Agripedia

वाढत्या लोकसंख्येची गरज भागविण्यासाठी पाणी व रासायनिक खतांचा भरमसाट वापर होत आहे.

Updated on 15 April, 2022 5:56 PM IST

वाढत्या लोकसंख्येची गरज भागविण्यासाठी पाणी व रासायनिक खतांचा भरमसाट वापर होत आहे. त्यामुळे जमिनीचे आरोग्य धोक्‍यात येत असून, जमिनीचा पोत बिघडत चालला आहे. शेतकऱ्यांनी सेंद्रिय खत वापराकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

कोरडवाहू शेतीत सेंद्रिय पदार्थाचा पुरेसा वापर होत नाही. सध्या कंपोस्ट खत, शेणखत व हिरवळीची खते फक्त बागायत शेतीतच वापरली जातात. त्यामुळे कोरडवाहू शेतीत ओलाव्याच्या कमतरतेबरोबर अन्न द्रव्याचा तुटवडा भासत आहे. पिकांची उत्पादकता कमी होत आहे. यावर उपाय म्हणून कोरडवाहू पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी टाकाऊ सेंद्रिय पदार्थाचा पुनर्वापर करण्यास प्राधान्य द्यावे. 

सेंद्रिय खताची निर्मिती प्रामुख्याने वनस्पती व प्राणी यांच्या अवशेषापासून होते. यामध्ये सर्वसाधारणपणे साखर कारखान्याची मळी, शेतातील टाकाऊ पीक अवशेष, कुकुटपालनातील टाकाऊ पदार्थ, जनावरांच्या दावणीतील टाकाऊ पदार्थ आणि पालापाचोळा इत्यादी घटकाचा समावेश होतो. हे सेंद्रिय पदार्थांची कुजवून अन्नद्रव्ये विघटित करून शेतात वापरावे लागतात. सेंद्रिय खत वापरण्यासाठी खालील तंत्रज्ञानाचा वापर आवश्‍यक आहे.

पीक अवशेषांचे व्यवस्थापन

शेतातील टाकाऊ पीक अवशेष जमिनीत गाडल्यामुळे जमिनीची उत्पादकता वाढवण्यासाठी उपयोग होतो. पीक अवशेषांमध्ये पुष्कळ प्रमाणात अन्नद्रव्ये असतात. या पीक अवशेषाची जमिनीत गाडणी केल्यामुळे, पिकांनी जमिनीतील घेतलेली तेवढी तरी अन्नद्रव्ये, जमिनीस परत केली जातात. पीक अवशेष जमिनीत गाडण्याच्या तंत्रामुळे शेतातील जागा असणारे पीक

अवशेषाचे रूपांतर उपयुक्त घटकांत केले जाते. त्यामुळे पिकांची अन्नद्रव्याची गरज तर भागते. तसेच उभ्या पिकाच्या दोन्ही ओळीत पसरून आच्छादन म्हणूनसुद्धा चांगला उपयोग होतो. सेंद्रिय अवशेषांचा कार्यक्षमरीत्या वापर करण्याचे तंत्र विकसित झाले आहे. परंतु यासाठी जादा नत्र अन्नद्रव्याची गरज, पीक अवशेषातील कर्ब ः नत्र गुणोत्तराचे प्रमाण कमी करण्यासाठी लागते. कर्ब - नत्राचे गुणोत्तराचे प्रमाण कमी केल्यामुळे शेतात गाडलेल्या पीक अवशेषांचे जैविक विघटन होऊन स्फुरद, पालाश व इतर असणारी अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. 

या तंत्रामध्ये पावसाळा सुरू होण्यापूर्वी जमिनीत सरी वरंबे तयार करावेत. त्यामध्ये सर्वसाधारणपणे हेक्‍टरी 5 टन या प्रमाणात टाकाऊ सेंद्रिय पदार्थाचे 5-6 सें.मी. लांबीचे लहान लहान तुकडे टाकावेत. या सेंद्रिय पदार्थावर 100 किलो शेणखत व अर्धा किलो सेंद्रिय पदार्थाचे विघटन करणाऱ्या जीवाणू संवर्धकाचे 100 लिटर द्रावण करून सरीतील सेंद्रिय पदार्थावर टाकावे. नंतर रिझरच्या साह्याने वरंब्याचे रूपांतर सरीत करावे, असे केल्याने सरीतील पीक अवशेष वरंब्याच्या पोटात गाडले जातात. जमिनीतील पाण्याच्या ओलाव्यावर हे पदार्थ चांगले कुजतात व पुढील हंगामातील रब्बी पिकास उपयोगी पडतात. विभागीय कृषी संशोधन केंद्र, सोलापूर येथे ज्वारीच्या चिपाडांचे विघटन करून त्यांची उपयुक्तता वाढविण्यासाठी सतत 14 वर्षे प्रयोग घेण्यात आला होता.

हिरवळीची खते

भारतामध्ये ताग, धैंचा, चवळी, मूग, उडीद यासारख्या हिरवळीच्या पिकाचा वापर खतासाठी केला जातो. ही हिरवळीची पिके रायझोबियम जीवाणूंच्या मदतीने वातावरणात 78 टक्के असणारे नत्र शोषून घेतात. पिकांच्या मुळावरील गाठीत हा नत्र साठविला जातो. हिरवळीच्या पिकामुळे शेतातील तणाची वाढ कमी होते. हिरवळीच्या खतामुळे जमिनीची कणरचना, पोकळपणा, जलधारणाशक्ती आणि जलवाहकता, घनता, इत्यादी गुणधर्मात सुधारणा होते. 

जमिनीवर पिकांची फेरपालट हंगामी फेरपालट पद्धतीतील द्विदलवर्गीय पिकाचा एक हंगामा करिता समावेश असतो तर दीर्घकाळ फेरपालट पीक पद्धतीत अनेक पिकांची ठराविक क्रमाने दीर्घकाळासाठी फेरपालट केली जाते. या पीक पद्धतीमध्ये पिकांच्या अवशेषामधून जमिनीत नत्र अन्नद्रव्याचा पुरवठा वाढविला जातो. उदा. उडीद, मूग, चवळी, सोयाबीन, तूर, वाटाणा, गवार, मेथी, भुईमूग, हरभरा, ल्युर्सन, घेवडा आणि अल्फा या सारख्या हंगामी पिकाची खरीप हंगामात लागवड केली जाते. या पिकापासून मानवी आहारासाठी आवश्‍यक असणारी प्रथिने धान्य उत्पादनातून मिळतात आणि या द्विदलवर्गीय पिकांचे अवशेष बेवड म्हणून जमिनीत गाडता येतात. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते. द्विदलवर्गीय चारा पिकांची बेवड द्विदलवर्गीय पिकापेक्षा चांगला होतो. पुढील हंगामातील पिकास नत्र अन्नद्रवाचा पुरवठा होतो.

सेंद्रिय पदार्थांचे विघटन व पुनर्वापर

शेतामध्ये किती तरी सेंद्रिय पदार्थ मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. उदा. गवत, पालापाचोळा, पिकाचे अवशेष, जनावरांचे मलमूत्र, पिकाचे धान्य व्यतिरिक्त अवशेष भाग. या सेंद्रिय पदार्थापैकी काही पदार्थ लवकर कुजवून लगेच शेतात वापरता येतात. काहींना मात्र कुजण्यासाठी काही काळ लागतो. अशा सेंद्रिय पदार्थातील अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध करण्यासाठी विघटन होणे गरजेचे असते. 

जिवाणू खताचा वापर

जैविक नत्र स्थिरीकरण तंत्रामध्ये द्विदल वर्गीय पिकाच्या बियाण्यास रायझोबियम जिवाणूंची प्रक्रिया केली जाते. या पद्धतीमध्ये पाकिटातील जिवाणू खत पुरेशा पाण्यामध्ये गूळ टाकून चिकट द्रावण करावे, हे द्रावण बियाण्यास लावावे. साधारणपणे 10 किलो बियाण्याला 250 ग्रॅम जिवाणूंचे खताचे एक पाकीट पुरते. याशिवाय रोपाच्या मुळावर मुळावर जिवाणू खताचे आंतरक्षीकरण करावे. तसेच काही कारणामुळे जिवाणू खत बियाण्याला अगर रोपांना लावणे शक्‍य न झाल्यास जिवाणू खत अंदाजे 20 ते 25 किलो बारीक मातीमध्ये मिसळून हे मिश्रण पिकामध्ये हाताने टाकावे नंतर खुरप्याने जमीन हलवून पिकास पाणी द्यावे.

 

विजय भुतेकर सवणा

9689331988

English Summary: Soil fertility about important information
Published on: 15 April 2022, 05:29 IST