भुई मधून आपले डोके वर काढलेल्या अंकुरांचे रूपांतर आता सशक्त रोपांमध्ये झाले आहे. पेरणी पूर्वीचा कृती पूर्ण करण्यात शेतकरी खूप व्यस्थ होता. आता बळीराजाला थोडा विसावा मिळाला आहे. बळीराजा विसाव्यात पहुडलेला असताना एक कीड शिवारात घाम गाळत आहे.सोयाबीन पिकाचा कार्यकाळात दुसरा आणि तिसरा पंधरवढा हा खुप व्यस्त असतो. इथे खोडकीड,चक्रीभुंगा, तंबाकूवरील पाने खाणारी अळी, उंट अळी,पांढरी माशी आणि मावा ह्या सर्व किडी सक्रिय होण्याचा हा काळ असतो. ह्याच काळात पिकाला खते देणे व ती मातीआड करणे ही कृती करणेही महत्वाचे असते. पंचेचाळीस दिवसानंतर येणारा फुलोराही ह्या दोन पंधरवड्यात केलेल्या कामाचा नियोजनावर अवलंबून असते. हा महिना गाफील राहणाऱ्या शेतकऱ्यांना खुप नुकसान करणारा ठरतो.खोड कीडचा प्रादुर्भाव, तिची वाढ ही खूपच गुप्तपणे होत असते. बऱ्याच शेतकऱ्यांना खोडकिडीचा प्रादुर्भाव झालाय हे पेरणी नंतर ६०-७०व्या दिवशी लक्षात येते. पण प्रत्यक्षात खोडकिडीचा प्रादुर्भाव हा पंधराव्या दिवशीच झालेला असतो. आपल्या पिकावर त्याचा कोणताही प्रादुर्भाव झालेला जाणवत नाही.
त्या झाडांची वाढ चांगली होते,त्यांना भरपूर फुलोरा होतो पण दाणे भरण्याचा अवस्थेत शेंगा काळ्या पडतात किंवा शेंगा गळून पडतात किंवा शेंगा भरत नाहीत. नंतर आपल्या मनात प्रश्नचिन्ह उभा राहतो की एवढं सगळं चांगलं पीक दिसत असूनही आपणास उत्पादन हाती का आले नाही? त्याच प्रमुख कारण खोडकिडीचे पद्धतशीर नियोजन न होणे.पण आपण दोष सोयाबीनचा वाणास देतो. त्या जागी आपण जगातील कोणतेही वाण पेरलं तरीही आपणास खोडकिडीचे नियंत्रण न झाल्यास आपणास चांगले उत्पादन हाती लागत नाही. ह्या किडीचा भुंगा पंधराव्या दिवशी ज्यावेळेस पीक तिसऱ्या पानावर असते त्यावेळी त्याचा शिरामध्ये आपली अंडी घालते. दोन तीन दिवसांत ह्या अंडीमधून अळी बाहेर येतात. ते शिरांचा वाटे खोडात प्रवेश करतात. तिथे पुढचे सहा दिवस ती झाडाने खोडात साठवलेली साखर फस्त करते आणि कोष अवस्थेत जाते. खोडात साठवलेली साखर जर कीड फस्त करत असेल तर झाडास शेंगा भरण्यासाठी पुरेशी साखर उपलब्ध नसते. त्यामुळे शेंगा नीट भरत नाहीत. कोष अवस्थेमधून बाहेर पडल्यावर ह्या किडीचे रूपांतर माशी मध्ये होते. ही माशी परत पूर्वीसारखे अंडे घालते आणि हे चक्र ऐका हंगामामध्ये तिन ते चार वेळेस होते. ह्या किडीला थांबवण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे ह्या किडीचा पहिल्याच पिढीवर नियंत्रण मिळवणे. पहिल्या पिढीवर नियंत्रण मिळवल्यास आपले शिवार खोड कीड मुक्त राहते.
खोड किडीचा कार्यपद्धतीशी बर्याचप्रमानात साम्य असलेली कीड म्हणजे चक्रीभुंगा. चक्रीभुंग्याची मादी मुख्य खोडावर अथवा फांदीवर एक ते दीड सेंटीमीटर अंतर ठेऊन दोन काप तयार करते आणि त्यामध्ये अंडी घालते. जिथे ह्या किडीने दोन काप केले आहेत तिथून वरचा भाग हा सुखत जातो.त्या अंड्यांमधून अळी बाहेर येते.ती फांदी वाटे खोडात प्रवेश करते व झाडाने साठवलेल्या साखरेवर ताव मारते. ह्या साखरेचा अनुपस्थितीत शेंगा नीट भरत नाहीत,शेंगा कुजतात किंवा गळून पडतात.ही कीड पिकाचा संपूर्ण आयुमध्ये दोन ते तीन पिढी पूर्ण करते. ह्या किडीवर जर पहिल्याच पिढीवर नियंत्रण मिळाल्यास पुढील समस्या आपण सहजरित्या सोडवू शकतो.ह्या दोन्ही किडींवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वात सोपा पर्याय आहे ती म्हणजे बीजप्रक्रिया. थायरम नावाचे बुरशीनाशक(३ग्राम प्रति किलो)+थायमीथॉकझोन(३मिली प्रति किलो)(कीटकनाशक)ह्या प्रमाणात बियाण्यास अलगद चोळावे. सोयाबीनचा बियाण्याची साल खूपच पातळ असते त्यामुळे बीजप्रक्रिया करताना थोड्या प्रेमळ हलक्या हातांचा वापर करावा. बीजप्रक्रिये नंतर पंधराव्या दिवशी खाली नमूद केलेल्या कीटकनाशकांपैकी ऐका कीटकनाशकाचा वापर करावा.इथियॉन (50 टक्के) किंवा इंडोक्झाकार्ब (15.8 टक्के) किंवा क्लोरॅंट्रॅनिप्रोल (18.5 टक्के) ह्या कीटकनाशकांची फवारणी करावी.
खोड कीड व चक्रीभुंग्यानंतर पहिल्या पंधरवड्यात आपणास खतांचे नियोजन करणे ही महत्वाचे आहे. प्रति एकर चार पोती सिंगल सुपर फॉस्फेट+एक पोत म्युरेट ऑफ पोटॅश(पांढरे पोटॅश) हे जमिनीत झाडांचा बुडक्यात टाकून घ्याव्यात व नंतर शक्य असल्यास मातीआड करावे.पंधराव्या दिवशी एक चिलेटेड मायक्रोन्यूट्रिइंट्सची फवारणी घ्यावी(२००ग्राम प्रति एकर). चाळीसाव्या दिवशी फुलोऱ्याचा आधी चिलेटेड मायक्रोन्यूट्रिइंट्स(४००ग्राम)+सिलिकॉन पावडर(४००ग्राम)ची फवारणी घ्यावी. ह्या दोन फवरण्यामुळे झाडाची निकोप वाढ होते आणि कोणत्याही टॉनिक किंवा संप्रेरकांची गरज आपणास भासत नाही. फुलांची संख्या वाढवण्याकरीता कोणत्याही प्रॉडक्ट्सची गरज भासत नाही.मागील बरेच वर्ष ह्या किडीकडे आम्ही नेहमीच कानाडोळा केला आहे. विक्रमी उत्पादन थोड्या क्विंटलने हुकत आहे. एवढे दिवस खूप खोलवर विचार केल्यानंतर आम्हास ह्या किडीची जाणीव झाली. ह्यावर्षी एकच लक्ष खोड कीड फस्त हा पवित्रा आम्ही घेतला आहे. तुम्ही ही ह्या दोन किडींकडे डोळ्यात तेल घालून बघावे. खतांचे नियोजन नीट करावे आणि वेळोवेळी चिलेटेड मायक्रोन्यूट्रिइंट्सची फवारणी घ्यावी.
विवेक पाटील,सांगली
०९३२५८९३३१९
Published on: 23 June 2022, 06:54 IST