Agripedia

दुकानातून बियाण्यांची खरेदी केल्यानंतर शेतकरी त्यांची थेट शेतात पेरणी करतो आणि मग जवळपास आठवड्याभरानं ते पाहायला जातो.

Updated on 04 June, 2022 12:37 PM IST

त्यावेळी त्याची निराशा होते.कारण, बहुतेक ठिकाणी बियाणं उगवून आलं नसल्याचं त्याच्या लक्षात येतं. अशावेळी शेतकऱ्याला पुन्हा एकदा बियाणं खरेदी करावं लागतं. यासाठी वेळ आणि पैसा खर्च होतो.थोडक्यात काय शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट येतं. पण, हे टाळण्यासाठी शेतकरी घरबसल्या बियाण्यांची उगवण क्षमता तपासू शकतो. म्हणजे पेरणी करण्याआधीच आपण जे बियाणं पेरणार आहोत, त्या बियाण्यांची उगवण क्षमता तपासून पाहू शकतो.ते कसं याचीच माहिती आता आपण जाणून घेणार आहोत.

उगवण क्षमता तपासण्याच्या पद्धती बियाण्यांची उगवण क्षमता किंवा जर्मिनेशन पॉवर म्हणजे एखाद्यात बियाण्यामध्ये उगवून येण्याची किती क्षमता आहे, ते तपासणं. बियाण्यांची उगवण क्षमता तपासण्याच्या तीन पद्धती अशा आहेत, ज्या शेतकरी स्वत: घरी करून पाहू शकतात.पहिली म्हणजे गोणपाट पद्धत. या पद्धतीत शेतकरी स्वत: पोत्यावर बियाणे ठेवून त्यांची उगवण क्षमता तपासू शकतात. दुसरी पद्धत आहे पेपर पद्धत. इथं जर्मिनेशन पेपर विकत आणून शेतकरी त्यावर बियाणे ठेवू शकतात आणि त्यांची उगवण क्षमता जाणून घेऊ शकतात.

तिसरी म्हणजे कुंडी पद्धत. एखाद्या कुंडीत बियाणे ठेवून त्यांची उगवण क्षमता या पद्धतीद्वारे तपासली जाते.यापैकी सगळ्यात सोपी आहे ती गोणपाट पद्धत. आता ही पद्धत वापरून उदाहरण म्हणून सोयाबीनच्या बियाण्यांची उगवण क्षमता कशी तपासायची ते 3 टप्प्यांमध्ये जाणून घेऊया.पहिला टप्पा - सगळ्यांत आधी आपल्याला एक मोठ पोतं आणि पाण्यानं भरलेली बकेट घ्यायची आहे. पोत्याला कात्रीच्या साहाय्यानं कापायचं आहे. त्यानंतर ते पोतं पाण्यात भिवजून आणि नंतर व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे.

दुसरा टप्पा - सोयाबीनच्या बॅगेत मध्यभागी हात घालून एक मूठ सोयाबीन घ्यायची आहे. त्यापैकी 100 दाणे तपासणीसाठी लागणार आहेत. हे 100 दाणे त्या पोत्यावर व्यवस्थित 10  10 ची लाईन घेऊन ठेवायचे आहेत. त्यानंतर त्या पोत्याची गुंडाळी करून घ्यायची आहे. ते रबर किंवा दोरीनं बांधून घ्यायचं आहे.तिसरा टप्पा- ही गुंडाळी माठ किंवा रांजण अशा थंड ठिकाणी ठेवायची आहे. त्यावर दररोज दोन टाईम पाणी शिंपडायचं आहे. आठव्या दिवशी ही गुंडाळी उघडायची आहे. आठव्या दिवशी बियाण्याची उगवण झालेली असते. बियाणं एकदम सरळ उगवलं की समजायचं ते व्यवस्थित आहे.

English Summary: See how to check the germination capacity of seeds before sowing?
Published on: 04 June 2022, 12:37 IST