सिलिकॉनच्या वापरामुळे पानांचा आकार वाढतो. प्रकाश संश्लेषण क्रिया अधिक प्रमाणात होते.सिलिकॉनमुळे वनस्पतींच्या पेशी पृष्ठभागावर पातळ व टणक थर तयार होतो. रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. पिकांमध्ये नत्राचा अतिवापर किंवा मॅंगेनीज, फेरस इत्यादी अन्नद्रव्यांच्या अयोग्य वापरामुळे होणारे दुष्परिणाम कमी करण्यास सिलिकॉनमुळे मदत होते. - योग्य वेळी व योग्य प्रमाणात सिलिकॉन अन्नद्रव्यांचा पुरवठा केल्यास पिकांना दुष्काळी परिस्थितीतही तग धरण्याची शक्ती मिळते. पीक कणखर होऊन लोळत नाही. सिलिकॉनमुळे पांढरीमुळे निर्मितीला चालना मिळते. तसेच फळांमध्ये पाण्याचे संतुलन राखले जाऊन फळाची प्रत सुधारते व टिकवणक्षमता वाढते. फळांना चकाकी येते
वनस्पती सिलिकॉन कसे घेतात?
वनस्पती सिलिकॉन फक्त मोनोसिलिसीक ऍसिड किंवा ऑर्थोसिलिसील ऍसिड (Orthosilicoc acid) (H2 Sio4) या स्वरूपात शोषून घेतात. सिलिकॉन मुख्यत्वेकरून मुळाद्वारे पाण्याबरोबर शोषून घेतले जाते, या क्रियेस मास फ्लोस असे म्हणतात.
वनस्पतीच्या पेशीभित्तिकेमध्ये व मुळांमध्ये सिलिकॉन ऑक्साइड (siO2) च्या रूपात जमा होतो. तसेच सिलिकॉन झाडांच्या अवयवांमध्ये मोनोसिलिसीक ऍसिड, कोलायडल सिलिसीक ऍसिड (Collodial Silicic acid) अथवा ऑरगॅनोसिलिकॉन पदार्थांच्या (Organosilicone compounds) रूपामध्ये साठून राहतात.
सिलिकॉन प्रथम झाडांच्या शेंड्याकडे साठवण्यात येतो. सर्वात जास्त सिलिकॉन पानांच्या वरच्या थरामध्ये (epiderma cells) साठविले जाते. यामुळे झाडांमध्ये नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती तयार होते. अजैविक ताणनिर्मित विकृतीपासून झाडांचे संरक्षण होते.
सिलिकॉनच्या कमतरतेचे परिणाम
पाने, खोड व मुळे यांची वाढ मंदावते. झाडांची पाने व खोड मऊ व जास्त प्रमाणात खाली झुकलेली राहतात. कणखरता कमी असल्याने पीक लोळण्याचे प्रमाण वाढते.झाडांची रोग व कीड प्रतिकारक क्षमता कमी होते.
प्रकाश संश्लेषण क्रियेवर परिणाम.
उत्पादनात घट. भातामध्ये सिलिकॉनची कमतरता असल्यास प्रति चौ. मी. लोंब्यांची संख्या, प्रति लोंबी दाण्यांची संख्या कमी होते.
सिलिकॉन वापराचे फायदे
मॅंगनीज व लोह अधिक्यामुळे होणाऱ्या हानिकारक परिणामांची तीव्रता सिलिकॉनमुळे कमी होते. तसेच ऍल्युमिनियमच्या अधिक्यासाठीही काही प्रमाणात फायदा होतो.
झाडामधील जस्त आणि स्फुरद यांचा कार्यक्षम वापरासाठीही सिलिकॉन वापरामुळे फायदा होतो.
उसामध्ये सिलिकॉन वापरामुळे रोगांचे प्रमाण कमी राहून, उत्पादनामध्ये वाढ होते.
भातामधील आर्सेनिक प्रमाण वाढणे, ही जागतिक समस्या होत आहेत. सिलिकॉनच्या वापराने आर्सेनिक प्रमाण कमी होईल. तसेच नैसर्गिकरीत्या भाताच्या रोग व कीड नियंत्रणास मदत होते.
गहू व वांगी या पिकांमध्ये सिलिकॉन वापराने कीड व रोगाला प्रतिबंध झालेला दिसून आला, तसेच उत्पादनाबरोबरच वांग्याचा तजेलदारपणा वाढल्याचे दिसून आले. असेच निष्कर्ष कांदा, गहू, लसूणघास, टोमॅटो यासारख्या पिकात दिसून आले.
उपलब्धता
जमिनीमधील सिलिकॉन हे वाळूच्या स्वरूपात असल्याने उपलब्धता कमी असते. झाडे सिलिकॉनचा वापर फक्त सिलिसिक ऍसिडच्या (Silicic acid) रूपातच चांगल्याप्रकारे करतात. जमिनीमध्ये सिलिसिक ऍसिडचे प्रमाणे 1 ते 100 मिलिग्रॅम प्रति घन डेसीमीटर एवढे असते, त्यामुळे पिकांना विद्राव्य रूपातील सिलिकॉनयुक्त खताचा पुरवठा करणे गरजेचे आहे.
संकलन - विपुल चौधरी
Published on: 03 February 2022, 10:01 IST