Mumbai News : राज्यातील टोलनाक्याच्या मुद्द्यावरुन मनसे पुन्हा आक्रमक झाली आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा स्कॅम हा टोलनाक्यामध्ये आहे. याची शहानिशा झाली पाहिजे, टोलनाक्याचे आलेले पैसे कुठे जातात? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. राज ठाकरे यांनी आज (दि.९) पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते टोलनाक्याबाबत बोलत होते.
यावेळी राज ठाकरे म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टोलच्या मुद्द्यावरून खोटं बोलत आहेत. टोल हा काही काश्मीरचा विषय नाही. राज्यातील टोल रद्द केले नाही तर आम्ही टोल नाके जाळून टाकू असा संतप्त इशारा राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे.
पुढील दोन दिवसांत मी टोलनाका प्रश्नाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार आहे. चारचाकी, दुचाकीला टोल नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात. त्याप्रमाणे आमची माणसं प्रत्येक टोलनाक्यावर उभे राहतील आणि फोर व्हिलर, टू व्हिलरला कोणत्याही प्रकारचा टोल लावू दिला जाणार नाही. जर याला कोणी विरोध केला तर हे टोलनाके जाळू, असं राज ठाकरे म्हणाले.
२०१० मध्ये टोकनाका विरोधात आंदोलन सुरु करण्यात आले. टोलनाक्यावर येणार पैसा हा सर्व कॅश स्वरुपातला आहे. त्याच-त्याच कंपन्यांना हे टोल कसे मिळतात? शहरांमधल्या रस्त्यांवर खड्डेच पडणार असतील मग हा पैसा जातो कुठे?, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
Published on: 09 October 2023, 12:43 IST