आचरण केले त्यावेळी सर्वसाधारण प्रमाण म्हणून वापरलेल्या खतांपेक्षा निश्चितपणे जास्त उत्पादन मिळते. माती परीक्षणामागील भूमिका मातीचे परीक्षण करून सुचविलेल्या गोष्टी करण्याने अन्न उत्पादनात भर पडावयास पाहिजेच परंतु सर्वच ठिकाणी त्याची टक्केवारी सारखीच येईल असे नाही.

जमिनीचे परीक्षण केले जाते. तिची पूर्ण माहिती असल्यास परीक्षणावरून दिलेल्या सल्ल्याचा विशेष उपयोग होऊ शकतो. पीकउत्पादन वाढीच्या प्रयत्नात मातीपरीक्षण हा एक भाग असल्याने त्यापासून मिळणारे फायदे हे इतर गोष्टी किती सुरळीत होतात यावर अवलंबून राहतील.
श्री प्रा.प्रमोद न मेंढे
(कृषी विद्या) कृषी विज्ञान केंद्र घातखेड अमरावती१

माहिती संकलन
मिलिंद जि गोदे

महत्वाच्या बातम्या;
गणेश जाधव यांनी फुलवली अंजीराची बाग, खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून कौतुकाची थाप
HDFC बँक आज विरुधुनगर, तमिळनाडू येथे आपली 'बँक ऑन व्हील्स' व्हॅन करणार सादर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या घरावर छापे, जगभरात उडाली खळबळ..

English Summary: Soil testing is the key to farming
Published on: 25 January 2023, 02:29 IST