यापैकी नत्र, स्फुरद, गंधक, लोह व जस्त यासारख्या अन्नद्रव्यांची कमतरता आढळून आलेली आहे. खतांचा असमतोल वापर यापुढे याचपध्दतीने होत राहिला तर भविष्यात जमिनीचे आरोग्य बिघडणे आणि सुपिकता कमी होवून पिकांची उत्पादकता घटण्याबरोबरच निकृष्ट दर्जाची जमिन पुढील पिढीस हस्तांतरीत करण्याची नामुष्की आपणावर येण्याचा मोठा धोका आहे. यासाठी शेतकर्याने स्वत:च्या जमिनीचे माती परिक्षण करुन घेणे आणि त्याच्या तपासणी अहवालानुसार येणार्या शिफारशी प्रमाणे खतांचा वापर करणे व जामिनीचे व्यवस्थापान करणे आवश्यक आहे. त्यामुळे पिक उत्पादनांत वाढ होऊन खताच्या वापरावर होणारा अवाजवी खर्च कमी होणार आहे.
माती परिक्षणाचे फायदे:
जमिनीतील घटकांचे प्रमाण तसेच जमिनीतील दोष समजतात.
जमिनीच्या प्रकारानुसार पिकांची निवड व नियोजन करता येते.
जमिन सुधारण्यासाठी नियोजनबध्द उपाययोजना करता येतात.
खतांची संतुलीत मात्रा मिळाल्यामुळे पिकांची वाढ चांगली होते.
आवश्यक तेवढेच खत दिल्यामुळे आर्थिक बचत.
जमिनीत संतुलीत खतांचा पुरवठा झाल्यामुळे तिची उत्पादन क्षमता टिकून राहते.
माती परिक्षणामुळे जमिनीची सुपिकता आजमवता येते व जामिनीचे प्रकार निश्चित करता येतात.
मातीचा नमुना घेताना घ्यावयाची काळजी:
मातीचा नमुना घेण्यासाठी वापरात येणारी अवजारे उदा. फावडे, कुदळ, घमेले, खुरपी इ. स्वच्छ असावीत.
मातीचा नमुना पिके काढल्यानंतर परंतू नांगरणी पुर्वी घ्यावा. शक्यतो रब्बी पिकाच्या काढणीनंतर किंवा उन्हाळयात घेतल्यास पृथ:करण करुन परिक्षण अहवाल पेरणीपर्यंत उपलब्ध होतो.
उभ्या पिकांखालील मातीचा नमुना घ्यावयाचा असेल तर दोन ओळीमधील मातीचा नमुना घ्यावा. परंतु पिकास रासायनिक खत दिले असल्यास तीन महिन्याच्या आत संबधित जमिनीतून माती नमुना घेवू नये.
निरनिराळया जमिनीतील नमुना गोळा करताना वेगवेगळया मातीचे नमुने एकत्र मिसळू नयेत.
माती नमुना गोळा करताना किंवा प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविताना रासायनिक खतांच्या रिकाम्या पिशव्यांचा वापर करु नये.
शेतामधील खते साठविण्याची जागा, कचरा टाकण्याची जागा, जनावरे बसण्याची जागा, झाडाखालील जागा, विहिरीजवळ, पाण्याचे पाट व शेताचे बांध इत्यादी जागामधून किंवा जवळून मातीचे नमुने घेवू नयेत.
मातीचा नमुना घेण्याची पध्दत:
मातीचा नमुना हा त्या शेतातील प्रातिनिधीक स्वरुपाचा असणे आवश्यक आहे. एक हेक्टर क्षेत्रातील 15 सेंमी खोलीपर्यंतच्या मातीचे वजन अंदाजे 22,40,000 किलो ग्रॅम असते. यातून काढावा लागणारा 500 ग्रॅम मातीचा नमुना प्रातिनिधीक होण्यासाठी किती काळजीपुर्वक घ्यावा लागेल याची कल्पना येते. कारण यामधून केवळ काही ग्रॅम माती तपासणीसाठी वापरली जाते व तिच्या तपासणीच्या निष्कर्षावर आधारित खताच्या शिफारशी केल्या जातात. म्हणून मातीचा नमुना काळजीपुर्वक काढावा.
मातीचा नमुना काढण्यासाठी शेतात गेल्याांतर प्रथम शेतीची पाहणी करावी व जमिनीच्या प्रकारानुसार वनस्पती/ पिकांचा रंग, वाढ भिन्न भिन्न असते, तसेच जमिनीच्या पृष्ठभागावरचा रंग देखील वेगवेगळा असतो. उतारावरील जमीन भुरकट रंगाची असते, सखल भागातील काळी असते म्हणूनच उतार रंग, पोत, खोली, व्यवस्थापन व पिक पध्दतीनुसार विभागणी करावी आणि प्रत्येक विभागातून स्वतंत्र्यरित्या वेगळा प्रातिनिधीक नमुना घ्यावा.
एक सारख्या जमिनीतून नमुना घेताना काडी कचरा, गवत, पिकांची धसकटे व मुळे काढून टाका.
जिथे पिकाची ओळीत पेरणी केली असेल अशा ठिकाणी दोन ओळीमधून नमुना घ्या.
नुकतेच खते टाकलेल्या जमिनी खोलगट भाग, पाणथळ जागा, झाडाखालील जमिन, बांधाजवळील जागा, शेणखताच्या ढिगार्या जवळील जागा, शेतातील बांधकामा जवळील परिसर कंपोस्ट खताच्या जवळपासची जागा अशा ठिकाणातून मातीचा नमुना घेवू नका.
सपाट पृष्ठभाग असलेल्या जमिनीवर 30×30×30 सेमी आकाराचा चौकोनी खड्डा करुन आतील माती बाहेर काढूा टाका. खड्डयाच्या सर्व बाजुची 2 सेमी जाडीची माती खुरप्याच्या सहाय्याने वरपासून खालपर्यंत खरडून हातावर काढा आणि प्लॅस्टीकच्या बादलीत टाका. अशारितीने एका प्रभागातून 10 नमुने घेऊन त्याच बादलीत टाका.
सर्व माती एका स्वच्छ प्लॅस्टीकच्या कागदावर टाका, चांगली मिसळा, ओली असल्यास सावलीत वाळवा नंतर हया ढिगाचे चार समान भाग करा. समोरासमोरील दोन भाग काढून टाका. उरलेले दोन भाग एकत्र मिसळा व पुन्हा चार भाग करा. हि प्रक्रिया एक किलो ग्रॅम माती शिल्लक राहीपर्यंत करा.
मातीचा ढीग खालील आकृतीप्रमाणे समोरासमोरील 2 व 4 भाग काढून टाका नंतर 1 व 3 भग एकत्र मिसळा.
भरलेली अंदाजे एक किलो माती स्वच्छ पिशवीत भरा. पिशवीत माहिती पत्रक टाका व एक लेबल पिशवीला बांधा
शक्य तितक्या लवकर नमुने प्रयोगशाळेत पाठवा सर्वसाधारणपणे नमुना काढणे व प्रयागशाळेत पाठविणे ह्यात दोन आठवडयापेक्षा अधिक काळ नसावा. अन्यथा माती पृथ:करण बदलण्याची शक्यता असते.
फळबागेसाठी मातीचा नमुना वेगवेगळया थरामधून घ्यावा उदा. खड्डा खोदून पहिल्या एक फुटातील 30 सेमी पर्यंत, मुरुम नसल्यास 30 ते 60 सेमी थरातील दुसरा थर व खोल जमिनीत 60 ते 90 सेमी पर्यंत खोलीतील तिसर्या थरातील मातीचे नमुने स्वतंत्र घ्यावे व प्रयोर्गशाळेत पाठवावे.
जमीन क्षारयुक्त व क्षारयुक्त चोपण असल्यास पृष्ठभागावरील दोन सेमी मधील क्षार बाजूला करुन नंतरच नमुना घ्यावा.
सुक्ष्म अन्नद्रव्ये तपासणी करावयाची असल्यास लाकडी खुंटी अथवा लाकडी औजाराने मातीचा नमुना घ्यावा कोणत्याही परिस्थितीत लोखंडी अथवा अन्य धातुंची औजारे अथवा उपकरणे, माती नमुना घेण्यासाठी वापरु नका. नमुना स्वच्छ पिशवीत भरुन सुक्ष्म अन्नद्रव्यांसाठी माती नमुना घेताना जास्तीत जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. पिशवीवर सुक्ष्म अन्नद्रव्ये तपासणीसाठी नमुना अशी नोंद करावी
Published on: 06 February 2022, 12:04 IST