देशात लिंबूवर्गीय फळपिकांची लागवड वाढली आहे. या फळांच्या निर्यातीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. देशातून दरवर्षी साधरण ८० ते ९० हजार टन लिंबूवर्गीय फळपिकांची निर्यात होते. दरम्यान संत्रा मोसंबीची फळ पिकांचे उत्पादन घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी हाती आली आहे. कारण नागपुरातील केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेने संत्र्यांच्या दोन आणि मोसंबीच्या चार अशा सहा नव्या प्रजाती विकसित केल्या असून या प्रजाती सर्व सीडलेस आहेत.
येत्या चार ते पाच वर्षात विदर्भातील बाजारपेठेत ही फळे दिसणार असून अधिक उत्पन्नाची हमी शेतकऱ्यांना मिळेल,
असा विश्वास संस्थेचे संचालक डॉ. एम.एस. लदानिया यांनी व्यक्त केला. याविषयी बोलताना लदानिया म्हणाले की, मागील पाच ते सहा वर्षांपासून संस्थेच्या फार्मवर या प्रजातींचे रोपण करुन त्यांचे संशोधन सुरू होते. या सहा वर्षाच्या प्रयत्नांना यश आलेल्याचे लदानिया म्हणाले. या विषयीची माहिती त्यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. पुढील वर्षापासून या सहा प्रजातींच्या कलमे शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. या सर्व अर्ली व्हरायटी असून कमी जागेत आणि कमी पाण्यात अधिक उत्पन्न देणाऱ्या आहेत. त्यामुळे या नवीन प्रजाती शेतकऱ्यांसाठी यशदायी आणि अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या ठरतील, असे ते म्हणाले.
दरम्यान ब्लड रेड माल्टा आणि जाफा या दोन प्रजातीसह ब्राझीलवरुन आणलेल्या व येथील वातावरणात विकसित केलेल्या वेस्टीन आणि हमलिन या चार प्रजाती मोसंबीच्या प्रकारातील आहेत. तर पर्ल टँजलो आणि डेझी या संत्र्यांच्या दोन जाती आहेत. या दोन्ही प्रजाती सुएसए येथील असून त्या विदर्भातील वातावरणात विकसित केल्या आहेत. जाफा ही मोसंबी इस्त्रायल प्रजातीची असून विदर्भातील वातावरणात प्रति हेक्टरी २० टन उत्पादन घेता येऊ शकते, असा संशोधन संस्थेचा दावा आहे. तर इटली व स्पेन येथील असलेली ब्लड रेड माल्टाचे उत्पादन प्रति हेक्टरी २५ ते ३० टन घेता येईल, असा विश्वास संस्थेने व्यक्त केला आहे. या दोन्ही प्रजाती रसदार असून ज्यून निर्मितीसाठी उत्तम ठरणाऱ्या आहेत.
वेस्टीन आणि हमलिन या ब्राझीलवरुन आणलेल्या प्रजाती रसाळ, मोठ्या आकाराच्या आणि चवीला संत्र्यासारख्या आहेत. निर्यातयोग्य असणाऱ्या आणि अधिक उत्पन्नाची हमी असणाऱ्या या प्रजाती असल्याचे डॉ. लदानिया यांनी सांगितले.
नागपुरी संत्र्याला ठरणार पर्याय -
पर्ल टँजेलो ही संत्रा व्हेरायटी असली तरी त्या मोसंबीसारखी दिसते. विशेष म्हणजे, कमी आम्लतेचे व चवीला गोड असणारे हे फळ आहे. नागपुरी संत्र्याला पर्याय ठरु शकणारी ही व्हेरायटी असून पाचव्या वर्षी मिळते. प्रति हेक्टर १२ ते १३ टन उत्पनाचा दावा संशोधन संस्थेने केला आहे. डेझी ही सुद्धा मोसंबीसारखी दिसणारी असन दोन संत्रा प्रजातीमध्ये क्रॉस करुन विकसित केली आहे.
Published on: 25 February 2022, 10:51 IST