माती परीक्षणामुळे जमिनीच्या भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्मांचा अंदाज येतो.जमिनीच्या रासायनिक गुणधर्मामध्ये सामू, विद्राव्य क्षार, उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश, सेंद्रिय कर्ब, चुनखडीचे प्रमाण इत्यादी माहिती मिळते. जमिनीतील विद्राव्य क्षारांचे प्रमाण व सामू द्वारे जमिन क्षारयुक्त किंवा चोपण झाली आहे का? याची ढोबळमानाने कल्पना करता येते. जमिन क्षार व चोपणयुक्त झाली असल्यास सेंद्रिय खतांचा व भूसुधारकाचा वापर करणे सोयीचे ठरते. जमिनीच्या भौतिक गुणधर्माद्वारे जमिनीचा पोत,चिकण मातीचे प्रमाण,पाणी धरून ठेवण्याची क्षमता, घनता, पाणी मुरण्याचा वेग, निचऱ्याची क्षमता इत्यादी बाबींची माहिती मिळते. तर जैविक गुणधर्मामुळे उपयुक्त तसेच रोगकारक जीवाणूंची चाचणी करता येते.
रासायनिक खतांचा असंतुलित वापर
पाण्याचा अतिरिक्त वापर
सेंद्रिय खतांचा अभाव
पिकांची फेरपालट न करणे
जास्त उत्पादन देणाऱ्या पिकांच्या वाणांचा वाढता वापर
वाढत्या लोकख्येसाठी पुरेशा अन्नधान्याचे उत्पादन करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे. अन्नधान्य हि सकस असले पाहिजे. याबाबतीत स्वावलंबी होणे ही जरुरी आहे. त्यासाठी सर्व बाजूंनी प्रयत्न होत आहेत. शासनही सतर्क झाले आहे. जमिनीत काय कमी आहे हे आजमावत रासायनिक खतांचा आणि पाण्याचा मारा करण्यापूर्वी झालेली चूक परत होऊ नये म्हणून जमिनीची तपासणी करून सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा तपासणीमुळे जमिनीत काय कमी आहे आणि किती कमी आहे हे आजमावता येते आणि ते व तेवढेच देण्याच्या प्रयत्न करता येतो.
शेती व्यवसायामध्ये सुपिक जमिनीस अत्यंत महत्व आहे. म्हणून शेतकऱ्याने आपल्या जमिनी विषयीची सखोल माहिती करून घेणे अत्यावश्यक आहे. आपली जमिन कशी आहे, पाणी कसे आहे त्यानुसार कोणते पीक घेतले पाहिजे. त्या पिकास कोणत्या अन्नद्रव्यांची केंव्हा आणि किती प्रमाणात गरज आहे. जमिनीत किती प्रमाणात अन्नघटक उपलब्ध आहेत. भरपाई कोणत्या खतामधून भागविता येईल याचा विचार करतांना जमिनीचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे. त्याचाही विचार करणे आवश्यक आहे. यशस्वी शेतीचे रहस्य प्रामुख्याने जमिनीतून भरघोस पीक घेणे तसेच जमिनीची उत्पादनक्षमता कायम टिकवून ठेवणे हे आहे. म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतजमिनीची आरोग्यापत्रिका तयार करून घेतली पाहिजे. आपले आरोग्य दीर्घकाळ, निरोगी राहण्यासाठी नियमितपणे डॉक्टरांकडे सर्व चाचण्या करून त्याप्रमाणे शरीर सुदृढ ठेवतो, तसेच नियमित माती पाणी परिक्षण ही नियोजनबद्ध, किफायतशीर शेतीची गुरुकिल्ली आहे.
आधुनिक शेतीमध्ये अधिक भांडवल गुंतवावे लागत असल्याने या ठिकाणी माती व पाणी परीक्षणाचे महत्व अन्यन्य साधारण झालेले आहे. माती परिक्षणावर आधारित खत व्यवस्थापन केल्याने खतांच्या मात्रेत बचत तर होतेच त्याचबरोबर प्रमाणशीर खतांची मात्रा देता येते. त्यामुळे जमिनीची सुपिकता वाढविता येते. तसेच जमिनीचे आरोग्य चिरकाल टिकविण्यासाठी सुध्दा मदत होते. जमिनीचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्मांचे संवर्धन करावे लागते. शाश्वत शेतीमध्ये पिकांचे फायदेशीर उत्पादन घेऊन सेंद्रिय व रासायनिक खतांचा संतुलित वापर करून जमिनीची सुपिकता टिकविली जाते. ही जमिनीची सुपिकता आजमिविण्यासाठी मातीची तपासणी करणे आवश्यक आहे.
खत व्यवस्थापनामध्ये माती परिक्षणास अनन्य साधारण महत्व आहे.पिकाच्या संतुलित अन्नद्रव्यांचा पुरवठा होण्यासाठी नत्र,स्फुरद व पालाश या प्रमुख अन्नद्रव्यांसोबत सुक्ष्म अन्नद्रव्यांची देखील आवश्यकता असते. परंतु गरज असल्यास माती परिक्षणानुसार त्यांचा पुरवठा करता येतो. त्यामुळे पिकाच्या गरजेनुसार रासायनिक खत मात्रा देखील कमी जास्त करता येते त्यामुळे रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर होऊन पिकांचे किफायतशीर उत्पादन घेता येते. त्यामुळे रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर होऊन पिकांचे किफायतशीर उत्पादन घेता येते.तसेच अति रासायनिक खते वापरण्यामुळे होणारा शेतकऱ्यांचा आर्थिक तोटा टाळता येतो व जमिनीचे आरोग्य व्यवस्थित ठेवता येते.
माती परिक्षणावर प्रमुख घटकांमध्ये मातीचा प्रातिनिधिक नमुना घेणे.माती नमुन्यांचे प्रयोगशाळेत निरीक्षण करणे. माती परिक्षणावर अहवाल तयार करणे. पिकांसाठी खतांच्या शिफारशी ठरविणे. क्षार व चोपणयुक्त जमिनी सुधारण्यांचे उपाय सुचविणे इत्यादींचा समावेश होतो. राज्यातील कृषी विभागाच्या मृद सर्वेक्षण व मृद चाचणी प्रयोगशाळा विभागातर्फे मागील वर्षी घेण्यात आलेल्या माती तपासणीनुसार राज्यातील 10 जिल्ह्यात नत्राचे प्रमाण कमी, 24 जिल्ह्यात स्फुरदाचे प्रमाण कमी, सर्व जिल्ह्यात पालाशचे प्रमाण अधिक तर 23 जिल्ह्यात लोहाचे प्रमाण कमी तर 28 जिल्ह्यात जस्ताचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे निदर्शनास आले आहे.
राज्यात कृषी विभागाने माती परीक्षणाची सोय सर्व जिल्ह्यांची मुख्यालयी केलेल आहे.याशिवाय कृषि
विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे, साखर कारखाने रासायनिक खत उत्पादन संस्था व खाजगी संस्थांद्वारे माती परिक्षण प्रयोगशाळा राज्यात सर्वत्र उपलब्ध आहे. जागतिक मृदा दिनाच्या निमित्ताने राज्यातील शेतकरयांना जमिनीच्या आरोग्य पत्रिकेचे वाटप होत आहे. शेतकरी बंधुनो या निमित्ताने मी आपणास आवाहन करतो की हंगामापूर्वी तसेच नवीन फळबागा पिकांचे नियोजन करताना माती परिक्षण करूनच खतांचे व्यवस्थापन करावे व आपली लाख मोलाची जमिन चिरकाल, चिरंजीवी व शाश्वत ठेवावी. अन्नसुरक्षा आणि सुरक्षित अन्न या दोघांमध्ये संतुलन साधण्यासाठी मातीचे आरोग्य जपावे.
डॉ. आदिनाथ ताकटे, प्रभारी अधिकारी, मध्यवर्ती रोपवाटिका (बियाणे विभाग)महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी
Published on: 14 February 2022, 06:08 IST