तंत्रज्ञान आणि शेती यांचे एकमेकांशी घनिष्ठ नाते तयार झाले आहे. शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान येऊन पोहोचले असून या तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकरी शेतीत चांगले उत्पादन घेत असून मिळणारा नफा देखील चांगला मिळत आहे.
आता शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर हा वेगवेगळ्या अंगांनी करता येतो. जसे फवारणी साठी सुद्धा वेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान आणि यंत्रांचा वापर होत आहे. शेतांची पूर्वमशागत असो की पिकांची काढणी या सगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या यंत्राच्या माध्यमातून तंत्रज्ञानाने शेती क्षेत्रात प्रवेश केलेला आहे. याला शेती क्षेत्रांमधील सिंचन प्रणाली देखील अपवाद नाही. जर आपण मागच्या काही वर्षांपूर्वीचा विचार केला तर भारतामध्ये पिकांना पाणी हे पाट पद्धतीनेच देण्याची पद्धत होती.
परंतु कालांतराने यामध्ये बदल होत ठिबक आणि तुषार सिंचन यासारख्या तंत्रज्ञानाने प्रवेश केल्यामुळे पिकांना द्यायच्या पाणी व्यवस्थेत आमूलाग्र बदल झाला. आपल्याला माहित आहेच की या तंत्रज्ञानाने पाण्याची बचत तर मोठ्या प्रमाणात होतेच परंतु पाणी देण्यासाठी लागणारे कष्ट देखील वाचतात व पिकांच्या गरजेनुसार पिकांना पाणी देता येते. आता याचा पुढचा टप्पा म्हणून सेंसर आधारित सिंचन प्रणाली सध्या येऊ घातली आहे.
या प्रणालीचा वापर सध्या गोव्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात करत असून गोव्यात असणाऱ्या साळ नदीतील नौता तलावात सध्या ही सिंचन प्रणाली वापरली जात आहे. या तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य म्हणजे याचा वापर करून सेंसर आधारित सिंचन प्रणाली मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे किंवा थेट वेबसाईट द्वारे पाहू आणि नियंत्रित करू शकतात. याचे नियंत्रण साठी शेतकऱ्याला शेतात जाण्याची गरजच नाही. या तंत्रज्ञानाच्या बाबतीत विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाचे म्हणणे आहे की, असे तंत्रज्ञान आहे की ज्या माध्यमातून शेतीला सर्वात महत्त्वाचा स्त्रोत असलेल्या पाण्याचा अपव्यय थांबविण्यास मदत होईल त्यामुळे साहजिकच पाण्याची बचत मोठ्या प्रमाणात होईल. तसेच तुम्ही अगदी घरी बसून म्हणजेच दुरून सिंचनावर लक्ष ठेवू शकतात. शेतकरी आपल्या राहत्या ठिकाणाहून मोबाइल अँप्लिकेशनच्या माध्यमातून शेतातील आद्रता तपासून सिंचनाचे प्रमाणदेखील ठरवू शकतात.
नक्की वाचा:बीएएसएफने लॉन्च केले एक्सपोनस कीटकनाशक,किटकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ठरेल प्रभावी
या तंत्रज्ञानाची कार्यपद्धती
या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना सेंसर द्वारे शेतातील ओलाव्याचे प्रमाण कळते. पिकांना जेवढ्या ओलाव्याचे आवश्यकता असते त्यापेक्षा जर ओलाव्याचे प्रमाण कमी झाले तर सेंसर द्वारे स्वयंचलित मोटर आटोमॅटिक चालू होते. जेव्हा शेताची आणि पिकाची पाण्याची गरज पूर्ण होते तेव्हा आपोआप संचाद्वारे मोटर बंद होते.
Published on: 17 April 2022, 11:08 IST